बेताल, भन्नाट, बाष्कळ

    28-Apr-2024   
Total Views |
 UBT
 
निवडणुकांचा हंगाम आला की, राजकीय पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपाची स्पर्धा सुरू होते. पण, काही नेते मात्र यामध्ये पातळी सोडून शैलीच्या नावाखाली वाट्टेल ते बरळतात. पण, यांना जाब विचारणार तरी कोण? नेत्यांचा बाष्कळपणा आणि मतदारांची उदासीनता यामुळे देशात फोफावलेल्या परिस्थितीविषयी या लेखात आढावा घेऊया....
 
बेताल, भन्नाट, बाष्कळ, बेसुमार बोंबलण्यात महाराष्ट्रात उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि सुषमा अंधारे या तिघांची कोणी बरोबरी करू शकत नाही. आमची त्यांना अशी विनंती आहे की, दि. ४ जूनपर्यंत असे बेताल, भन्नाट, बेसुमार बाष्कळ बोलण्याचे त्यांनी अजिबात बंद करता कामा नये. ते जर उद्या संयमाने बोलू लागले किंवा राजकीय सभ्य भाषेत बोलू लागले, तर भाजप आणि मित्रपक्षांची पंचाईत होईल. ते लोकादराचे पात्र होतील आणि लोकांचा असा समज होईल की, ही मंडळी महाराष्ट्राचे नेतृत्व कणखरपणे करण्यास समर्थ आहेत. म्हणून उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि सुषमा अंधारे यांनी अशीच बेताल वक्तव्ये रोजच्या रोज करावी.
 
आपल्या मराठी भाषेमध्ये अनेक शब्दकोश आहेत. संस्कृत-मराठी, हिंदी-मराठी, इंग्रजी-मराठी असे अनेक शब्दकोश आहेत. उणीव शिव्यांच्या शब्दकोशाची होती. उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि सुषमा अंधारे या तिघांनी ती भरून काढली आहे. मराठी भाषेचा अभ्यास करणार्या एखाद्या स्कॉलरने, लवकरात लवकर मराठी राजकीय शिव्यांचा शब्दकोश करावा. शक्यतोवर विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी करावा, त्याचा फायदा या तिघांना नक्की होईल. आतापर्यंत या तिघांनी साप, विंचू, घोडा, गाढव इत्यादी सर्व प्राणी आणून झालेले आहेत. नंतर खोके आले, मग गद्दार, हरामखोर, विश्वासघातकी आणि आता नालायक, कोडगा असे नवीन दोन शब्दप्रयोग आणलेले आहेत. शब्दांचे असे असते की, तेच तेच शब्द सतत वापरले, तर ते बाजारात चालत नाहीत. ज्याप्रमाणे एखादे नाणे असंख्य वेळा हाताळले जाते, तेव्हा ते गुळगुळीत होते. मग त्याला नंतर काहीही मूल्य राहत नाही. असे या तिघांच्या बाबतीत होऊ नये, म्हणून लवकरात लवकर मराठी भाषाशब्दप्रभूंनी ‘मराठी शब्दशिवीकोश’ तयार करावा.
 
आणखी एक गोष्ट येणार्या काळासाठी करायला पाहिजे, ती म्हणजे उद्धव ठाकरे यांना भाजपने दिलेली आश्वासने. त्यांचा कोश होऊ शकणार नाही. परंतु, कॉफी टेबलबुक होऊ शकते. अडीच वर्षे ते मुख्यमंत्रिपद हे कधी दिले गेले? कोणत्या खोलीत दिले गेले? ती खोली ‘मातोश्री’त होती की आणखी कोठे होती? त्या खोलीची लांबी-रूंदी किती होती? आतली सजावट कशी होती? आणि साक्षीला कोणी होते का? असे सर्व त्या पुस्तकात असावे. कॉफी टेबलबुकमध्ये चित्र असणे फार गरजेचे असते.
 
उद्धव ठाकरे गेले वर्षभर सांगत आहेत की, ‘मी बाळासाहेबांना वचन दिले होते की, मी शिवसेनेचा मुख्यमंत्री करीन.’ आता हे वचन उद्धव यांनी बाळासाहेबांना कोणत्या खोलीत दिले? वचन देत असताना बाळासाहेब कोठे बसले होते? त्यांचा पोशाख काय होता? उद्धव ठाकरे यांचे हे बोलणे ऐकून बाळासाहेब त्यांना काय म्हणाले? त्यांनी आशीर्वाद दिला की शांत बसले? उद्धव ठाकरे असे म्हणाले का, की मुख्यमंत्री शिवसेनेचा होणार म्हणजे मीच होणार? शिंदे, राऊत, सावंत, खैरे यापैकी कोणी होणार नाही, असे त्यांनी म्हटलेे का? आणि या सर्वाला साक्षी कोण? संजय राऊत किंवा सुषमा अंधारे हे साक्षीला होते का? असे आतापर्यंत काही जाहीर झालेले नाही, उद्या काय होईल हे सांगता येणार नाही. कारण, उद्धव ठाकरेंच्या बाबतीत काहीही होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
 
