जयंत पाटील नाराज! खुद्द फडणवीसांनीच केला खुलासा

    06-Apr-2024
Total Views |
 
Jayant Patil & Devendra Fadanvis
 
नागपूर : जयंत पाटील त्यांच्या पक्षात नाराज आहेत. त्यांना कुणीही विचारत नाही, असा खुलासा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केला आहे. शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी केलेल्या टीकेला त्यांनी प्रत्युत्तर दिले. त्यांनी शनिवारी नागपूर येथे माध्यमांशी संवाद साधला.
 
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "जयंत पाटील त्यांच्या पक्षात इतके नाराज आहेत की, त्यांना त्यांच्या पक्षात कुणीही विचारत नाही. त्यामुळे अलिकडच्या काळात ते अशी वक्तव्ये करत आहेत. एवढी मोठी निवडणूक सुरु आहे पण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फक्त शरद पवार, सुप्रिया सुळे आणि रोहित पवारच दिसतात. जयंत पाटील आहेत कुठे?," असा सवाल त्यांनी केला.
 
हे वाचलंत का? -  "ज्यांच्याकडे विचार नाही त्यांनी..."; शेलारांचा उबाठाला टोला
 
ते पुढे म्हणाले की, "कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे हे महायुतीचे उमेदवार राहणार आहेत. भारतीय जनता पार्टी खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभी राहणार आहे. आम्ही सगळे त्यांना पुर्ण ताकदीने निवडून आणू. कुणीतरी महाविकास आघाडीचं खूप चांगलं वर्णन केलेलं आहे. महाविकास आघाडी किंवा इंडी आघाडी हे केवळ इंजिन आहे. त्याला एकही डबा नाही. या इंजिनमध्ये बसायलाही जागा नसून प्रत्येक इंजिन वेगवेगळ्या दिशेने जात आहे. फक्त सगळे इंजिन एका रांगेत उभे करुन हात वर करत आम्ही एकत्र आहोत असं सांगायचं आणि पुन्हा आपापलं इंजिन घेऊन वेगवेगळ्या दिशेने जायचं असं सुरु आहे. ज्या इंजिनमध्ये कुणाला बसायचीच जागा नाही ते इंजिन काय कामाचं?" असेही ते म्हणाले. तसेच यावेळी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या.