‘विठाबाई’: एक संघर्षमय चरित्रनाट्य

    06-Apr-2024   
Total Views |
Vithabai charitranatya


मुंबई विद्यापीठाच्या ‘अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्स’च्या विद्यार्थ्यांनी संजय जीवने लिखित आणि डॉ. मंगेश बनसोड दिग्दर्शित ‘विठाबाई’ नाटकाचा प्रयोग नुकताच सादर झाला. त्यामुळे टीचभर पोटाची खळगी भरण्यासाठी, चाळ बांधून बोर्डावर नाचणार्‍या, विठाबाईंच्या चरित्रनाट्याचा घेतलेला हा नाट्यानुभव...
 
विठाबाई म्हणजे तमाशाच्या पटलावरील एक नाममुद्रा उमटलेले अभेद्य नाव. वयाच्या १३व्या वर्षापासून पायात घुंगरू बांधून, कलाकार म्हणून प्रेक्षकांवर हुकूमत गाजवणारी, लावणी सम्राज्ञी नृत्यांगना म्हणजे विठाबाई. मुळात भाऊ खुडे नारायणगावकरांचे संपूर्ण कुटुंब ’लोकनाट्य’ तमाशामध्ये काम करत असत. त्यामुळे नृत्याचे बाळकडू विठाबाई यांना घरातच मिळाले. वयाच्या आठव्या वर्षापासून त्या शाहीर आळतेकर आणि मामा वरेरकर यांच्या कलापथकात काम करत. पुढे १९४८ साली म्हणजेच वयाच्या १३व्या वर्षी विठाबाई यांनी चाळ बांधून, तमाशाच्या बोर्डावर पाय ठेवला आणि तमाशाविश्वात वादळ उठले.
 
ज्यामुळे विठाबाई या तमाशाविश्वातील अनभिषिक्त सम्राज्ञी ठरल्या. ’विठाबाई’ या रोमांचक चरित्रनाट्याची सुरुवातदेखील याच प्रसंगापासून होते. पुढे विठाबाई कशाप्रकारे स्वतः वडिलांच्या नावे ’विठा भाऊ मांग नारायणगावकर’ फड स्थापन करतात, हे पाहायला मिळते. त्या फडात केशर आणि मनोरमा या त्याच्या दोन बहिणी गाणे गात, तर विठाबाई नृत्य करीत. त्यामुळे ‘विठाबाई’ या नाटकात सुद्धा गाणे आणि नृत्याला तितकेच महत्त्व दिलेले दिसते. त्यात आशुतोष वाघमारे यांनी संगीताची, तर छाया खुटेगांवकरांनी नृत्य दिग्दर्शनाची जबाबदारी यशस्वीपणे पेलली आहे.
 
विशेष बाब म्हणजे, हे नाटक सादर करणारे काही विद्यार्थी कलाकार महाराष्ट्रबाहेरील होते. त्यामुळे दिग्दर्शकांनी आणि विद्यार्थी कलाकारांनी गावरान बोली भाषेच्या उच्चारासाठी घेतलेली मेहनत नक्कीच कौतुकास्पद. त्यात नेपथ्यकार जयंत देशमुख यांनी नेपथ्याच्या माध्यमातून विठाबाईंच्या फडाचा १९५० ते १९८० पर्यंतचा सुवर्णकाळ उत्तमपणे रेखाटला आहे. त्यामुळे विद्यापीठाच्या मुक्ताकाश रंगमंचासमोर बसून ’विठाबाई’ हे चरित्रनाट्य पाहताना, फडात बसल्याचीच अनुभूती होते.

तमाशावर पूर्वीपासून ग्राम्यतेचे, अश्लीलतेचे, गावंढळपणाचे अनेक आरोप केले गेले. परंतु, भारतीय सामाजिक परिप्रेक्ष्यात विचार केल्यास, अनेक संकल्पनांपैकी श्लीलता-अश्लीलता यादेखील अत्यंत सापेक्ष अशा संकल्पना आहेत. त्यामुळे तमाशावर याआधी झालेली अश्लीलतेची, गावंढळपणाची टीका कितपत ग्राह्य आहे? असा सवाल एका अर्थी या चरित्रनाट्यातून प्रेक्षकांना विचारला जातो. या नाटकात देखील गण आणि बतावणीच्या माध्यमातून भाषिक कोट्या, समकालीन राजकीय आणि सामाजिक व्यंगावर भाष्य करून उत्तम विनोद निर्मिती केली आहे. ज्यामुळे प्रेक्षकांमधून शिट्या, टाळ्या आणि हास्याचे फवारे उडताना दिसतात. या नाटकात दिग्दर्शक डॉ. मंगेश बनसोड यांनी फ्लॅशबॅकमध्ये जाऊन प्रसंग आणि पात्र रचनेचा फॉर्म उत्तमरित्या मांडलाय. त्यामुळे विठाबाईंच्या आयुष्यात घडलेल्या अनेक घटनांशी प्रेक्षक समरूप होऊन नाट्य आणि चरित्र या दोन्ही गोष्टींशी एकाच वेळी जोडले जातात. यात विठाबाईंची वेगवेगळी रुपे प्रेक्षकांच्या काळजाचा ठाव घेताना दिसतात.
 
