मुंबई : अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. गँगस्टर लॉरेन्स विश्नोईचा भाऊ अनमोल याने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. दरम्यान, आमचा उद्देश सलमान खानला मारण्याचा नसून त्याला घाबरवण्याचा होता, अशी कबूली या आरोपींनी पोलिसांना दिली आहे.
रविवार, १४ एप्रिल रोजी बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या मुंबईतील घरासमोर गोळ्या झाडण्यात आल्या. याप्रकरणात मंगळवारी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. २४ वर्षीय विक्की साहेब गुप्ता आणि २१ वर्षीय श्रीजोगेंद्र पाल अशी त्यांची नावे आहेत. या दोघांनाही बिहारमधून पकडण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. चौकशीदरम्यान, आरोपींनी पोलिसांना सांगितले की, त्यांचा उद्देश हा सलमान खानला मारण्याचा नसून त्याला इशारा देणे हा होता. दरम्यान, न्यायालयाने दोन्ही आरोपींना २५ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही आरोपी जवळपास १५ दिवस मुंबईतील पनवेल भागात भाड्याच्या घरात वास्तव्यास होते. या घराचे अंतर सलमानच्या घरापासून १० किलोमीटर आहे. याकाळात त्यांनी सलमान खानच्या घराची आणि फार्म हाऊसची टेहाळणी केली होती. तसेच त्यांनी लॉरेन्स बिश्नोईच्या जवळचा असलेल्या रोहित गोदाराचीही भेट घेतली होती. याशिवाय या दोन्ही आरोपींचा संबंध हा लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल याच्याशी असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, ईदच्या दिवशी सलमान खान आपल्या चाहत्यांना घराच्या बाल्कनीमध्ये शुभेच्छा देण्यासाठी आल्यावर ते गोळीबार करणार होते. परंतू, त्यावेळी पोलिसांचा कडक बंदोबस्त असल्याने त्यांनी आपला प्लॅन पुढे ढकलत रविवारी गोळीबार केल्याचे सांगण्यात येत आहे.