आगीशी खेळ नको!

    30-Apr-2024   
Total Views |
justine trudeo
 
काही लोकांना राहून-राहून कळ काढण्याची सवय असते. अशाच प्रकारची सवय कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडोंनाही आहे. भारतीय एजेंट्सनी खलिस्तानी दहशतवादी हरदिपसिंग निज्जरची हत्या केली होती, असा आरोप ट्रुडोंनी कॅनड्याच्या संसदेत केला. पण, ट्रुडोंनी आपला आरोप सिद्ध करण्यासाठी कोणताही पुरावा सादर केला नाही. ट्रुडोंनी केलेल्या आरोपानंतर दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध बिघडले. भारताने कॅनडाच्या दूतावासातील कर्मचार्‍यांना हाकलून लावले. यानंतर कॅनडाच्या सरकार भानावर आले आणि ट्रुडोंनी आपली भूमिका मवाळ केली. पण, आधी म्हटल्याप्रमाणे, ट्रुडोंना ना शांत राहता येते ना आंतरराष्ट्रीय पातळीवर कशाप्रकारे द्विपक्षीय संबंध संभाळले जातात, याचे त्यांना ज्ञान आहे. या अज्ञानातूनच ट्रुडोंनी पुन्हा एकदा आगळीक केली.
 
ट्रुडोंनी रविवारी बैसाखीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात सहभाग घेतला. याच कार्यक्रमात ट्रुडोंच्या भाषणावेळी खलिस्तान समर्थकांनी घोषणाबाजी केली. या घोषणा भारतविरोधी होत्या, या घोषणाबाजीवर ट्रुडोंनी आक्षेप घ्यायचा सोडून स्मितहास्य करत एकप्रकारे पाठिंबाच दिला. याचं कार्यक्रमात कॅनडाचे विरोधी पक्षनेते असलेले पियरे पोइलिवरे यांचाही सहभाग होता. पियरेंनी आजपर्यंत भारत-कॅनडा संबंध कसे चांगले राहतील, यावर अनेकदा भाषणे ठोकली आहेत. ट्रुडोंमुळे भारतासोबत संबंध बिघडल्याचे आरोप पियरे आतापर्यंत करत आलेत. त्यामुळे या महाशयांना तरी कूटनीती कळत असेल, अशी आशा होती. पण, यांनी सुद्धा भारतविरोधी घोषणाबाजी होत असताना दात काढण्यातचं धन्यता मानली. साहजिकचं या घटनेनंतर दोन्ही देशातील संबंधात तणाव निर्माण झाला. भारताने कॅनडाच्या उप उच्चायुक्तांना बोलवून त्यांची चांगलीच खरडपट्टी काढली. भारत अशाप्रकारचे कृत्य सहन करणार नाही, अशी धमकीवजा समजही त्यांना देण्यात आली.
 
कॅनडाला अशी समज देण्याची ही काही पहिली वेळ नाही. पण, ट्रुडोंवर याचा काहीही परिणाम होताना दिसत नाही. ट्रुडोंचे खलिस्तानी दहशतवाद्यांविषयीचे प्रेम उफाळून येत राहते. दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असलेल्या आरोपी ट्रुडोंसाठी निष्पाप नागरिक होतो. फक्त ट्रुडोंनाच नाही, तर आता विरोधी पक्षनेता असलेल्या पियरेला सुद्धा हे दहशतवादी आपलेसे वाटतात. कशासाठी तर अवघ्या सात ते आठ लाख शीखांच्या मतपेठीसाठी. पण, महत्त्वाचा प्रश्न हा आहे की, जगातील तिसर्‍या क्रमाकांची अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने वाटचाल करणार्‍या भारताला कॅनडातील नेते अवघ्या एक-दोन टक्के मतासाठी दुखावतील का? कॅनडाचं नाही, तर कॅनडाचा परममित्र असलेली अमेरिका सुद्धा आता खलिस्तानी कार्ड खेळत आहे. यामागे मतपेढीचं राजकारण नाही, तर या दोन देशांची कूटनीतिक खेळी असल्याचे दिसून येते. कालच ‘वॉशिंगटन पोस्ट’ने दहशतवादी गुरपतवंत सिंह पन्नूच्या हत्येची सुपारी भारतीय गुप्तचर संस्था ’आरएडब्लू’ च्या अधिकार्‍यांनी दिली होती, असा वृत्तांत प्रकाशित केला. भारताने हा वृत्तांत भ्रामक आणि निरुपयोगी असल्याचे स्पष्टीकरणही दिले.
 
पण, महत्त्वाचा प्रश्न आहे की, पन्नू हा फक्त सामान्य कॅनडा-अमेरिकी नागरिक नाही, तर तो एक दहशतवादी आहे. तरीही अमेरिका त्यांच्यावर कारवाई करत नाही. एकीकडे मित्रराष्ट्र म्हणायचं आणि मित्रालाच तोडण्याची भाषा करणार्‍या दहशतवाद्याला आपल्या देशात शरण द्यायची, अशी ही अमेरिकेची दुटप्पी भूमिका. यामागे अमेरिकेची कूटनीती असल्याचे मत विश्लेषक व्यक्त करतात. भारताने अमेरिकेसोबत आपले द्विपक्षीय संबंध मजबूत केले असले, तरी भारत अमेरिकेचा पिछलग्गू बनलेला नाही. भारताने आपले परराष्ट धोरण पूर्णपणे स्वातंत्र्य ठेवलेले आहे. ही गोष्ट अमेरिकेला मान्य नाही. त्यामुळेच भारतावर दबाव टाकण्यासाठी अमेरिका आणि कॅनडा खलिस्तानी कार्ड खेळत आहेत. पण, याचा आजपर्यंत ना अमेरिकेला काही उपयोग झालाय ना भविष्यात होईल. हा नवा भारत आहे, याला दहशतवाद्यांना घरात घुसून कसं मारायचं हे माहित आहे. त्यामुळे अमेरिकेने आणि इतर कोणत्याही देशाने भारतावर दबाव टाकण्याच्या नादात आगीशी खेळू नये एवढेच.

श्रेयश खरात

वाणिज्य शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC), अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. दै. 'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. आंतरराष्ट्रीय राजकारणाचा अभ्यासक. इतिहास, अर्थकारण, राजकारण आणि क्रिकेट इत्यादी विषयांची आवड.