प्रेमासाठी आसुसलेली विठाबाई, मजबुरीने मर्चंड या माणसाकडे नातं ठेवण्यासाठी कबूल होणारी विठाबाई, बापाच्या मृत्यूने खचणारी आणि तरीही स्वतःच्या हिमतीवर तमाशा फड चालवण्याची जबाबदारी घेणारी विठाबाई, भारत-चीन युद्धाच्या वेळी सीमेवर लढणार्‍या भारतीय सैनिकांचे मनोबल वाढवण्यासाठी तीन महिन्यांच्या लेकराला मागे टाकून वात्सल्यापेक्षा देशप्रेमाला महत्त्व देणारी विठाबाई, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या निधनानंतर ढसाढसा रडून ’आपला उद्धार करता गेला’ असे म्हणणारी विठाबाई... अशा अनेक भावनिक क्षणांना या चरित्रनाट्यात दिग्दर्शक आणि लेखकाने विचारांची पेरणी करत अगदी ताकदीने उभे केले आहे. त्यामुळे विठाबाईंच्या आयुष्यातला संघर्ष लेखणीत मांडण्यात लेखक संजय जीवने यशस्वी झाले आहेत, असे म्हणता येईल. तसेच तिच्या वेदनेचे संगीत ही ’ढोलकीची थाप’ आणि आनंदाचा क्षण ही ’ढोलकीची थाप’ असल्याचे संगीत दिग्दर्शक आशुतोष यांनी उत्तमपणे अधोरेखित केले आहे. त्यातही सुरुवातीला विठाबाईंच्या पायातल्या घुंगरांचा आवाज मनाला तृप्त करणार होता; पण नंतर याच घुंगरांच्या आवाजात पड्यामागे आपली नाळ दगडाने ठेचणारी विठा दिसली आणि तोच आवाज कानाला त्रासदायक वाटू लागला.

एकीकडे ’कलेची सम्राज्ञी’ म्हणून नावलौकिक तर दुसरीकडे ’नाच करणारी’ म्हणून तिची झालेली अवहेलना प्रकर्षाने जाणवली. त्यात व्यवहारी नसल्यामुळे, आयुष्यात आलेल्या पुरुषाने विठाबाईंची संपूर्ण संपत्ती लुटून तिला रस्त्यावर आणले. अशावेळी पोटाची भूक भागवण्यासाठी दुसर्‍यांकडे विठाने पसरवलेले हात एका अर्थी भीषण वास्तवतेची जाणीव करून देतात, तरीही विठाबाई यांनी रंगमंचावर आपल्या नृत्यात, अभिनयात आणि गाण्यात कशाचीच उणीव रसिक प्रेक्षकांना जाणवू दिली नाही. त्यामुळेच विठाबाई पुरुषांच्या जगात मोठ्या आत्मविश्वासाने आणि धैर्याने वावरल्या. ’विठाबाई’ नाटकात हाच संघर्षमय प्रवास उत्तमपणे मांडलाय. यानिमित्त महाराष्ट्राबाहेरील विद्यार्थ्यांना तमाशाचे पारंपरिक सादरीकरण त्यांच्या अस्सल बाजासहित शिकता आले. तसेच तमाशा परंपरेत काम करताना, विठाबाईंनी ऐश्वर्यासह भोगलेल्या दुःखाची जाणीव विद्यार्थ्यांना झाली.

विशेष बाब म्हणजे, ’पोटासाठी नाचते मी पर्वा कुणाची,’ ‘नेसली पितांबर जरी’ या त्यांच्या लोकप्रिय लावण्या विद्यार्थ्यांनी कौशल्याने सादर केलेल्या. ज्यामुळे कलावंताची कलेवरची निष्ठा ही त्यावर आलेल्या संकटाचा सामना करताना कशी असते, हे विठाबाईंकडून विद्यार्थ्यांना शिकता आले. त्यामुळे हे नाटक पूर्ण तमाशा नसले, तरी तमाशा शैलीचा वापर करून विठाबाईंचे जीवन समजून घेण्याचा आणि प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा अभिनव प्रयोग होता. मुंबई विद्यापीठाच्या ’अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्स’च्या विद्यार्थ्यांनी डॉ. संजय जीवने लिखित आणि डॉ. मंगेश बनसोड दिग्दर्शित ’विठाबाई’ या नाटकाची धुरा आपल्या खांद्यावर सशक्तपणे पेलली आहे. तसेच या नाटकाला अकॅडमीचे संचालक योगेश सोमण यांनी दिलेले उत्तेजन निश्चित अभिनंदनीय असेच. या सर्वांच्या मेहनतीचे फळ म्हणून मुंबई विद्यापीठाच्या मुक्ताकाश रंगमंचावर तुडुंब भरलेल्या प्रेक्षागृहासमोर या नाटकाचे चार प्रयोग झाले. आता या नाटकाचे व्यावसायिक रंगमंचावर प्रयोग व्हावे, हीच सदिच्छा!

सुप्रिम मस्कर

इतिहास आणि राज्यशास्त्र विषयात पदवीचे शिक्षण पुर्ण केले आहे. सध्या साठ्ये महाविद्यालयात 'एमएसीजे'च्या प्रथम वर्षात शिकत आहेत. मुंबई विद्यापीठातून 'लोककला' या विषयात पदविका पूर्ण केली आहे. वक्तृत्व स्पर्धा, अभिनय स्पर्धांमध्ये अनेक परितोषिके प्राप्त.