पुणे : लोकसभा निवडणूका जवळ आल्या असताना राज्याच्या राजकारणात मोठ्या उलथापालथी होताना दिसत आहे. यातच आता बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळेंना मोठा धक्का बसला आहे. शरद पवार गटाचे जिल्हा परिषद सदस्य आणि सुप्रिया सुळेंचे प्रचारक प्रविण माने तसेच सोनाई ग्रुपचे संचालक दशरथ माने हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इंदापूरमध्ये प्रविण माने यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांणा उधाण आले होते. दरम्यान, आता प्रविण माने यांनी पत्रकार परिषद घेत याबद्दलचा खुलासा केला आहे. त्यांनी अजित पवारांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे. यावेळी बोलताना प्रविण माने म्हणाले की, "आम्ही उपमुख्यमंत्री अजित पवारांचे हात बळकट करुन त्यांची ताकद वाढवण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर आणि इंदापूर तालूक्याच्या विकासासाठी अजितदादांच्या पाठीशी खंबिरपणे उभं राहण्याचा निर्णय घेतला आहे."
उपमुख्यमंत्री फडणवीस प्रविण मानेंची भेट घेतल्यानंतर म्हणाले की, "प्रविण माने यांच्याशी माझे जुने आणि वैयक्तिक संबंध आहेत. ते अनेकवेळा माझ्या घरी येतात. ते बऱ्याच दिवसांपासून माझ्या मागे लागले होते की, तुम्ही इंदापूरला येता पण माझ्याकडे येत नाही. त्यामुळे मी त्यांना कबुल केलं होतं की, तुमच्याकडे चहा पिण्यासाठी येईन. त्यानुसार मी चहा पिण्यासाठी गेलो होते. ते आमच्यासोबतच आहेत आणि आमचे जुने सहकरीच आहेत," असे ते म्हणाले होते. त्यानंतर आता प्रविण मानेंनी अजित पवारांना पाठिंबा दिल्याने बारामतीत शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे.