साताऱ्यात भाजपतर्फे उदयनराजेंना उमेदवारी जाहीर!

    16-Apr-2024
Total Views |
 
Udayanraje Bhosle
 
सातारा : नुकतीच भाजपची बारावी यादी जाहीर झाली असून या यादीत महाराष्ट्रातील आणखी एका उमेदवाराची घोषणा करण्यात आली आहे. भाजपने साताऱ्यातून उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून साताऱ्यातून उदयनराजे भोसले यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. दरम्यान, आता यावर शिक्कामोर्तब झालं आहे.
 
साताऱ्यात महायूतीकडून उदयनराजे भोसले यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाच्या शशिकांत शिंदे यांना तिकीट मिळाले आहे. त्यामुळे साताऱ्यात भोसले आणि शिंदे यांच्यात थेट लढत पाहायला मिळणार आहे. 
  
उमेदवारी जाहीर झाल्यानंतर उदयनराजे भोसले यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, "तिकीट मिळण्याबाबत माझ्या मनात कुठलीही शंका नव्हती. पहिल्यापासून छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वधर्म समभाव ही संकल्पना राबवली. हाच विचार उराशी बाळगून मी गेली ३० वर्षे लोकांची सेवा करत आहे. त्यामुळे लोकांचे भरभरुन आशिर्वाद मला मिळाले. वडिलधारी मंडळी, तरुण, माता-भगिनींची मला साथ मिळाली," असे ते म्हणाले.
 
ते पुढे म्हणाले की, "एकंदरीत आता मोदीजींच्या नेतृत्वाखाली केंद्रात सरकार आहे. याआधी वेगवेगळ्या पक्षांची बरेच सरकार येऊन गेले. मात्र, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार मोदीजींच्या अध्यक्षतेखाली खऱ्या अर्थाने राबवले जात आहेत. ठिकठिकाणी विकासकामं सुरु झाली आहेत. माझे मित्र आणि पूर्व मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री तसेच अजितदादा, एकनाथ शिंदे आणि शेतकरी संघटना यांच्या संयुक्त नेतृत्वाखाली चांगल्या प्रकारच्या विकासकामांची केवळ घोषणाच झाली नाही तर सर्वांना पुर्णत्वास आलेली बघायला मिळत आहे. आज लोकांना राजकारण नको आहे त्यांना एक प्रकारची स्थिरता हवी आहे. स्थिरता असल्याशिवाय चांगल्या प्रकारची वाटचाल करु शकत नाही," असेही ते म्हणाले आहेत.