कॉफी टेबलबुकसाठी आणखी एक विषय आहे, तो आदित्य ठाकरे यांचा आहे. उद्धव ठाकरे यांना देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा बंद खोलीत आश्वासन दिले की, ‘मी आदित्यला अडीच वर्षे मुख्यमंत्री करतो आणि त्याची तयारी करून घेतो.’ तेव्हा उद्धव ठाकरे यांनी त्यांना विचारले की, तुम्ही कोठे जाणार आहात? त्यावर देवेंद्र म्हणाले, मी वर जाणार आहे. वर म्हणजे दिल्लीत जाणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या मनात वर जाणार आहे म्हणजे कोठे जाणार आहे, हे त्यांना माहीत. हे सर्व संभाषण कोठल्यातरी खोलीत झालेले आहे, तर ही खोली कुठे होती? कोणत्या इमारतीत होती? तिला लिफ्ट होती की जिने होते? आणि पुन्हा याला साक्षीदार कोण?
  
राजकारणाची काय गंमत असते बघा! राजकारणात आरोप आपणच करायचे. मुख्य साक्षीदार आपणच व्हायचे. आरोपीच्या विरोधाचा युक्तिवाद आपणच करायचा आणि आरोपीला शिक्षाही आपणच द्यायची. आता वाचक विचारतील की, हे सर्व करणारा महाराष्ट्रातील आदर्श नेता कोण? तर ते उद्धव ठाकरे आहेत हे सांगायलाच पाहिजे का? त्यांचे एक भाऊबंद अरविंद केजरीवाल. सध्या तिहार तुरुंगाची हवा खात बसले आहेत. त्यांनी एक कथानक चालविलेले आहे. ‘तिहार तुरुंगातमध्ये मला मारण्याचा प्रकार चाललेला आहे. मला मधुमेह आहे. तो वाढविण्याचे प्रयत्न चालू आहेत. मला पक्षाघात व्हावा, अशी सर्वांची इच्छा आहे.’ उद्धव काय किंवा केजरीवाल काय दोघेही राजकारणी आणि राजकारण्यांना कथानके निर्माण करावी लागतात. त्यात दोघेही एकमेकांचे स्पर्धक झालेले आहेत.
  
हे शिवीगाळाचे राजकारण, विश्वासघाताचे राजकारण, न दिलेल्या आश्वासनांचे राजकारण, कशासाठी चालले आहे? या राजकारणाचा हेतू सामान्य माणसाचे जीवन सुखी आणि आनंदी करणे हा नाही. जनहिताचा या राजकारणाशी सुतराम संबंध नाही. या राजकारणाचा संबंध केवळ आणि केवळ सत्ताप्राप्तीसाठी आहे. सत्ता कशाला पाहिजे? तिचा जनहितासाठी काही उपयोग करायचा आहे का? सत्तेच्या माध्यमातून लोककल्याण साधायचे आहे का? सत्तेच्या माध्यमातून शेतकर्यांचे प्रश्न सोडवायचे आहेत का? उत्तम शिक्षण द्यायचे आहे का? तर, यापैकी काहीही करायचे नाही. अडीच वर्षांत अर्धवट राहिलेली वसुली पुढच्या काळात पूर्ण करायची आहे. कोट्यवधी रुपये मिळविण्यासाठी उद्योग घालावा लागतो. प्रचंड कष्ट करावे लागतात. सत्तेच्या माध्यमातून आरामात अब्जावधी होता येते. ही आपल्या सर्व राजकीय व्यवस्थेची शोकांतिका आहे. त्याविषयी कुठलाही राजकीय नेता चुकूनही काही बोलत नसतो.
 
 
शेवटी आपण मतदार, लोकशाही व्याख्येप्रमाणे राजे आहोत. परंतु, आमचे राज्यसुद्धा कसे आहे, तर अंगावर फाटकी वस्त्रे, पायात तुटलेल्या वहाणा, असलेच तर डोक्याला मळके पागोटे-मुंडासे, उन्हाने भाजलेली कातडी आणि सिग्नलवर गाडी थांबली की, दीनवाणा चेहरा केलेले पसरलेले हात, ही लोकशाहीतील राज्याची स्थिती आहे. इकडचा मतदार परिवर्तनासाठी आवश्यक मतदान करण्यासाठीही घराबाहेर पडत नाही. होणारे मतदान हे ४५ टक्के ते ५५ टक्के इतकेच असते. याचा अर्थ मतदारराजा झोपून राहतो आणि मग उद्धव, संजय आणि सुषमा यांच्यासारख्यांना रान मोकळे होते. आपल्याला आवडत नसले तरीही बातम्यांतून ते ऐकावे लागते आणि वृत्तपत्रांतून ते वाचावे लागते. शेवटी, हेच खरे की, आपण आपल्या जीवनाचे शिल्पकार असतो. जीवनाचे शिल्प करायचे की जीवन ओबडधोबड करायचे, हे आपणच ठरवायचे आहे.