गृहिणी ते प्राध्यापक, समाजसेविका ते लेखिका, असे कार्यवर्तुळ प्रकाशमान केलेल्या चेंबूरच्या स्वाती सुधीर वैद्य. त्यांच्या जीवनाचा मागोवा घेणारा हा लेख...
मुसलमान व्हा, तुम्हाला कसलाच त्रास होणार नाही,’ असे म्हणत रझाकार त्यावेळी बीडच्या गावागावात फिरायचे. कारण, त्यावेळी बीड निजामाच्या अधिपत्याखाली होते. मात्र, गोपिकाबाई आपल्या नातीला मंगलला घेऊन घोड्यावर बसत आणि पंचक्रोशीत फिरत. शेतीभातीची व्यवस्था लावत. त्या म्हणत, “ईश्वराच्या पुढे कोणी नाही. माझा धर्म मी कधीच सोडणार नाही आणि कोणाला घाबरणारही नाही.” अशा निर्भीड संस्कारांमध्ये मंगल वाढली. त्याच मंगल आज स्वाती वैद्य म्हणून मुंबईच्या सामाजिक-शैक्षणिक आयामात प्रसिद्ध आहेत. त्या आज ‘बालविकास संघ संस्थे’त कार्यरत असून ‘प्रभात कुंज मंडळ, चेंबूर’ या ज्येष्ठांसाठी असलेल्या संस्थेतही त्या सक्रिय आहेत.
तसेच, ‘चेंबूर महिला समाज’ या नावाजलेल्या संस्थेत त्या अध्यक्ष आहेत. त्यांचे पती सुधीर वैद्य हे १९७१च्या भारत-पाकिस्तान युद्धात प्रत्यक्ष रणांगणावर होते. युद्धातील त्यांच्या प्रत्यक्ष अनुभवावर आधारित ‘जिद्द...एका सैनिकाची’ हे पुस्तकही स्वाती यांनी लिहिले. त्या पुस्तकाला ‘राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले साहित्य भूषण पुरस्कार’ तसेच, ‘मराठा मंदिर, मुंबई’ यांचा चरित्रात्मक पुस्तकासाठी असलेला तृतीय क्रमांक मिळाला आहे. त्यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्यासाठी त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
पेशाने शिक्षिका असलेल्या स्वाती यांनी अक्षरशः हजारो विद्यार्थ्यांना घडविले. चेंबूर परिसरातील विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानवादी, पण तितकाच धर्मनिष्ठ विचार रूजविण्यामध्ये स्वाती यांचे योगदान आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून स्वाती यांनी परिघाबाहेर जाऊन काम केले. त्यातील एक दोन उल्लेखनीय उदाहरणे पाहू. त्यांच्या शाळेतील एक विद्यार्थिनी अतिशय हुशार. नववीत ती शाळेत पहिली आली. मात्र, उन्हाळ्याच्या सुट्टीत तिच्या पालकांनी तिचे लग्न ठरविले.
तिच्या सासरच्यांची अट होती, मुलीने पुढे शिकू नये. आम्हाला काय, मुलीला नोकरीला पाठवायची आहे.
मात्र, त्या मुलीला शिकायचे होते. हे स्वाती यांना कळले. त्यांनी इतर सहशिक्षकांशी चर्चा केली. मुलीच्या पालकांना त्या भेटल्या. मुलीला पुढील शिक्षणाची संधी मिळेल, यासाठी प्रयत्न केले. एका विद्यार्थ्याची आई वारली. त्याच्या शिक्षणाकडे लक्ष देणारे कोणी उरले नाही. त्यावेळी त्या मुलाला स्वत:चा मुलगा मानून स्वाती यांनी त्याची काळजी घेतली. त्याला शिक्षणाची गोडी लागावी, शिक्षण घेताना कोणतीच अडचण येऊ नये, यासाठी प्रयत्न केले. तो मुलगा अमेरिकेमध्ये एका स्पर्धेत 200 मुलांमध्ये प्रथम आला. हे कळताच त्याने अमेरिकेहून पहिला संपर्क केला, तो स्वाती यांना. हे प्रेम, हा आदर स्वाती यांना मिळाला. कारण, त्यांनी विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या संपर्कात येणार्या प्रत्येकाला केलेले सहकार्य. स्वाती यांच्या भूतकाळाचा मागोवा घेऊ.
