सतगुरू श्री रामचंद्र

    16-Apr-2024
Total Views |
ram 3
 
राम नवमीच्या निमित्ताने जनमनाचा वेध घेताना प्रभू रामचंद्र आणि शीख संप्रदाय यांचे अतूट नाते समोर आले. शीख संप्रदायासाठी प्रभू रामचंद्र हे सतगुरू स्थानी असल्याने, परमपूजनीय आहेत. या लेखातून या नात्यांचा वेध घेऊया...
 
श्रीराम नवमीचा उत्सवानिमित्ताने देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. अयोध्येत प्रभू रामचंद्रांचे भव्य मंदिर झाल्यानंतर, प्रथमच श्रीराम नवमी साजरी होत असल्याने, देशातील हिंदूंच्या आनंदाला उधाण आले आहे. प्रभू रामचंद्र हे संपूर्ण भारताचे आराध्य! म्हणूनच तर श्रीराम मंदिराच्या अभिषेक प्रसंगी सर्व देशवासीयांनी दिवाळीसारखी साजरी केली. त्यात शीख पंथही आघाडीवर होता. याचे एक कारण आहे, सतगुरू नानक देवजी. हे भगवान श्री रामचंद्र यांचेच अवतार असल्याची शीख पंथीयांची मान्यता आहे. तसे ’श्री गुरू ग्रंथ साहिबा’जीच्या ओवी क्रमांक-१३९० मध्ये लिहिलेले आहे.
 
त्रेतै तै माणिओ रामु रघुवंसु कहाइओ।
कलिजुगि प्रमाणु नानक गुरु अंगदु अमरु कहाइओ॥
 
शिखांचे गुरू साहिबान हे सूर्यवंशीे भगवान श्रीरामचंद्रांच्या वंशातील बेदी आणि सोधी या गोत्रांमध्ये प्रकट झाले आहेत. सतगुरू गोविंद सिंहजींनी आपल्या भाषणात ’तीन बेदीयन की कुल बिखै प्रगटे नानक राए’ असे लिहिले आहे.
सोढी वंश आणि सत्गुरू गोविंद सिंहजी यांनी स्वतःबद्दल लिहिले आहे की,
 
अब मैं कहो सु अपनी कथा। सोढ़ी बंस उपजिया जथा
सोढ़ीराइ धरा तिह नामा. वंस सनौढ़ ता दिन ते थीआ।
परम पवित्र पुरख जू कीआ॥
 
सोढी वंशाबद्दल अधिक माहिती देताना, ’गुरू ग्रंथ साहेब’च्या १४०७व्या ओवीत लिहितात-
’कुलि सोढी गुर रामदास तनु धरम धुजा अरजुनु हरि भगता।’
जन्मसाखीेसुद्धा ( शिख संप्रदायाच्या रचना) याला प्रमाण आहे.
’सूरज कुल ते रघु भया, रघुबंसी भया राम।
रामचंद्र के दुइ सुत, लव-कुश तिह नाम।
इह हमारे बड़े हैं, जुगां जुगां अवतार।
इन्ही के घर उपजे, नानक कल अवतार’॥
गुरुवाणी की उपरोक्त पंक्तीच्या माध्यमातून, भगवान रामचंद्र शिख गुरू साहेब यांचे पूर्वज होते, हे समजते. शीख धर्मात श्रीरामांचा उल्लेख सतगुरू असा करण्यात आला आहे.
 
’त्रेते सतिगुर राम जी रारा राम जपे सुख्खु पावै’।
सतिगुरू अर्जुन देव यांनी प्रभूच्या अवतारांची गणना केली असून, त्यात त्यांनी रघुकुळात निर्गुण निराकार भगवंतानी रामचंद्र म्हणून अवतार धारण केला, असे म्हटले आहे.
’स्त्री रामचंद जिसु रूपु न रेखिआ ॥ बनवाली चक्रपाणि दरसि अनूपिआ॥
सहस नेत्र मूरति है सहसा इकु दाता सभ है मंगा’ (ओवी १०८२)।
 
अशा प्रकारे गुरुवाणीला आधारभूत मानून आपण असे ठामपणे म्हणू शक़तो की, शीख गुरू साहिबान हेे प्रभू रामांचेच स्वरूप असल्यानेे, शीख पंथासाठी सुद्धा प्रभू रामचंद्र हे पूजनीय आहेत. हरीमंदिर साहेब मंदिराचा चार वेळा ध्वंस करणार्‍या, तसेच सतिगुरू नानक देवजी यांना यातना देणार्‍या सतिगुरू अर्जुन देवजी, सतिगुरू तेग बहादुरजी, चार साहीबजादे, माता गुजरीजी आणि लाखो शिखांना शहीद करणार्‍या मुघलांनी पाडलेले राम मंदिर, पुन्हा भव्य स्वरुपात उभे राहिले असून, तिथे आता प्रत्यक्षात प्रभू विराजमान झाले आहेत, ही संपूर्ण देशवासीयांबरोबर शीख समुदायासाठी अभिमानाची बाब आहे.
 
