उद्धव ठाकरे पाकिस्तानात हनुमान चालीसा म्हणायची का? : फडणवीस
04-Apr-2024
Total Views | 103
अमरावती : उद्धवजी, हनुमान चालीसा भारतात नाही तर पाकिस्तानात जाऊन म्हणायची का? असा सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना केला आहे. गुरुवारी अमरावती लोकसभेसाठी भाजपकडून नवनीत राणांचा अर्ज भरण्यात येणार आहे. यावेळी आयोजित सभेत ते बोलत होते.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "नवनीत राणांना प्रत्यक्ष बजरंगबलीचा आशीर्वाद प्राप्त झाला आहे. देशात असा एक व्यक्ती दाखवा ज्याने भारतात हनुमान चालीसा म्हणतो असं म्हटल्याने त्याला १४ दिवस तुरुंगात राहावं लागलं आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला आणि उद्धव ठाकरेंना मला विचारायचं आहे की, हनुमान चालीसा भारतात म्हणायची नाही तर पाकिस्तानात जाऊन म्हणायची का?," असा सवाल त्यांनी केला आहे.
ते पुढे म्हणाले की, "सर्वोच्च न्यायालयाने नवनीत राणांचे जात वैधता प्रमाणपत्र वैध ठरवलं असून सत्याचा विजय झाला आहे. जे लोकं पोपटासारखे बोलत होते त्यांच्या थोबाडात बसलेली आहे. 'जिसका आरंभ अच्छा होता है उसका अंत भी अच्छा होता है'. फॉर्म भरण्याच्या दिवशी सुप्रीम कोर्टाचा आशीर्वाद मिळाला आहे. तसेच मतमोजणीच्या दिवशी जनतेचा आणि मोदीजींचा आशीर्वाद मिळून नवनीत राणा प्रचंड मतांनी खासदार होणार आहेत, यात शंका नाही," असे ते म्हणाले.
यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीसांनी काँग्रेस नेते राहुल गांधींवरही निशाणा साधला. ते म्हणाले की, "राहुल गांधी म्हणतात, आम्हाला हिंदू समाजातली शक्ती समाप्त करायची आहे. ते आमची मातृशक्ती, दुर्गाबाई, अंबाबाई या शक्तींना समाप्त करण्याचा प्रयत्न करत आहेत. राहुलजी, तुमच्यासारखे कित्येक आला आणि गेले पण या शक्तीला कुणीही संपवू शकलं नाही," असेही ते म्हणाले.