देशविदेशातील रामायणावरील संशोधन

    16-Apr-2024
Total Views |
ram reserch
 
भारतीयांचा श्वास असणार्‍या प्रभू रामचंद्रांविषयी प्रत्येकाच्या मनात एक भक्तीची तसेच आपले पणाची भावना आहे. रामरायाची जीवनगाथा प्रत्येकाला स्वत:च्या जीवनाशी सुसंगत वाटते. आणि म्हणूनच प्रत्येक जण रामरायांना जाणून घेण्याचा आणि अधिकाधिक त्यांच्या जवळ जात राममय होण्याचा प्रयत्न विविध मार्गांनी करत असतो. आणि असा प्रयत्न देशाबरोबर विदेशातले रामभक्त देखील करतात.. अशा भक्तांबद्दल आणि त्यांच्या रामभक्तीबद्दल या लेखात जाणून घेऊया!
 
अनेक विद्वानांनी अनेक वर्षांपासून विविध अंगांनी रामायणाचा अभ्यास केला आहे. रामायणातील घटनांचा, माहितीचा अर्थ लावला आहे आणि त्यावर भाष्य केले आहे. फार पूर्वीपासून वाल्मिकी रामायणावरील अनेक भाष्यांनी अशा प्रकारचा अभ्यास केला आहे. त्यामधून वाल्मिकींच्या शब्दांचे सुप्त अर्थ उलगडतात. रामायणावरील मुख्य भाष्य आहेत - नागोजी भट लिखित ‘रामायण तिलकम’; गोविंदराज लिखित ‘रामायण भूषणम्’; शिवसहाय यांनी लिहिलेले ‘रामायण शिरोमणी’; महेश्वरतीर्थ द्वारा लिखित ‘रामायण तत्व दीपिका’; रामानुजाचार्य लिखित ‘रामायण व्याख्या’; रामानंदतीर्थ यांनी लिहिलेले ‘रामायण कूट’; माधव योगी यांचे ‘अमृत कटक’; त्र्यंबकराज यांचे ‘धर्मकूट’; माधवाचार्यांचे रामायण तात्पर्य निर्णय; वरदराज आचार्य यांनी लिहिलेले ‘रामायण सार संग्रह’; आणि इतर अनेक. प्रत्येक भाष्य रामायणातील श्लोकांचा अर्थ लावण्यासाठी एक वेगळा दृष्टिकोन देते. आज आपण रामायण ज्याप्रकारे जाणतो, त्यामध्ये या सर्व भाष्यांचा मोठा हात आहे.
 
रामायण वाचताना भाष्याची मदत घेतली असता, त्याच्या अर्थाचा कसा उलगडा होतो ते एका श्लोकाचे उदाहरण घेऊन पाहू. वाल्मिकी रामायणाच्या अरण्य कांडातील हा श्लोक आहे -
अग्रतः प्रययौ राम: सीता मध्ये सुमध्यमा ।
पृष्ठतस्तु धनुष्पाणि: लक्ष्मण अनुजगाम ह ॥ ३.११.१ ॥
 
याचा सरळ सरळ अर्थ आहे - पुढे रामामध्ये सीता आणि पाठीमागे लक्ष्मण अशा क्रमाने तिघेजण दंडक वनात दाखल झाले.
हाच श्लोक आधीच्या कथेच्यासंदर्भात वाचला असता त्याचा अर्थ असा लक्षात येतो - आतापर्यंत, ते वनात फिरत असताना, नेहमी लक्ष्मण पुढे चालत होता. पण आता अरण्यातील राक्षसांशी लढाई करावी लागणार होती. मग मात्र राम पुढे उभा राहतो. कारण तो स्वत:च्या छातीवर संकटे झेलून भक्तांचे रक्षण करणारा आहे. लढाईची वेळ आली असता तो पुढे उभे राहणारा आहे.
 
आता या श्लोकाचा लपलेला अर्थ त्यावरील भाष्य वाचले असता प्रकट होते. या श्लोकावर भाष्यकार म्हणतात-
राम अग्रतः म्हणजे अकार रुपात पुढे उभा आहे.
सीता ही सुमध्यमा म्हणजे उकार रुपातमध्ये आहे.
आणि लक्ष्मण अनुजगाम म्हणजे मकार रुपात मागे आहे.
 
अर्थात हे तिघेजण अ-कार, उ-कार आणि म-कार किंवा अ-उ-म आहेत! हा श्लोक सांगतो की, निर्गुण निराकार ‘ओंकार’ दंडकारण्यामध्ये राम, सीता आणि लक्ष्मणाच्या रूपाने अवतरला आहे.
आधुनिक काळात रामायणावर हजारो भाष्ये, प्रबंध, निबंध आणि शोधनिबंध लिहिले गेले आहेत. इतिहासकार, संशोधक आणि विद्वानांसाठी रामायणाच्या विविध पैलूंचा अभ्यास करणे हा सततोद्योग आहे. आधुनिक काळात वाल्मिकी रामायणाची चिकित्सक आवृत्ती काढणे हे एक महत्त्वाचे काम होते. हा प्रकल्प ‘ओरिएंटल इन्स्टिट्युट’, बडोदा या संस्थेने १९५१ ते १९७५ च्यादरम्यान हाती घेतला आणि यशस्वीरित्या पूर्ण केला. विद्वानांनी संपादित केलेली ही आवृत्ती सात खंडांमध्ये प्रकाशित केली आहे. नुकतेच बिबेक देबरॉय यांनी संपूर्ण चिकित्सक आवृत्तीचे इंग्रजी भाषांतर प्रकाशित केले आहे.
 
