दिल्ली मद्य घोटाळा : केजरीवालांना न्यायालयीन दिलासा नाहीच!
जामीन अर्जावर निकाल राखीव!
03-Apr-2024
Total Views | 51
नवी दिल्ली : मद्य घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या जामीन अर्जावर बुधवारी सुनावणी पूर्ण झाली आहे. त्यानंतर दिल्ली उच्च न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे. दिल्ली मद्य घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक यांच्याविरोधात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) कारवाई केली आहे. केजरीवाल यांचा घोटाळ्यात प्रमुख सहभाग असल्याचा ईडीचा आरोप आहे. केजरीवाल हे सध्या तिहार तुरुंगात असून त्यांनी जामीनासाठी अर्ज केला आहे. जामीन अर्जावर बुधवारी दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी झाली.
यावेळी ईडीने केजरीवाल यांच्या जामीनास विरोध केला. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे दिल्ली सरकारचे मंत्री, आप नेते आणि इतर व्यक्तींच्या संगनमताने दिल्ली उत्पादन शुल्क घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार आहेत. उत्पादन शुल्क धोरण २०२१-२२ बनवण्यात अरविंद केजरीवाल यांचा थेट सहभाग होता. केजरीवाल हे सामग्रीच्या आधारे हवाला प्रकरणाच्या गुन्ह्यात दोषी आहेत असे मानण्याची कारणे आहेत, असेही ईडीने नमूद केले आहे.
केजरीवाल यांना लोकसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करण्यापासून रोखण्यासाठी हे करण्यात आल्याचे त्यांचे वकील अभिषेक मनू सिंघवी म्हणाले. पहिल्या टप्प्याचे मतदान होण्यापूर्वीच केजरीवाल आणि त्यांचा पक्ष फोडण्याचा प्रयत्न होत आहे. त्यांच्याकडे कोणतेही पुरावे नाहीत, केवळ सरकारी साक्षीदारांच्या जबाबाच्या आधारे त्यांना अटक करण्यात आली असल्याचेही सिंघवी यांनी म्हटले.
‘आप’ नेत्या आतिशींना भाजपची मानहानीची नोटीस
भाजपने आपल्याला पक्षात येण्यासाठी संपर्क केला होता, असा दावा दिल्लीच्या मंत्री आतिशी यांनी नुकताच पत्रकारपरिषदेत केला होता. त्यावर दिल्ली प्रदेश भाजपने पलटवार केला आहे. भाजपने आतिशी यांना मानहानीची नोटीस पाठवली असून त्यांच्याकडून सार्वजनिक माफीची मागणी केली आहे, असे दिल्ली भाजप प्रदेशाध्यक्ष विरेंद्र सचदेव यांनी सांगितले आहे.