मुंबई : "वरून (हायकमांडचा) आदेश आला तरी शरद पवारांच्या उमेदवाराचा प्रचार करणार नाही", अशी भूमिका घेत भिवंडी जिल्हा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे देण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे सांगली पाठोपाठ भिवंडीतही मविआसमोर बंडखोरी थोपविण्याचे आव्हान उभे ठाकले आहे.
भिवंडी लोकसभा मतदारसंघात २००९ मध्ये काँग्रेसचा खासदार निवडून आला होता. मात्र, २०१४ आणि २०१९ मध्ये भाजपच्या कपिल पाटलांनी त्यांना धूळ चारली. दोन्ही वेळेस काँग्रेसच्या उमेदवाराला दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. त्यामुळे यंदाही आपसूकच त्यांचा या मतदारसंघावर प्रबळ दावा होता. परंतु, शरद पवार अडून बसल्यामुळे हायकमांच्या सूचनेनुसार ही जागा त्यांना सोडण्यात आली. त्यानुसार, सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) यांना उमेदवारी देण्यात आली असली, तरी काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष दयानंद चोरगे आणि जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष नीलेश सांबरे यांनी अपक्ष लढण्याची तयारी सुरू केली आहे. तर, रायगडचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांनीही पवारांच्या उमेदवाराविरोधात दंड थोपटले आहेत.
याविषयी माध्यमांशी संवाद साधताना महेंद्र घरत म्हणाले, कोकणात काँग्रेसची ताकद मोठी असल्यामुळे आम्ही दोन जागांची मागणी केली होती. पण, महाविकास आघाडीतील इतर घटक पक्षांनी मुंबई आणि कोकण रिकामे करायचे ठरवले आहे. याविषयी आम्ही महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथल्ला यांची त्यांच्या केरळमधील गावी भेट घेतली आणि कोकणातील विशेषतः भिवंडीच्या जागेचा आग्रह धरला होता. परंतु, त्यांना केवळ पैसेवाल्यांनाच उमेदवारी द्यायची असेल, तर मग आम्ही काम का करू? आता जरी 'वरून' आदेश आला, तरी आम्ही काम करणार नाही. सर्व पदाधिकारी राजीनामे देतील, असेही त्यांनी सांगितले.
राष्ट्रवादीचा जन्म झाल्यापासून आमचे मतदारसंघ आमच्या हातून चालले आहेत. त्यांना आणखी किती डोक्यावर बसवणार? असा सवाल महेंद्र घरत यांनी उपस्थित केला. तसेच भिवंडीतून दयानंद चोरगेच आमचे उमेदवार असणार आहेत, आम्ही उमेदवारी अर्ज भरणार आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
टोकाची भूमिका घेणार - चोरगे
कोकण विभागामध्ये आतापर्यंत आम्ही तीन जागा लढत होतो. मात्र यावेळी एकही जागा मिळालेली नाही. पंजामुक्त कोकण, असा प्रयोग करायचा आहे का? आमचा विरोध असतानाही शरद पवार गटाने भिवंडीसंदर्भात घोषणा केली. त्यामुळे पदाधिकाऱ्यांमध्ये मोठी नाराजी आहे. आता सर्व पदाधिकारी एकत्र बसून पुढील भूमिका ठरवणार आहोत. महाविकास आघाडी ही जागा काँग्रेसला सोडत नसेल, तर आपण ही जागा का लढवत नाही, हे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी भिवंडीमध्ये येऊन पदाधिकाऱ्यांना सांगावे. जर काँग्रेसने ही जागा आपल्याकडे घेतली नाही, तर आम्ही टोकाची भूमिका घेणार आहोत, असा इशारा काँग्रेसचे ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष दयानंद चोरगे यांनी दिला.