शंतनु गुप्ता यांनी "Teachings from the Ramayana on Family Life' या पुस्तकातून कौटुंबिक आणि वैयक्तिक जीवनासाठी रामायणातील शिकवण मांडली आहे. यशस्वी होण्यासाठी रामायणात दडलेले धडे त्यांनी उकल करून सांगितले आहेत. रामायणातील कथा, संभाषणे आणि पात्रे विस्ताराने मांडून आनंदी कौटुंबिक जीवनासाठी रामायणातून काय बोध घ्यावा हे सांगितले आहे.
 
डॉ. शुभ विलास त्यांच्या ‘रामायण: द गेम ऑफ लाईफ’ या सहा पुस्तकांच्या मालिकेद्वारे कसे जगायचे याचे रामायणातील धडे सांगताना म्हणतात, “रामायण ही कथा नसून एक जीवनपद्धती आहे, आव्हानांना कसे सामोरे जावे, कठीण प्रसंगांना कसे तोंड द्यावे हे रामायण शिकवते.”
अमी गणात्रा त्यांच्या "Ramayana Unravelled' या पुस्तकात काही महत्त्वाच्या प्रश्नांचे निराकरण करण्याचा प्रयत्न करतात. जसे रामाच्या बालपणातील आणि तारुण्यातील घटनांनी रामाला कसे घडवले? रामाने वनवासाला जाण्यास का होकार दिला? केवळ वडिलांची आज्ञा पाळण्यासाठी की त्यामागे आणखी काही कारण होते? राम आणि सीता यांचे नाते कसे होते? रावणाचे पतन कशामुळे झाले? गणात्रा यांचे पुस्तक अशा प्रश्नांची उत्तरे देऊन आजही जपले जाणारे हे महाकाव्य वाचण्यास उद्युक्त करते.
 
रूपा भाटी, या एक वास्तुविशारद आहेत. त्या संशोधक असून, अमेरिकेतील इन्स्टिट्युट ऑफ अ‍ॅडव्हान्स्ड सायन्सेस येथील स्कूल ऑफ इंडिक स्टडीजमधील साहाय्यक प्राध्यापक म्हणून काम करतात. त्यांनी वैदिक ग्रंथ, रामायण आणि महाभारतातील खगोलशास्त्रीय, भौगोलिक, ऐतिहासिक, जैविक आदी विविध निरीक्षणांचा अभ्यास केला आहे.
 
रुप भाटी यांनी रामायणावर केलेल्या संशोधनाची ही एक झलक -
वायुपुत्र हनुमान डोंगराच्या गुहेत सिंहाप्रमाणे घुटमळत होता. महाबली गर्जना करत म्हणाला, “मी अत्यंत गतिमान आहे. सर्व प्राण्यांचे जीवन असलेल्या वायूचा मी मुलगा आहे. मी माझ्या पित्याप्रमाणे आता उड्डाण करीन ... आता पाहा मी समुद्र ओलांडून लंकेला कसा जातो ते. माझा आकाशातील उत्तर-दक्षिण प्रवास स्वाती नक्षत्रासारखा दिसेल.
 
‘भविष्यति हि मे पन्थास्वातेः पन्था इवाम्बरे ।’ ४.६७.१९.
 
माझा उड्डाणाचा मार्ग आकाशातील स्वातीच्या तारासारखा होईल. स्वाती (Arcturus ) हा पाश्चात्य जगात आर्कटुरस म्हणून ओळखला जातो, हा आकाशातील चौथ्या क्रमांकाचा सर्वांत तेजस्वी तारा आहे. तो भूतप (Bootes) नक्षत्रात आहे. स्वाती हे नक्षत्र आहे, म्हणजेच जे हलत नाही ते. तरीही, हनुमानाने स्वातीने दक्षिणेकडे उड्डाण केल्याचा उल्लेख केला आहे. आधुनिक संशोधनाचा वेध घेत, रूपाजी यांना स्वाती तार्‍याचा नैऋत्येकडे चालू असलेला प्रवास कळला. हा तारा दरवर्षी अल्प प्रणात सरकतो. त्याची गती इतकी कमी आहे की, एका जन्मात त्याचे हलणे कळणार पण नाही. तरीदेखील हनुमानाला ते कसे काय माहीत होते? तसेच स्वाती नक्षत्राचा उड्डाणाचा मार्ग कसा काय माहीत होता? केवळ हनुमानालाच नाही, तर वानरालाही हे माहीत होते. कारण, हनुमानाने एक माहितीतल्या उदाहरणाच्या मदतीने स्वतःच्या उड्डाणाचे वर्णन केले होते. वाल्मिकींनाही हे माहीत होते, अन्यथा त्यांनी ते लिहिले नसते. त्या सर्वांना स्वातीचे दक्षिणेस जाणे कसे माहीत होते?
 
रूपा भाटी म्हणतात, “याला एकच उत्तर आहे- स्वातीच्या तार्‍याचे फार प्राचीन काळापासून सतत निरीक्षण केले जात होते. भारतीयांनी पिढ्यानपिढ्या निरीक्षण केले आणि ते नोंदवून देखील ठेवल्याने आणि हे ज्ञान सर्वसामान्य होते.‘वास्तव रामायण’ या पुस्तकात डॉ. पी. व्ही. वर्तक यांनी खगोलशास्त्रीय निरीक्षणे, पुरातत्वीय पुरावे आणि भौगोलिक माहिती देऊन रामायणाच्या ऐतिहासिकतेवर संशोधन सादर केले. रामायणाची ऐतिहासिकता, राम-रावण युद्धाचा कालनिर्णय आणि रामायणाचे सांस्कृतिक महत्त्व यावर प्रकाश टाकणारे त्यांचे कार्य आहे.”
 
निलेश ओक यांनी त्यांच्या १२२०९ BCE ‘राम रावण युद्ध’ या पुस्तकात रामाच्या ऐतिहासिकतेचा शोध घेत, भूगर्भशास्त्रीय, पुरातत्व आणि खगोलशास्त्रीय माहितीचे विश्लेषण करून रामायणाच्या कालरेखेच्या संदर्भात महत्त्वाचे काम केले आहे. रामायणातील उत्तर आणि दक्षिण ध्रुवीय तारे, वशिष्ठ आणि अरुंधती तार्‍यांची स्थिती आदी निरीक्षणांचा उपयोग करून कालनिर्णय केला आहे.
 
ऑस्ट्रेलिया येथे राहणार्‍या मित्रा देसाई यांचा The Flag of Ananta या पुस्तकात सुग्रीवाला ज्ञात असलेला जगाचा भूगोल समोर आणला आहे. त्यामध्ये उत्तरेकडील आर्क्टिक ते दक्षिणेकडील अंटार्क्टिक आणि पश्चिमेकडील आल्प्स ते पूर्वेकडील अँडीजपर्यंतच्या भूभागाचे वर्णन आले आहे. जिजिथ नादुमरी रवी यांनी त्यांच्या "The Geography of RmyaGa' या पुस्तकात वाल्मिकी रामायणात वर्णन केलेली शहरे, गावे, राज्ये, प्रदेश, वने, पर्वतराजी, पर्वतशिखर, नद्या आणि तलाव यावर लक्ष केंद्रित करून त्यांचे भारतातील स्थान दाखवले आहे.
 
 
लेखक विक्रांत पांडे आणि निलेश कुलकर्णी "In the Footsteps of Rama: Travels with the Ramayana' या पुस्तकामध्ये रामाच्या अयोध्येपासून लंकेपर्यंतच्या प्रवासाचा मार्ग काढतात, तर व्ही. एस. भावे यांनी हेलिकॉप्टरमधून राम ज्या मार्गाने लंकेहून अयोध्येला गेला त्या मार्गावरून प्रवास केला. त्यांनी वाल्मिकी आणि कालिदास यांनी केलेल्या रामाच्या पुष्पक विमानाच्या प्रवासाच्या वर्णनांचा तौलनिक अभ्यास - रामाच्या पदचिन्हावरून ‘पुष्पक विमानाने पंख पसरले’ या पुस्तकात मांडला आहे.
 
‘साहित्य अकादमी’ने प्रकाशित केलेल्या ‘द क्रिटिकल इन्व्हेंटरीज ऑफ रामायण स्टडीज’; खंड १ आणि २ (१९९१) च्या प्रस्तावनेत नमूद केले आहे. रामायण हे केवळ एक महाकाव्य नाही, तर सर्व पौराणिक कथा आणि आदर्श नैतिक आचरणाचा राष्ट्रीय झरा आहे. हा ग्रंथ भारतीय वटवृक्षासारखा वेगवेगळ्या प्रदेशात असंख्य मुळे आणि फांद्यांसह पसरला आहे. विविध भाषांमध्ये रामायणावर झालेल्या संशोधनपर साहित्याची या खंडांतून एक मोठी यादी दिली आहे. यात सर्व भारतीय भाषांमध्ये रामायणावर केलेल्या हजारो संशोधनांची यादी दिली आहे. तसेच, भारता बाहेरील विविध भाषांमधून जसे - अरबी, फारसी, ब्राझिलियन, झेक, तिबेटीयन, व्हिएतनामी, इटालियन, जपानी, रशियन आणि इतर बर्‍याच भाषांमध्ये झालेल्या संशोधनांची, भाषांतरांची आणि भाष्यांची जंत्री आहे. रामायणावरील संशोधनाची यादी करायला दोन खंडांची आवश्यकता आहे, यावरून रामायणावरील साहित्य अफाट सागराप्रमाणे आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
- दीपाली पाटवदकर