भारताची वैज्ञानिक प्रगती हा भारतात तसेच जगातदेखील कायमच चर्चेचा विषय राहिला आहे. अनेकांना रामायण आणि महाभारत हा इतिहास तर काहींना तो फक्त एक साहित्याचा प्रकार वाटतो. पण, या मंथनातून कायमच सकारात्मक बाबी पुढे येत आहेत. पण, वाल्मिकी महर्षी यांनी लिहिलेले रामायण हा आपला प्राचीन इतिहास आहे, असे माझे स्पष्ट मत आहे. संपूर्ण रामायणात विविध घटना घडताना दिसतात. त्याचा सखोल अभ्यास केला असता, त्या काळात भारताची प्रत्येक क्षेत्रात असलेली प्रगती पाहून मन थक्क होते. रामायणातील अनेक प्रसंगांत आपल्याला रामकथेबरोबरच अनेक वैज्ञानिक आणि भौगोलिक सिद्धांतसुद्धा पाहावयास मिळतात. प्रस्तुत लेखात आपण यातील काही सिद्धांत पाहणार आहोत.
आजचे युग हे विज्ञानाचे युग आहे. या काळात अनेक शोध लागले. त्यामुळे मानवी जीवन सुखकर आणि गतिशीलदेखील झाले. आज एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी जलद गतीने जाण्यासाठी, विविध महामार्गांचा उपयोग केला जातो. या महामार्गावरून अनेक वाहने वेगाने प्रवास करतात. त्रेतायुगात म्हणजे रामायण काळातसुद्धा अशाच प्रकारचे महामार्ग बांधण्याचे तंत्रज्ञान अवगत होत असेे, त्यातील वर्णनावरून दिसते. वाल्मिकी रामायणातील अयोध्याकांड सर्ग क्रमांक-८० मध्ये राजमार्ग (highway) कसा बांधला आहे, याचे खूप छान वर्णन केले आहे. रामायणात राम वनवासाला जाण्याचा प्रसंग आहे. त्यात सर्वानुमते भरताला राज्याभिषेक करावा असे ठरते. पण, बंधूप्रेमात आक़ंठ बुडालेला भरत त्यावेळी श्रीरामांना भेटण्यासाठी गंगातटापर्यंत जाण्याचे ठरवितो आणि अयोध्येतील सर्व कुशल कारागीरांना अयोध्येपासून गंगातटापर्यंत एक सुंदर राजमार्ग तयार करण्याची आज्ञा देतो. आपण त्यातील निवडक श्लोक पाहू.
अथ भूमिप्रदेशज्ञाः सूत्रकर्मविशारदाः ।
स्वकर्माभिरताः शूराः खनका यन्त्रकास्तथा ॥१॥
कर्मान्तिकाः स्थपतयः पुरुषा यन्त्रकोविदाः तथा वर्धकयश्चैव मार्गिणो वृक्षतक्षकाः ॥ २ ॥
सूपकाराः सुधाकारा वंशकर्मकृतस्तथा ।
समर्था ये च द्रष्टारः पुरतस्ते प्रतस्थिरे ॥३ ॥
वाल्मिकी म्हणतात की, राजमार्ग तयार करण्यासाठी भूमीचे ज्ञान असणारे भूमिप्रदेशज्ञाः अर्थात भूशास्त्रज्ञ, छावणी वगैरे तयार करण्याचे ज्ञान असलेले सूत्रकर्मविशारद, शूरवीर, भूमी खोदणारे, सुरूंग वगैरे बनविणारे खनकाः यांनी पुढे प्रस्थान केले. रामायण काळात सुद्धा आजच्या सारख्या वैज्ञानिक शाखा होत्या की, ज्यामध्ये भूगर्भशास्त्र, खनिजशास्त्र आणि इतर अनेक शास्त्रे शिकविली जात असत. ’स्थपतयः’ म्हणजे स्थापत्यशास्त्र जाणणारे ’वास्तुविशारद’ होय. तसेच यन्त्रकोविदाः म्हणजे यंत्रांची माहिती उत्तम प्रकारे जाणणारे असे (mechanical engineers) सुद्धा अयोध्येत होते. त्या सर्वांनी मिळून एकत्र काम करून, तो राजमार्ग तयार केला.