अहमदनगर येथील दिघोळ गावचे विष्णूपंत आणि शकुंतला इनामदार यांना चार अपत्ये. त्यापेकी एक मंगल. विष्णूपंत आणि शकुंतला दोघेही शिक्षक. वयाच्या दहाव्या वर्षापर्यंत मंगल त्यांच्या आजी गोपिकाबाई यांच्याकडे राहत असत. पुढे त्यांचे आईबाबा बीडमधील पाटोदा येथे आले. त्यावेळी स्वातीही त्यांच्यासोबत राहायला गेल्या. मंगल यांच्या आईचे माहेर हे रा. स्व. संघाच्या मुशीतले. त्यामुळे देशप्रेम, धर्मनिष्ठा ही स्वाती यांच्या रक्तातच होती. या सगळ्या संस्कारात त्यांचे बालपण गेले.
असो. त्याकाळी शिक्षकांना वेतन तितकेसे नसे. त्यामुळे इनामदार कुटुंबाकडे संस्कृतीची सुबत्ता असली, तरी आर्थिक सुबत्ता नव्हती.
मात्र, मुलांनी उच्चशिक्षण घ्यावे, असे इनामदार दाम्पत्याला वाटे. त्यामुळेच त्यांनी मंगल यांना शिक्षणासाठी बीड शहरात पाठविले. तिथे खासगी शिकवणी घेऊन मंगल यांनी अर्थार्जन केले. त्या पैशांतून त्यांनी स्वत:चे शिक्षण पूर्ण केले. पुढे त्यांचा विवाह सुधीर वैद्य यांच्याशी झाला आणि मंगलच्या स्वाती होऊन त्या सासरी चेंबूरला आल्या. सुधीर आणि स्वाती यांना दोन मुले झाली. एक स्मिता आणि दुसरा गणेश. लेक स्मिताच्या शाळेतच त्यांना विज्ञान शिक्षिका म्हणून नोकरी लागली.
घर, संसार, नोकरी सांभाळत त्यांनी त्यावेळी बी. एड. आणि एम.एड.चे शिक्षण पूर्ण केले. पुढे त्या महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून रूजू झाल्या. किशोरवयीन मुले, तरुण मुले काय विचार करतात? समाजाचे वास्तव काय आहे? या सगळ्यांचा वेध घेत त्यांना कळले की, आता समाजात भौतिक स्तरावर स्थैर्य असले, तरीसुद्धा युवकांना संस्कार, वास्तवाचे ज्ञान म्हणावे तितके नाही. त्यातूनच मग स्वाती यांनी या विद्यार्थ्यांसाठी जागृती शिबिरे आयोजित केली, परिसरातील विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी, म्हणून कार्य सुरू केले.
पनवेलजवळ वाकडी येथील शांतीवन येथे कुष्ठरोग्यांच्या सेवेसाठी किंवा वनवासी कल्याण आश्रम, तलासरी येथे त्या सहकार्यांसोबत विद्यार्थ्यांसाठी शिबिरे आयोजित करू लागल्या, उपक्रम राबवू लागल्या. त्यामुळे परिसरातील विद्यार्थ्यांच्या ज्ञानाच्या आणि अनुभवाच्या कक्षा रूंदावल्या. पुढे नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर स्वाती पूर्ण वेळ समाजकार्य करतात. ज्येष्ठ नागरिकांच्या आयुष्यातल्या समस्या सोडविण्यासाठी, महिला सक्षमीकरणासाठी काम करतात. त्या म्हणतात, “समाज म्हणजे आपणच. समाजामध्ये सकारात्मकता संवर्धित व्हावी, म्हणून पुढेही काम करायचे आहे.” समाजाच्या हिताचे कार्य करणार्या सामान्यांतल्या असामान्य स्वाती वैद्य यांच्या कार्याला शुभेच्छा.
९५९४९६९६३८