इटलीच्या ‘कॅलाब्रिया’ प्रदेशातील समुद्रात ‘कायदेशीर’ आणि ‘बेकायदेशीर’ मासेमारी यांच्यातील फरक संदिग्ध आहे. मच्छीमारांच्या पारंपरिक मासेमारी पद्धतींवर सक्तीच्या ‘टॉप-डाऊन’ नियमांमुळे मर्यादा आल्या आहेत. अशातच, मासळीच्या व्यापारात गुंतलेले मच्छीमार अमली पदार्थांच्या तस्करीमध्ये गुंतू लागले आहेत. इथल्या ‘नंद्रघेटा’ किंवा ‘कॅलेब्रियन माफिया’च्या उपस्थितीमुळे हा मुद्दा आणखी चिघळला आहे.
भूमध्य समुद्रात माशांच्या साठ्यात घट होत आहे. याकरिता, ‘सी शेफर्ड इटालिया’ या स्वयंसेवी संस्थेने पर्यावरणाच्या हानीसाठी बेकायदेशीर मासेमारीला जबाबदार धरले आहे. लंडनस्थित ‘ग्लोबल अफेअर्स’ ‘थिंक टँक’च्या अलीकडील अहवालानुसार, ‘इललिगल, अनरिपोर्टेड आणि अनरेग्युलेटेड’ (IUU) मासेमारीमध्ये गुंतलेल्या कंपन्यांचा अर्थव्यवस्थेवर, नोकरीच्या संधींवर आणि विकसनशील देशांच्या एकूण विकासावर गंभीर परिणाम होऊ शकतो.
नैऋत्य इटलीमधील कॅलाब्रिया येथील एका मच्छिमाराने माध्यमांशी बोलताना सांगितले की, “या किनारपट्टीवर बेकायदेशीर मच्छीमार आणि तस्करांचा मोठ्या प्रमाणात वावर आहे. परंतु, त्यांनी पत्रकारांशी बोलण्याचा निर्णय घेतला, कारण समुद्रातील माशांचा साठा आधीच कमी झाला असताना, वाढलेली मासेमारी म्हणजे पूर्ण विनाशाच्या दिशेने वाटचाल आहे, असे त्यांना वाटले. पण, हा निर्णय सोपा नव्हता. इतर मच्छीमार आणि स्थानिक ‘नंद्रघेटा’ किंवा ‘कॅलेब्रियन माफिया’ यांच्याकडून धमकी येण्याच्या भीतीने त्यांनी निनावी प्रतिक्रिया दिल्या.
याव्यतिरिक्त या क्षेत्रातील इतर स्रोतदेखील बेकायदेशीर मासेमारीबद्दल फक्त ‘ऑफरेकॉर्ड’ बोलतात. याचे कारण म्हणजे, ही परिस्थिती सर्वांना दिसते. नदीच्या मुखाशी किंवा किनार्याजवळ सुरू असलेल्या मासेमारीत प्रतिबंधित मासेमारी उपकरणे आणि नोंदणी नसलेल्या हौशी नौकांचा समावेश असतो. सहसा कायदेशीररित्या काम करणारे मच्छीमार कधीकधी मर्यादा ओलांडतात आणि बेकायदेशीर मार्ग अवलंबतात. येथील बहुतेकांना किमान एक बेकायदेशीर मच्छीमार माहीत असतो, असे सूत्रांनी मध्यांना सांगितले.
इटालियन पर्यावरण संघटना ‘लेगॅम्बिएंटे’च्या अहवालानुसार, २०२२ मध्ये, इटलीतील मासेमारीशी संबंधित १३ हजार, १७२ गुन्हे आणि प्रशासकीय उल्लंघने आढळून आली. म्हणजे दिवसाला किमान ३६ गुन्हे! इटलीमध्ये एकूण १५ किनारी प्रदेश आहेत, यापैकी, ४८ टक्क्यांपेक्षा जास्त घटना माफियाच्या उपस्थिती असलेल्या चार प्रदेशांमध्ये घडल्या, असे अहवालात म्हटले आहे. निनावी अहवाल तथा पोलिसांच्या तपासणी आणि जप्तीत, ‘स्वॉर्डफिश’, ‘किशोर सार्डिन’ आणि ‘ब्लूफिन ट्यूना’ या प्रजातींची अवैध मासेमारी होत असल्याचे समोर आले.
‘बार्गेनिंग पॉवर’ मिळविण्यासाठी आणि त्यांच्या उत्पादनांचा एकत्रितपणे प्रचार करण्यासाठी अनेक मच्छीमार सहकारी संस्थांमध्ये सामील झाले आहेत. ‘रेगिओ कॅलाब्रिया’ सरकारी अन्वेषण कार्यालयाने केलेल्या अनेक तपासांतून असे समोर आले आहे की, ‘नंद्रघेटा’ कुटुंबे माशांच्या विक्रीवर नियंत्रण ठेवतात. या तपासांमध्ये मासेमारीच्या संयोगाने करण्यात येणार्या इतर बेकायदेशीर बाबी समोर आल्या आहेत. उदाहरणार्थ, अमली पदार्थांची तस्करी.
मासेमारीच्या बोटींचा वापर करून समुद्रातून तस्करीसाठी फेकलेले अमली पदार्थ बाहेर काढले जातात. पिढ्यान्पिढ्या कोणताही बदल होऊ शकलेला नाही. या अडचणींमुळे अनेक स्थानिक तरुण मासेमारीकडे दुर्लक्ष करू लागले आहेत. या भागात मच्छीमार मोठ्या मासेमारी नौका वापरत नाहीत, तर हजारो लहान बोटी, पारंपरिक मासेमारीचा सराव करतात. येथील स्थानिक मच्छीमार इटालियन आणि युरोपीय कायदे आणि संबंधित नोकरशाही वृत्तीबद्दल असंतोष व्यक्त करतात.
सॅटेलाइट ट्रॅकिंग डिव्हायसेस आणि आधुनिक पुरवठा साखळी ट्रॅकिंग सिस्टमसारखे तंत्रज्ञान ‘कॅलाब्रिया’च्या अवैध मासेमारीच्या समस्येचे निराकरण करण्यात मदत करू शकते. येथे वापरल्या जाणार्या लहान बोटींमुळे प्रभावीपणे नियंत्रण करणे आव्हानात्मक ठरते. कारण, सॅटेलाईट ट्रॅकिंग डिव्हायसेस नाहीत. कायदेशीर मच्छीमार त्यांच्या बोटीवर बोर्डवर कॅमेरे ठेवण्यास सहमत होतील, त्यांना कायदेशीर काम दाखविण्यात कोणतीही अडचण नाही. प्रश्न आहे, बेकायदेशीर मच्छीमारांचा. पण, ‘मांजरीच्या गळ्यात घंटा बांधणार कोण?’ हा प्रश्न अनुत्तरित राहिल्यामुळे समस्या अजूनही कायम आहे.