योगशैली - लेखांक १

    16-Apr-2024
Total Views |

Yoga


योग ही एक जीवनशैली आहे. जीवन म्हणजे जन्म व मृत्यू या दोन घटनांतील प्रवास आणि शैली म्हणजे पद्धती. सध्या योगशिक्षण हे फक्त शरीरापुरतेच मर्यादित झाले आहे, असे बहुतांशपणे दिसते. पण, नश्वर शरीर हाच फक्त योगशास्त्राचा उद्देश नाही, तर वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक व वैश्विक जीवन स्वस्थ, समृद्ध, सुरक्षित व संपन्न करून जीवनाचे परमोच्च ध्येय साध्य करणे, हा योगशास्त्राचा उद्देश आहे. केवळ योगासनात्मक व्यायाम करणे, प्राणायाम करणे म्हणजे योग करणे (?) की, स्वास्थ्य म्हणजे काय, हे समजून घेऊन त्यानुसार आचरण करणे म्हणजे योग करणे? हे समजून घेणे, हा या लेखमालेचा उद्देश आहे.

शरीर, मन व आत्मा यांचे समन्वयन म्हणजे स्वास्थ्य व त्यानुसार दिनचर्येत योग समाविष्ट करणे म्हणजे योग करणे होय. योग म्हणजे जोडणे, हे सर्वश्रुत आहेच. शरीर-मनाला, मन-आत्म्याला व शेवटी आत्मा- परमात्म्याला जोडणे हे महत्त्वाचे. प्रत्येक व्यक्तीने असे स्वत:ला परमात्म्याशी जोडले पाहिजे, मग ती स्त्री असो किंवा पुरुष असो. यासाठी जीवनाचा उद्देश साधून प्रत्येकाने आपल्या जीवनाचे सार्थक करणे, ते कसे हे योगशास्त्रीय संकल्पनेतून अभ्यासणे व ते परमोच्च उद्दिष्ट आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे, असे संकल्पून आपली दिनचर्या आखणे म्हणजे योग करणे होय.

तसे केले असता, आपल्या जीवनाकडे आपण त्रयस्थ म्हणून बघू शकतो व आपले गुण जतन करून आपल्यातले दोष काढण्यासाठी आपली आपणच मदत करू शकतो. त्यासाठी यम, नियम अभ्यासून त्यांचा अंगीकार करावा लागतो. त्याबाबतचे स्वीकारात्मक विवेचन आपण या लेखमालेत करणार आहोत. ते अंगीकार करत असताना आपला वैयक्तिक फायदा काय? हे प्रामुख्याने बघणार आहोतच. त्याचबरोबर वैयक्तिक, कौटुंबिक व सामाजिक स्वास्थ्य कसे प्राप्त होते, हेही बघणार आहोत. हे सर्व करत असतानाच आपली सामाजिक जबाबदारी पार पडत असल्याने, सहज ध्यान शक्य होत नाही. योगातील ध्यान लागते ते कोणी करू शकत नाही, तर ध्यान हे कुणाला लागते? ज्याने यम, नियमांची शिस्त अंगी बांधली आहे त्याला. त्याशिवाय ध्यान लागत नाही.

ध्यानाचे वैयक्तिक व सामाजिक असे खूप फायदे आहेत. त्यातला प्रमुख लाभ म्हणजे आपपर भाव मिटणे. म्हणून नुसती आसनं आणि प्राणायाम करणे म्हणजे योग करणे नव्हे. या यम, नियमांच्या शिस्तींचे पालन म्हणजेच व्यक्तीचा गुणात्मक विकास व पर्यायाने समाजाचा विकास. या गुणवर्धनातूनच समाज घडतो. कारण, प्रत्येक व्यक्ती ही या समाजाचा केंद्रबिंदू आहे. हेच पंतप्रधान नरेंद्र मोदींना अपेक्षित असावे. म्हणूनच त्यांनी 21 जून हा ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’ घोषित करवून घेतला. योगशाळा, महाविद्यालये, कार्यालयात या पद्धतीने योग शिकवावा, असे त्यांनाही अभिप्रेत असावे. ज्यामुळे आपल्यात धैर्य, निर्वेरता, निर्भयता, पर्याप्तता आणि पावित्र्य हे सद्गुण निर्माण होतात. तसेच जीवनात शुद्धता, समाधान, सातत्य, ज्ञान, नम्रता प्राप्त होऊन अहंकार या आपल्या शत्रूचा पराभव होतो.

स्वकर्माप्रती आस्था व प्रेम निर्माण होऊन कौशल्य प्राप्त करता येते. जीवन सफल होते. समाजजीवनात कलह, गुन्हे, भ्रष्टाचार कमी होण्यास मदत होते. योगशास्त्र शिकवण्याच्या पद्धतींवरून ते रोग व्याधींवर योगोपचारसुद्धा ठरते. योगातील अष्टांगे म्हणजे यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा व समाधी. ही प्रत्येक व्यक्तीने आपल्या जीवनात कशी उतरवावी, याचा अभ्यास म्हणजेच योगाभ्यास. त्यामुळे जीवन सुखकर, शांत, आनंदी व समाधानी होते. निष्कारण होत असलेली वखवख, हेवेदावे, तणावपूर्ण वातावरण, रोगग्रस्त शरीर तथा मानसिक व्याधी यावर आपला उपाय आपणच शोधून स्वस्थता प्राप्त करून घेऊ शकतो. त्यासाठीच वर म्हटले आहे - नुसते आसन, प्राणायाम वर उडी मारून योग साधत नाही, तर यम, नियम हे दैनंदिन जीवनात कसे उतरवायचे, याचे उपयुक्त विवेचन आपण या लेखमालेत अगदी सोप्या व सहज समजेल अशा भाषेत, फार तांत्रिकपणे न करता क्रमाने सविस्तर सोप्या पद्धतीने करू.

हरि म्हणे अविद्यामय प्राणी।
जे गेले देहबुद्धीनें वेष्टूनी॥
मी न दिसें तयांते नयनीं।
भक्त ज्ञानी जाणती॥ 1133/15-ए.भा.
(क्रमशः)
- डॉ.गजानन जोग
(लेखक योगोपचार तज्ज्ञ, समुपदेशक आहेत.)
drgsjog.yoga@gmail.com