राजीव चंद्रशेखर यांचे शशी थरूर यांना आव्हान!

    16-Apr-2024
Total Views |
shahsi
 
शशी थरूर यांच्यावर नाराज असलेले काँग्रेस कार्यकर्ते एक तर प्रचारापासून दूर राहतील किंवा शशी थरूर विजयी होणार नाहीत, यासाठी प्रयत्न करण्याची शक्यता नाकारता येत नाही. काँग्रेसअंतर्गत असलेली ही दुफळी लक्षात घेता, भाजपला या मतदारसंघात विजय मिळण्याची दाट शक्यता आहे. राजधानीचे शहर असलेल्या तिरुवनंतपुरमचे पडसाद राज्यातील अन्य मतदारसंघांवर उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही.
 
केरळमध्ये लोकसभेच्या २० जागा आहेत. त्यातील राजधानीचे शहर असलेल्या तिरुवनंतपुरम लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. या मतदारसंघात भाजपने केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांना उमेदवारी दिली आहे, तर काँग्रेसने या मतदारसंघात शशी थरूर यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. शशी थरूर हे आतापर्यंत तीनवेळा या मतदारसंघातून निवडून गेले असले, तरी यावेळची निवडणूक त्यांच्यासाठी वाटते तितकी सोपी नाही. शशी थरूर यांना पक्षांतर्गत विरोध होण्याची दाट शक्यता आहे. शशी थरूर यांनी काँग्रेस अध्यक्षपदासाठी मल्लिकार्जुन खर्गे यांच्या उमेदवारीस आव्हान दिले होते. गांधी घराण्याने घोषित केलेल्या उमेदवारास आव्हान देण्याचे जे कृत्य शशी थरूर यांनी केले होते त्यामुळे त्यांच्यावर नाराज असलेले निष्ठावंत काही वेगळा निर्णय घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शशी थरूर यांच्यावर नाराज असलेले काँग्रेस कार्यकर्ते एक तर प्रचारापासून दूर राहतील किंवा शशी थरूर विजयी होणार नाहीत, यासाठी प्रयत्न करण्याची शक्यता नाकारता येत नाही. काँग्रेसअंतर्गत असलेली ही दुफळी लक्षात घेता, भाजपला या मतदारसंघात विजय मिळण्याची दाट शक्यता आहे. राजधानीचे शहर असलेल्या तिरुवनंतपुरमचे पडसाद राज्यातील अन्य मतदारसंघांवर उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही.
 
या जागेची समीकरणे २०२४ची निवडणूक लक्षात घेता काहीशी गुंतागुंतीची आहेत. २०२१ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत या लोकसभा मतदारसंघातील सातपैकी सहा जागा या डाव्या आघाडीने जिंकल्या होत्या आणि केवळ एक म्हणजे, कोवलमची जागा संयुक्त लोकशाही आघाडीस मिळाली होती. २०२१चे विधानसभा निकाल लक्षात घेता, या मतदारसंघातील काँग्रेसची स्थिती डळमळीत झाली असल्याचे दिसून येते. त्याउलट भाजपच्या स्थितीत चांगली सुधारणा झाल्याचे दिसून येते. कझाकुटम, वत्तियुरकावू आणि नेमोम या विधानसभा मतदारसंघात भाजपला काँग्रेसपेक्षा जास्त मते मिळाली असल्याचे दिसून येते. २०१४च्या लोकसभा निवडणुकीमध्ये ही जागा भाजपच्या हातातून थोडक्यात निसटली होती. काँग्रेसने ही जागा १५ हजार, ४७० मतांनी जिंकली होती. सातपैकी चार विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपने आघाडी घेतली होती. २०१४ आणि २०१९च्या लोकसभा निवडणुकांचे निकाल लक्षात घेता, त्या मतदारसंघातील चार विधानसभा मतदारसंघात भाजपची स्थिती भक्कम असल्याचे दिसून येते. बदललेल्या राजकीय परिस्थितीमुळे राज्यातील मतदार यावेळी वेगळा विचार करील, अशी शक्यता वर्तविली जात आहे. शशी थरूर यांना पक्षांतर्गत बंडखोरीला तोंड द्यावी लागण्याची चिन्हे आहेत. वर उल्लेख केल्याप्रमाणे, मल्लिकार्जुन खर्गे यांना आव्हान देणार्‍या थरूर यांच्याबद्दल पक्षात नाराजी आहे. ही स्थिती लक्षात घेता, दक्षिण भारतातील या महत्त्वाच्या राज्यात आपले खाते उघडण्याची मोठी संधी भाजपपुढे आहे.
 
२०२१ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत संयुक्त लोकशाही आघाडीस सत्तेवर येणे शक्य झाले नाही. १९८२ ते २०२१ या काळात केरळमध्ये डाव्या आघाडीचे किंवा संयुक्त लोकशाही आघाडीचे सरकार आलटून पालटून सत्तेवर येत राहिले आहे. २०२१च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला अपेक्षित यश न मिळाल्याने काँग्रेसच्या मतदारांचे नीतिधैर्य काहीसे खचले आहे. २०१९च्या लोकसभा निवडणुकीत केरळमध्ये काँग्रेसला १५ जागा मिळाल्या होत्या. पण, तेवढ्या जागा कायम ठेवण्यामध्ये काँग्रेसला यश मिळण्याची शक्यता नसल्याचे बोलले जात आहे. या सर्व पार्श्वभूमीवर तिरुवनंतपुरम मतदारसंघात केंद्रीय मंत्री आणि भाजपचे उमेदवार राजीव चंद्रशेखर यांनी शशी थरूर यांच्यासमोर आव्हान उभे केले आहे. केवळ काँग्रेसपुढेच नव्हे, तर कम्युनिस्ट पक्षाच्या उमेदवारापुढे भाजपने आव्हान उभे केले आहे. शशी थरूर यांना पराभूत करून भाजप इतिहास घडवतो का, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
 