अयोध्या ही अनेक धर्मांसाठी एक पवित्र भूमी झाली आहे. हिंदूंव्यतिरिक्त जैन, बौद्ध आणि शीख यांच्यासाठी सुद्धा ही अयोध्येची भूमी पवित्र आहे. अयोध्येतील गुरुद्वारा श्री ब्रह्मकुंड साहिबला भेट देण्यासाठी, जगाच्या कानाकोपर्‍यातून शीख भाविक येत असतात. शीख समुदायाचे पहिले गुरू नानकदेवजी, नववे गुरू तेग बहादूरजी आणि दहावे गुरू गोविंद सिंगजी यांनी येथे गुरुद्वारा श्री ब्रह्मकुंड साहिबमध्ये ध्यान केले होते. ज्याचे पुरावे आजही उपलब्ध आहेत. एकीकडे गुरुद्वारा श्री ब्रह्मकुंड साहिबमध्ये गुरू गोविंद सिंगजींच्या अयोध्या भेटीच्या साक्षीशी संबंधित छायाचित्रे आहेत. रामजन्मभूमीच्या रक्षणासाठी मुघलांशी युद्ध करण्यासाठी आलेल्या निहंग सैन्याने प्रथम गुरुद्वारा ब्रह्मकुंड साहिबमध्ये तळ ठोकला, असे सांगितले जाते. ज्या शस्त्रांनी मुघल सैन्याचा पराभव झाला, ती शस्त्रे आजही या गुरुद्वारामध्ये आहेत. गुरुंनी अयोध्येच्या रक्षणासाठी निहंग शिखांचा एक मोठा गट पाठवला होता, ज्यांनी युद्ध करून रामजन्मभूमी मुक्त केली आणि ती हिंदूंच्या ताब्यात देऊन ते पंजाबला परत गेले.
 
गुरूंच्या शब्दांत उपलब्ध असणार्‍या इतिहासातील अशा थेट पुराव्यांमुळे शीख पंथातील नामधारी, निहंग आणि इतर शीख पंथीयांनी राम मंदिराच्या प्रतिष्ठानाच्यावेळी अयोध्येत लंगर उभारले, ही आनंददायी बाब आहे.हा योगायोग मानला पाहिजे की, श्री राम जन्मभूमीबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या ठीक एक वर्ष अगोदर नोव्हेंबर २०१८ मध्ये, दिवाळीच्या मुहूर्तावर या मी हैद्राबाद, सूरत, कानपूर, अमृतसर आणि दिल्ली इथल्या चार शीख बांधवासह, गुरुद्वारा श्री ब्रह्मकुंड साहिब येथे अखंड पाठ आणि प्रार्थना करण्यासाठी अयोध्येला गेलोे होतो. त्यावेळी तिथे श्रीराम जन्मभूमीचा प्रश्न सुटावा आणि तिथे लवकरात लवकर भगवान श्रीरामाचे भव्य मंदिर बांधले जावे, अशी प्रार्थना केली होती. वाहेगुरुजींनी आमची प्रार्थना ऐकली आणि अगदी एका वर्षाच्या आत दि. ९ नोव्हेंबर २०१९ रोजी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय श्री राम जन्मभूमीच्या बाजूने आला. खर्‍या मनाने केलेल्या प्रार्थनेची ही शक्ती आहे.
 
प्रार्थना पूर्ण झाल्याच्या निमित्ताने, श्री रामललाच्या अभिषेकपूर्वी, उत्तर प्रदेश शीख समुदायाने गुरुद्वारा श्री ब्रह्मकुंड साहिब येथे विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष, आलोक कुमारजी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहसरकार्यवाह गोपाल कृष्णजी यांच्या उपस्थितीत सलग तीन दिवस अखंड पाठाचे आयोजन करण्यात आले होते. ज्याची समाप्ती दि. २१ जानेवारी रोजी झाली आणि बरोबर दुसर्‍याच दिवशी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एका भव्य सोहळ्याच्या साक्षीने भगवान श्री रामललाला त्यांच्या हक्काच्या मंदिरात विराजमान होताना संपूर्ण जगाने पाहिले.
सरदार आर. पी.सिंग
(लेखक भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते आहेत.)