बबन्धुर्बन्धनीयांश्च क्षोद्यान् सञ्चुक्षुदुस्तथा ।
बिभिदुर्भेदनीयांश्च तांस्तान् देशान् नरास्तदा ॥१० ॥
पुढे भरताला नदी ओलांडण्यासाठी जेथे पाणी आहे, तेथे पूल बांधले. म्हणजे रामसेतूच्या आधीच भरताच्या स्थापत्यविशारदांनी पूल बांधले होते. पूल बांधण्याचा तंत्रज्ञान प्राचीन काळापासून भारतीयांना अवगत होते. भरताचे सैन्यदल आणि रथ, हत्ती इत्यादी सर्व त्या पुलावरून व्यवस्थित जाऊ शकेल, असा भक्कम पूल बांधायचे ज्ञान त्यांना अवगत होते, असे वाल्मिकी म्हणत आहेत.
अचिरेण तु कालेन परिवाहान् बहूदकान् ।
चक्रुर्बहुविधाकारान् सागरप्रतिमान् बहून् ॥१॥
त्या काळात नगरातील असे लहान झरे, ज्याचे पाणी सर्व बाजूंनी वाहत होते, त्यांना बांध घालून, त्यामध्ये अधिक पाणी साठेल, असे तयार केले. म्हणजे धरणे बांधण्याचे तंत्रज्ञान अवगत होते. भिन्न-भिन्न आकारांची बरीच सरोवरे त्या काळी तयार केली आणि पाण्याने पूर्ण भरून गेल्याने ती सरोवरे समुद्रासारखी भासू लागली. मोठमोठे तलाव खोदणे, हे यंत्रांशिवाय शक्य नाही. त्याकाळी बुलडोझरसारखी यंत्रे असावीत असे वाटते.
जाह्नवीं तु समासाद्य विविधद्रुमकाननाम् ।
शीतलामलपानीयां महामीनसमाकुलाम् ॥ २१ ॥
सचन्द्रतारागणमण्डितं यथा ।
नभः क्षपायाममलं विराजते ।
नरेन्द्रमार्गः स तदा व्यराजत ।
क्रमेण रम्यः शुभशिल्पिनिर्मितः
अनेक प्रकारच्या वृक्षांना सुशोभीत, शीतल, निर्मल जलाशयांनी युक्त असलेला तो त्यांनी बांधलेला अयोध्येतील राजमार्ग अत्यंत शोभून दिसत होता. चांगल्या कारागीरांनी (शुभशिल्पिनिर्मितः) तो निर्माण केला होता.अलीकडे जेव्हा महामार्ग (highway) तयार केला जातो, त्यावेळी त्या महामार्गावर फूड मॉल, मोठमोठे बगीचे, तारांकित हॉटेल्स तयार केली जातात. त्रेतायुगात असाच राजमार्ग, जो भरताच्या कारागीरांनी तयार केला होता, त्यावर उत्तम सरोवरे, जलाशये, विहिरी आदींचे बांधकाम केले होते. त्याचप्रमाणे सैन्यासाठी पाण्याची व्यवस्थासुद्धा केली होती. अशा प्रकारे रामायण काळात अतिशय उत्तम आणि प्रगत तंत्रज्ञान भारतात प्रचलित होते हे दिसून येते.अगदी अनादी काळापासून माणसाला आकाशातील ग्रह गोलांचे आकर्षण आहे. संपूर्ण विश्वाला प्रकाश आणि ऊर्जा देणार्या सूर्याविषयी रामायणामध्ये खूप छान अशी आश्चर्यकारक माहिती आहे. सूर्याच्या पृष्ठभागावरील सौरडाग आणि सौरज्वाला (Sunspot) याविषयीचा रामायणातील उल्लेख आता आपण पाहू. सूर्याच्या पृष्ठभागावरील सौरडाग (सौरकलंक) (Solar flares) आणि सौरज्वाला यांबद्दल पुरातन वैदिक ग्रंथांतील माहिती घेऊ.
