केजरीवालांचा आमदार अडकला वक्फ बोर्डाच्या घोटाळ्यात; लवकरच तुरुंगवारी!

    06-Apr-2024
Total Views |
Waqf Board case
नवी दिल्ली : दिल्लीतील आम आदमी पक्षाचे आमदार आणि दिल्ली वक्फ बोर्डाचे अध्यक्ष अमानतुल्लाह खान हे ईडीच्या रडारवर आहेत. अमानतुल्लाह खान यांच्याविरुद्ध खटला चालवण्याची मागणी ईडीने न्यायालयाकडे केली आहे. दिल्ली सरकारचे मंत्री आतिशी आणि सौरभ भारद्वाज यांनी पत्रकार परिषदेत दावा केला होता की, ईडी आम आदमी पार्टीच्या आणखी ४ नेत्यांना अटक करणार आहे. पंरतु यावेळी त्यांनी अमानतुल्लाह खान यांचे नाव घेतले नव्हते. पण आता ईडीची टांगती तलवार अमानतुल्लाह खान यांच्या मानेवर लटकू लागली आहे. त्यामुळे अमानतुल्लाह खान यांना ही अटक होऊ शकते. कारण दि. ११ मार्च रोजी दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांची अटकपूर्व जामीन याचिका फेटाळली होती.

एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, वक्फ बोर्ड मनी लाँड्रिंग प्रकरणात आम आदमी पार्टीचे आमदार अमानतुल्लाह खान समन्सला उपस्थित न राहिल्यानंतर ईडीने दि. ५ एप्रिलला राऊस एव्हेन्यू कोर्टात तक्रार दाखल केली. पीएमएल कायद्याच्या कलम ५० नुसार जारी केलेल्या समन्सचे पालन न केल्याबद्दल आणि तपासात सहभागी न झाल्याबद्दल एजन्सीने त्याच्यावर अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी दिव्या मल्होत्रा ​​यांच्या न्यायालयात फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम १९० आणि २०० अंतर्गत गुन्हा दाखल केला.
 
ईडीच्या म्हणण्यानुसार, अमानतुल्लाह खान यांनी दि. २३ जानेवारी, ३१ जानेवारी, ८ फेब्रुवारी, १९ फेब्रुवारी, २६ फेब्रुवारी आणि ४ मार्च रोजी चौकशीसाठी जारी केलेल्या समन्सचे पालन केले नाही. अतिरिक्त मुख्य मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट (ACMM) दिव्या मल्होत्रा ​​यांनी या प्रकरणाची सुनावणी ६ एप्रिल रोजी ठेवली आहे.या प्रकरणात अमानतुल्लाह खान यांनी अटकपूर्व जामीन मिळविण्याचा प्रयत्न केला होता, मात्र न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला. वक्फ बोर्डात पैशाच्या बदल्यात कर्मचाऱ्यांची बेकायदेशीरपणे भरती करून आणि त्याच्या सहकाऱ्यांच्या नावे मालमत्तांमध्ये गुंतवणूक करून अमानतुल्लाह खानने 'गुन्ह्याद्वारे मोठ्या प्रमाणात पैसा' मिळवला, असा ईडीचा आरोप आहे. वक्फ बोर्ड घोटाळ्याप्रकरणी ईडीने नोव्हेंबर २०२३ मध्ये अमानतुल्लाह खान यांनाही अटक केली होती.

ईडीने २०१६ मध्ये या प्रकरणाचा तपास सुरु केला होता. ज्यामध्ये लोकांना दिल्ली वक्फ बोर्डात अवैधरित्या नोकऱ्या देण्यात आल्या आणि त्या बदल्यात त्यांच्याकडून पैसे घेण्यात आले होते. यामुळे दिल्ली सरकारचे आर्थिक नुकसान झाले. त्यामुळेच अमानतुल्लाह खान यांच्यावर वक्फ मालमत्ता बेकायदेशीरपणे भाडेतत्त्वावर दिल्याचाही आरोप आहे, ज्याच्या बदल्यात खान यांना पैसे मिळाले.या प्रकरणी ईडीने मनी लाँड्रिंगचा गुन्हाही नोंदवला आहे. ज्यामध्ये अमानतुल्ला खान यांच्यावर त्याच्या साथीदारांमार्फत मालमत्ता खरेदी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी अमानतुल्ला खान यांनी दिल्ली न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता, तो फेटाळण्यात आला. यानंतर दिल्ली उच्च न्यायालयाने ११ मार्च रोजी त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला.