अयोध्येत श्रीराम जन्मोत्सवाच्या तयारीला सुरुवात! काय म्हणाले चंपत राय?

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासची बैठक संपन्न

    06-Apr-2024
Total Views |

Champat Rai

लखनौ : अयोध्येत श्रीराम जन्मोत्सवाच्या (Ayodhya Ram Navami) तयारीला सुरुवात झाली आहे. मणिराम दास छावणी येथे श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासची बैठक शुक्रवार, दि. ०५ एप्रिल रोजी न्यासचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास जी महाराज यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीत प्रामुख्याने रामनवमीच्या तयारीवर चर्चा करण्यात आल्याचे न्यासचे सरचिटणीस चंपत राय यांनी सांगितले.

मिळालेल्या माहितीनुसार रामनवमीच्या शुभ मुहूर्तावर १५ ते १७ एप्रिल या कालावधीत मंदिर २० तासांसाठी खुले ठेवण्यात येणार आहे. श्री रामललाच्या पूजेचा आणि अलंकाराचा कालावधी वगळता उर्वरित वेळ मंदिर खुले राहील. श्री रामजन्मोत्सवाचे थेट प्रक्षेपण प्रसार भारतीच्या माध्यमातून अयोध्या धामसह शहरातील बाजारपेठांमध्ये १०० ठिकाणी एलईडी स्क्रीनद्वारे होणार आहे. श्री रामलल्लाचा राग-भोग आणि शृंगार सकाळी, दुपारी आणि रात्री सादर होण्यासाठी तीन ते चार तास लागतात. या वेळेशिवाय मंदिर भाविकांसाठी खुले ठेवावे की नाही यावर सध्या चर्चा सुरू आहे.

हे वाचलंत का? : प्रभू श्रीरामांबद्दल घृणास्पद वक्तव्य, ब्राम्हणद्वेषानं भरलेली भाषणं देतोयं रुद्र आणि राकेश कुशवाहा!

कमी वेळेत सोपे दर्शन होण्यासाठी भाविकांना मोबाईलशिवाय दर्शनासाठी येण्याचे, तसेच बूट-चपला आणि इतर सामानही वेगळे ठेऊन येण्याचे आवाहन न्यास कडून करण्यात आले आहे. चंपत राय यावेळी म्हणाले की, रामजन्मभूमी मार्गापासून परिसरापर्यंत ५० ठिकाणी भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. दर्शनपथावर बसण्याची व्यवस्थाही करण्यात येत आहे. मार्गावर कार्पेट टाकण्यात येणार असून सावलीसाठी जर्मन हँगर्स बसवले जात आहेत. ओआरएसची उपलब्धताही पुरेशा प्रमाणात उपलब्ध असेल. सर्व भाविकांना सहज प्रसाद देता येईल, अशी जागा सध्या निवडली जात आहे.

चंपत राय यांनी राम भक्तांना रामजन्मोत्सवाचे थेट प्रक्षेपण त्यांच्या घरी, राहत्या परिसरात, मंदिरांमध्ये पाहण्याचे आवाहन केले. तसेच आपल्या गावात आणि परिसरात जयंती उत्साहाने साजरी करण्यास त्यांनी सांगितले आहे. श्रीराम मंदिराच्या पहिल्या मजल्यावर तयार होणाऱ्या रामदरबारबाबत बोलताना ते म्हणाले, 'राजा रामाच्या दरबाराचे स्वरूप काय असेल यावर विचारमंथन सुरू झाले आहे. त्याच्या डिझाईनसाठी काय निवडावे यासंदर्भात अनेक सूचना आल्या आहेत. रामनवमीनंतर होणाऱ्या बैठकीत यावर अधिक चर्चा होईल.'

बैठकीदरम्यान निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा, कोषाध्यक्ष गोविंद देव गिरी जी महाराज, सदस्य जगद्गुरू विश्व प्रसन्नतीर्थ जी महाराज, महंत दिनेंद्र दास जी, विमलेंद्र मोहन मिश्रा, अनिल मिश्रा, केंद्रीय गृहसचिव प्रशांत लोखंडे, जिल्हा दंडाधिकारी डॉ. नितीश कुमार, विशेष निमंत्रित महंत कमलनयन दास जी उपस्थित होते.