त्या आधी सौरडाग कसे तयार होतात हे पाहूया :
सूर्याच्या पृष्ठभागावरील काही विवक्षित ठिकाणी होणार्या चुंबकीय घडामोडींमुळे त्या ठिकाणच्या तापमानात घट होते. अशा ठिकाणाचे तापमान आजूबाजूच्या भागापेक्षा कमी झाल्यामुळे, तो भाग आपल्याला डागांच्या रुपात काळ्या रंगाचा दिसतो.
सौरडाग सौरज्वाला
आता या सौरडागांचे निरीक्षण सर्वप्रथम प्रभू श्रीरामचंद्रांनी केले आणि त्याचा स्पष्ट उल्लेख रामायणात महर्षी वाल्मिकी ऋषी यांनी केला आहे. रामायण युद्धकांड सर्ग ४१, श्लोक १८ मध्ये याचे वर्णन खालीलप्रमाणे आहे.
ह्रस्वो रूक्षोऽप्रशस्तश्च परिवेषः सुलोहितः
आदित्यमण्डले नीलं लक्ष्म लक्ष्मण दृश्यते ॥१८॥
याचा अर्थ पाहू :
प्रभू रामचंद्र लक्ष्मणाला म्हणतात हे लक्ष्मणा! सूर्यमंडलात (आदित्यमण्डले) लहान (र्हस्वः), रूक्ष (रूक्ष), अमंगलकारी (अप्रशस्तः) आणि अत्यंत लाल वर्तुळ (परिवेषः सुलोहितः) दिसून येत आहे. त्याचबरोबर तेथे काळे (नीलम्) डाग म्हणजे चिह्न (लक्ष्म) दृष्टिगोचर आहे.
सौरज्वाला
रक्तचंदन्दनसंकाशा संध्या परमदारुणा ।
ज्वलच्च निपतत्येतदाद् आदित्यादग्निमण्डलम् ॥
अत्यंत दारूण संध्या रक्तचंदनाप्रमाणे लाल दिसून येत आहे. सूर्यापासून हा जळत्या आगीचा पुंज खाली कोसळत आहे. येथे सौरज्वालेचा स्पष्ट उल्लेख आहे.
रावणाशी युद्ध करण्याच्या आधी काही अशुभ सूचक संकेत श्रीराम देत आहेत. त्यामुळे राक्षसकुळाचा नाश होणार, हे निश्चित आहे. यात श्रीरामांनी सौरडाग म्हणजे सूर्याच्या पृष्ठभागावरील काळे डाग पाहिले, असा स्पष्ट उल्लेख आहे. येथे ’नीलम्’ असा शब्द जरी असला तरी त्याचा एक अर्थ निळा आणि दुसरा अर्थ सावळा, काळा असाही आहे. आपल्याला जर मार लागला, तर अंगावर काळेनिळे डाग पडून, ते प्रचंड दुखतात. त्यामुळे येथे नीलम् याचा अर्थ निळा नसून काळा असाच आहे आणि तसेच स्पष्टपणे महर्षी वाल्मिकी यांनी लिहिले आहे. आता जे महाभाग रामायण ही कवी कल्पना आहे. राम जन्मलाच नव्हता, अशी पोरकट विधाने करता त्यांना किती समजवणार?
सौरडाग नुसत्या डोळ्यांनी पाहणे शक्य नाही. मुळात सूर्याकडेच नुसत्या डोळ्यांनी पाहणे शक्य नाही (उगवत्या- मावळत्या सूर्याकडे पाहता येते. पण, त्यावेळी डाग दिसू शकत नाहीत). श्रीराम हा साक्षात श्रीविष्णूंचा अवतार असल्याने, तेही अनंतकोटी ब्रह्मांडनायक आहेत, त्यामुळे हे सौरडाग त्यांना सहज दिसले असणार. आता त्यांना सामान्य माणूस मानले, तर त्याकाळी निश्चित प्रगत दुर्बिणी (telescope) असणार, ज्यायोगे त्यांनी सौरडागांचे अवलोकन केले असेल. दुर्बीण कशी तयार करावी, याचे वर्णन भृगुशिल्पसंहितेत दिले आहे.