विश्वनाथ मंदिरात पोलीस पुजार्‍यांच्या वेशात!
काशिविश्वनाथ मंदिरास भेट देणार्‍या भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आता या मंदिरास भेट देणार्‍या भाविकांना काशिविश्वनाथाचे दर्शन चांगल्या प्रकारे घेता यावे, म्हणून मंदिर परिसरात चोख व्यवस्था ठेवण्यात आली आहे. आता या यात्रेकरूंचे स्वागत पुजार्‍यांच्या वेशांमध्ये असलेल्या पोलिसांकडून ‘हर हर महादेव’चा जयघोष करून केले जाणार आहे. या मंदिरास भेट देणार्‍या भाविकांना शिस्तीने दर्शन घेणे सुलभ व्हावे तसेच त्यांच्या आध्यात्मिक अनुभवात भर पडावी, यासाठी पुजार्‍यांच्या वेशातील हे पोलीस मदत करणार आहेत. वाराणसी पोलीस आयुक्त मोहित अगरवाल यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. देशाच्या विविध भागांमधून काशीमध्ये भाविक प्रचंड संख्येने येत असतात. त्यांना काशिविश्वेश्वराचे दर्शन विनासायास घेता यावे, यासाठी पोलीस त्यांना मदत करणार आहेत. काशिविश्वनाथ धामचे शंभू शरण सिंह यांनी म्हटले आहे की, “गर्भगृहाजवळ सनातनी वेशातील पोलिसांना पाहून, हे पुजारी असल्याची भावना भाविकांच्या मनात निर्माण होईल. त्यामुळे एक चांगले वातावरण दिसू शकते. गणवेशात असलेल्या पोलिसांकडून चांगली वागणूक मिळत नसल्याचा अनुभव अनेक भाविकांना विविध ठिकाणी येत असतो. पण, काशिविश्वनाथ धाममध्ये पुजार्‍यांच्या वेशातील पोलिसांना पाहून ती नकारात्मक भावना दूर होण्यास मदत होईल. गर्भगृहालगत असलेल्या सहा पोलीस अधिकार्‍यांमध्ये दोन महिलांचाही समावेश आहे. भगव्या वेशात आणि गळ्यामध्ये रुद्राक्षमाळा आणि कपाळास गंध लावलेले हे पोलीस अधिकारी भक्तांना मार्गदर्शन करणार आहेत. तसेच या पोलीस अधिकार्‍यांकडून कोणाच्याही अंगास हात न लावण्याचे धोरण अवलंबिले जाणार आहे. मंदिर परिसरात रांगेवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस असणार आहेत. पण, गर्भगृहालगत पुजार्‍यांच्या वेशातील पोलीस उपस्थित असणार आहेत.
 
मणिपूरमधील हिंसाचारास काँग्रेस जबाबदार : मुख्यमंत्री
मणिपूरमध्ये जो हिंसाचार उसळला, त्यास काँग्रेस पक्ष जबाबदार असल्याचा आरोप मुख्यमंत्री बिरेन सिंह यांनी केला आहे. बेकायदेशीरपणे घुसखोरी करणार्‍यांचे लोंढे रोखण्यासाठी सीमेवर योग्य तो बंदोबस्त ठेवण्यामध्ये काँग्रेसला पूर्णपणे अपयश आले होते आणि त्यातून आजची परिस्थिती निर्माण झाली, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. काँग्रेस पक्षाने आपल्या राजवटीत सीमेवर कुंपण घातले असते, तर आज ही समस्या निर्माण झाली नसती, याकडे मुख्यमंत्री बिरेन सिंह यांनी लक्ष वेधले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मणिपूर भेटीमध्ये, “जोपर्यंत मणिपूरमध्ये भाजप सत्तेत आहे, तोपर्यंत या राज्यात काही वावगे घडणार नाही. मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करताना मणिपूरचे ऐक्य आणि एकात्मता यांना धक्का लावला जाणार नाही,” असे जे वक्तव्य केले होते, त्याचा संदर्भ देत मुख्यमंत्री बिरेन सिंह म्हणाले की, “हे अत्यंत महत्त्वाचे वक्तव्य आहे. गृहमंत्र्यांच्या वक्तव्याने मणिपूरच्या जनतेला दिलासा मिळाला आहे. काँग्रेस पक्षाने नेहमीच लांगूलचालन करण्याचे धोरण अवलंबिले. आज जे घडते आहे, ते काँग्रेसच्या धोरणांमुळेच! योग्यवेळी सीमेवर कुंपण घातले असते, तर आजची परिस्थिती निर्माण झाली नसती.” मणिपूरमधील आपल्या दौर्‍यामध्ये गृहमंत्री अमित शाह यांनी तेथील जनतेला दिलासा दिला. मणिपूरमध्ये शांतता राखण्यास पंतप्रधान मोदी यांचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचेही अमित शाह यांनी तेथील सभेमध्ये बोलताना सांगितले. मणिपूरमधील परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. पण, तेथे जी परिस्थिती निर्माण झाली, त्याची पाळेमुळे त्या राज्यातील काँग्रेस राजवटीत असल्याकडे मुख्यमंत्री बिरेन सिंह यांनी लक्ष वेधले. काँग्रेसच्या राजवटीमुळे ईशान्य भारतातील मणिपूर राज्यामध्ये किती गंभीर समस्या निर्माण झाली आहे, त्याची कल्पना यावरून यावी.
९८६९०२०७३२