मुंबई (अक्षय मांडवकर) - कीटक वर्गातील एक दुर्लक्षित गट म्हणजे ‘मॉथ’ अर्थात पतंग. या पतंगाच्या एका प्रजातीची महाराष्ट्रामधून प्रथमच नोंद करण्यात आली आहे (orange spotted jewel moth). ‘लेडीबर्ड एन्व्हायर्नमेंटल कन्स्लटिंग’च्या कीटकशास्त्रज्ञ डॉ. व्ही. शुभालक्ष्मी यांनी ‘ऑरेंज स्पॉटेड ज्वेल’ (orange spotted jewel moth) या पतंगाची राज्यातून पहिल्यांदाच नोंद केली आहे. सर्वसामान्यत: मध्य भारतात आढळणार्या या पतंगाच्या अधिवासाचा विस्तार झाला असून कल्याण आणि गडचिरोली येथे त्याचे अस्तित्त्व दिसून आले आहे. (orange spotted jewel moth)
पावसाळा सुरू झाल्यानंतर घराबाहेर असलेल्या दिव्याच्या खाली भिंतीवर लहान मोठ्या किटकांची नक्षी दिसते. सुरुवातीस ती आपल्याला फुलपाखरं वाटतात. मात्र, ते असतात पतंग म्हणजेच मॉथ. चार ते पाच महिन्यांपुरत्या येणार्या या आगंतुक पाहुण्याच्या जीवनचक्रात अनेक रहस्ये दडलेली आहेत. पतंगांचा समावेश संधिपाद संघाच्या कीटक वर्गातील खवलेपंखी गणात होतो. या दुर्लक्षित कीटकांवर अभ्यास करण्याचे महत्त्वपूर्ण काम ‘मॉथ लेडी’ डॉ. व्ही. शुभालक्ष्मी करत आहेत. त्यांनी ‘ऑरेंज स्पॉटेड ज्वेल’ या पतंगाची महाराष्ट्रात पहिल्यांदाच नोंद केली आहे. त्यासंबंधीचा संशोधन लेख ‘एंटोमोलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया’च्या बायोनोट्स नियतकालिकामध्ये शनिवार, दि. 13 एप्रिल रोजी प्रकाशित झाला आहे.
पतंग हे सर्वसामान्यत: निशाचर असल्याचे म्हटले जाते. मात्र, ‘ऑरेंज-स्पॉटेड ज्वेल’ हा पतंग दिनचर आहे. ‘ट्रायपॅनोफोरा सेमिह्यॅलिना कोल्लर’ या शास्त्रीय नावाने हा पतंग ओळखला जातो. त्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या अर्ध-पारदर्शक पंखांवर असणार्या काळ्या, पिवळ्या आणि नारिंगी रंगाच्या रचना. याची नर आणि मादी वेगवेगळी दिसते. या पतंगाचा अधिवास पूर्वी मध्य, वायव्य आणि ईशान्य भारतात होता. मात्र, आम्हाला ठाणे जिल्ह्यातील कल्याणमधील आंबिवली जैवविविधता उद्यान आणि गडचिरोलीतील दोधी गावात या पतंगाच्या अळ्या आढळल्याची माहिती डॉ. व्ही. शुभालक्ष्मी यांनी दै. मुंबई तरुण भारत’शी बोलताना दिली. महाराष्ट्रातील या पंतगाची ही पहिलीच नोंद असून त्याच्या अधिवासाचा विस्तार झाल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. याशिवाय त्यांनी या पतंगाच्या नव्या खाद्य वनस्पतींचीही नोंद केली आहे. कल्याणमधील चिंचेच्या झाडावर, तर गडचिरोली येथे तेंडूवर या पतंगाच्या अळ्या त्याची पाने खाताना दिसल्याचे शुभालक्ष्मी यांनी सांगितले.
अभ्यासाची गरज
ऑरेंज-स्पॉटेड ज्वेल हे पतंग स्वसंरक्षणासाठी हायड्रोजन सायनाइटच्या विषारी आम्लाच्या द्रव्याचे थेंब आपल्या शरीरावर उत्सर्जित करतात. या विषारी थेंबांमुळे ते भक्षकापासून स्वत:चे रक्षण करतात. पतंग हे कीटक अजूनही प्रसिद्धीच्या झोतापासून दूर आहेत. त्यामुळे त्यावर सखोल अभ्यास झालेला नाही. परिणामी अजूनही नव्या नोंदी होत आहेत. - डॉ. व्ही. शुभालक्ष्मी, कीटकशास्त्रज्ञ