आपली पृथ्वी गोल असून, विविधतेने नटलेली आहे. पृथ्वीवर निरनिराळे देश असून प्राचीन भारतात त्यांची नावे आणि त्यांची भौगोलिक परिस्थिती यांचे संपूर्ण ज्ञान अवगत होते. दक्षिण अमेरिकेतील पेरू देश आणि त्यातील तालवृक्षाचे वर्णन वनरराज सुग्रीव यांनी रामायणात केले आहे. याची माहिती आपण पाहू.
वानरराज सुग्रीव यांनी जनकनंदिनी सीतेच्या शोधार्थ वानरसेनेला पूर्व दिशेस जायला सांगितले आणि त्या अनुषंगाने कोणकोणते देश, पर्वत, समुद्र पार करावे लागतील याची संपूर्ण माहिती दिली.
किष्किंधा कांड ४० श्लोक ५३,५४ आणि ५५
त्रिशिराः काञ्चनः केतुः तालस्तस्य महात्मनः।
स्थापितः पर्वतस्याग्रे विराजति सवेदिकः ॥
पर्वताच्या वर त्या महात्म्यांची ताडाच्या चिन्हांनी युक्त सुवर्णमय ध्वजा फडकत आहे. त्या ध्वजेच्या तीन शिखा (त्रिशिराः) आहेत आणि खालच्या आधार भूमीवर वेदी बनवलेली आहे. अशा प्रकारे त्या ध्वजाला खूप शोभा प्राप्त झाली आहे.
पूर्वस्यां दिशि निर्माणं कृतं तत् त्रिदशेश्वरैः।
ततः परं हेममयः श्रीमानुदयपर्वतः ॥५४ ॥
हाच तालध्वज पूर्व दिशेच्या सीमेचे सूचक चिन्ह या रुपात देवतांच्या द्वारे स्थापित केला गेला आहे. त्यानंतर सुवर्णमय पर्वत आहे, जो दिव्य शोभेने संपन्न आहे. भारताच्या पूर्वेकडे भ्रमण करीत गेले असता, सध्याचा पेरू देश लागतो. त्या देशात अॅण्डीज (मूळ संस्कृत शब्द-अद्री) नावाचा पर्वत आहे. त्यावर तीन शिखांनी युक्त असा मोठा त्रिशूल खोदलेला (कोरलेला) आहे. त्याच्या तळाशी आयताकृती वेदी आहे. जी आजही स्पष्ट दिसू शकते. त्याला आजच्या भाषेत 'The Paracas Candelabra" किंवा "Candelabra of the Andes" असे नाव आहे. आताच्या भूगोलानुसार पेरू हा देश दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम किनार्यावर आहे. वरील श्लोकात उल्लेख केल्याप्रमाणे हा त्रिशूल-तालध्वज पूर्व सीमेचे चिन्ह आहे; कारण त्यानंतर भूभाग नाही. आकाशातून उडणार्या विमानांसाठी पूर्व दिशा दर्शविणारे चिन्ह तयार केले गेले असावे. रामायणकाळी विमाने अस्तित्वात होती. सर्वांत महत्त्वाची गोष्ट अशी की, ज्या तालध्वजाचे वर्णन वानरराज सुग्रीव यांनी केले आहे, तो आजही अस्तित्वात आहे. हा तालध्वज त्यांनी स्वतः पाहिलेला असल्याने, त्याचे हुबेहुब वर्णन त्यांनी केले आहे. मग भारतातून पूर्वेकडील पेरू देशापर्यंत सुग्रीव कसे गेले असतील? समुद्रमार्गे गेले असतील का, आकाशमार्गे गेले असतील? वानरराज सुग्रीव यांनी पृथ्वीची प्रदक्षिणा केली असल्याने, त्यांना पृथ्वी गोल आहे, हेसुद्धा ज्ञात होते.
वैभव दातार, कल्याण
(प्राच्यविद्या अभ्यासक, संतचरित्र लेखक )
भ्रमणध्वनी : ८८९८४८२३८२