गोस्वामी तुलसीदासांच्या ‘श्रीरामचरितमानस’ रामकथेचा संक्षिप्त परिचय (पूर्वार्ध)

    13-Apr-2024
Total Views |
ramcharitmanas

श्री तुलसीदासांची ‘रामकथा’ प्रासादिक आहे, म्हणून ती एवढ्या वर्षांनंतर देखील जनमानसांत तरली आहे, त्यांना आनंद देते आहे. अशा रचनांना आता आपण ‘क्लासिक’ म्हणतो. भारत हा श्रद्धावानांचा देश आहे. येथील जनमानस कोणी कितीही कलुषित करण्याचा प्रयत्न केला, तरी ते निष्फळ झाले आहेत. या रचनेला पूर्वग्रह बाजूला सारून विमल मनाने वाचण्याची आवश्यकता आहे. यातला अंशभर तरी प्रसाद आपल्या रचनेत उतरला, तरी मोठमोठ्या साहित्यिकांनी स्वतःला भाग्यवान मानले पाहिजे. येत्या रामनवमीनिमित्त श्रीमद्गोस्वामी तुलसीदासविरचित ‘श्रीरामचरितमानस’चे केलेले हे रसग्रहण...
 
श्रीमद्गोस्वामी तुलसीदासविरचित ’श्रीरामचरितमानस’ हा एक आनंदप्रद ग्रंथ आहे. कारण, ती अवधी भाषेत एका सुसंस्कृत निस्सीम रामभक्ताने व अद्वितीय प्रतिभेच्या महाकवीने आर्ततेने गायिलेली ‘रामकथा’ आहे. ती भारतभरात ’पारायण’ स्वरुपात पूजली जाते. असे हे महाकाव्य कित्येक भाविकांना कंठस्थ आहे, तिचे अधिकाधिक विक्रमी पाठ घराघरांत होतात, तरी याचा रचयिता आपपर भावनेने काय म्हणतो, ”काव्यासंबंधी मला काहीच ज्ञान नाही, मी हे कोर्‍या कागदावर लिहून देऊ शकतो (कबित बिबेक एक नहिं मोरें, सत्य कहउँ लिखि कागद कोरें). मंगलकारी, अमंगलाचं हरण करणारं ’रघुनाथजीं’चं उदार नाव यात आहे, हा एकच जगत्प्रसिद्ध गुण यात आहे, ज्याला शिवदेखील पार्वतीसहित सदा जपत असतात.” (मंगल भवन अमंगल हारी, उमा सहित जेहि जपत पुरारी).
 
’श्रीरामचरितमानसा’त श्रीरामांची नवविधा भक्ती कोणती, हे सांगितले आहे- ‘संत सत्संग’, ‘रामकथा’, ‘गुरु चरण कमल सेवा’, ‘रामगुण समूहगान’, ‘राम मंत्र जप’, ‘शुद्ध आचरण’ (इंद्रिय निग्रह), ‘जगाप्रति समभाव’ (जग राममय जानना), ‘अल्पसंतुष्टता’ आणि ‘सरलता.’ प्रत्यक्ष शिव हे पार्वतीला याज्ञवल्क्यमुनींनी भरद्वाज मुनींना ’श्रीरामायणा’ची जी कथा सांगितली, ती सांगताहेत, अशी कल्पना कवी तुलसीदासजींनी केली. या कथेचे एकूण ’सात सोपान’ आहेत-सात काण्ड- ‘बाल’, ‘अयोध्या’, ‘अरण्य’, ‘किष्किंधा’, ‘सुंदर’, ‘लंका’, ‘उत्तर’.
 
’मंगल भवन अमंगल हारी, द्रवउ सो दसरथ अजिर बिहारी, राम सिया राम सिया राम जय जय राम’, ही प्रसिद्ध चौपाई ’बालकांडा’त येते. ‘दोहा’, ‘सोरठा’ आणि ‘चौपाई’ या तीन प्रमुख छंदांमध्ये हे महाकाव्य लिहिले गेले.रामायणातील प्रसंगांना महाकवी सहा ऋतूंमध्ये ओवतात. शिव-पार्वतीचा विवाह म्हणजे ’हेमंत’ ऋतू, श्रीरामाचा जन्म म्हणजे ’शिशिर’, सीता-राम विवाह म्हणजे ’वसंत’, वन-गमन म्हणजे ’ग्रीष्म’, राक्षसांसोबतचं घनघोर युद्ध म्हणजे ’वर्षा’, तर श्रीरामाचा राज्याभिषेक म्हणजे सुखदायी ’शरद’ ऋतू.
 
शिव व सतीची एक अपरिचित कथा ’बालकांडा’त येते. एकदा सतीने सीतेचा वेष घेतला व परीक्षा घेण्यासाठी रामाच्या मार्गात उभी राहिली. तेव्हा रामाने विचारले की, ”वृषकेतु शिवजी कुठयत?” तेव्हा कुठे सतीला शिव रामाला आराध्य का मानतात, याचा बोध झाला. पण, सतीने रामाची परीक्षा पाहावी, हे न पटल्याने, शिवाने सतीचा त्याग केला. प्रजापती दक्षाच्या यज्ञात आपला देह सतीने भस्मसात केला. पुढे पर्वतराजाची कन्या पार्वतीच्या रुपात तिचा जन्म झाला. तिने शिव हा पती लाभावा यासाठी यत्न केले, वाळलेल्या पर्णांचं सेवनही सोडलं, ’अपर्णा’ झाली. तेव्हा कुठे श्रीरामाच्या सांगण्यावरून, शिव-पार्वती विवाह झाला. पुढे शंकराचा पुत्र कार्तिकेय तारकासुराचा नाश करेल, अशी सिद्धता करण्यासाठी, कामदेवाने शिवाला प्रभावित केले, त्याच्या पाच मदन बाणांनी शिवाची समाधी भंग पावली, शिवाने त्याला क्रोधात येऊन भस्मसात केले, रतीने शोक केला तेव्हा मदन ’अनंग’ झाला.
विश्वनाथ शिवाची जो भक्ती करत नाही, तो श्रीरामालाही प्रिय नाही, असा संदेश महाकवी देतात. (पनु करि रघुपति भगति देखाई। को सिव सम रामहि प्रिय भाई).
 
पापाचा भार पृथ्वीवर वाढल्यावर, सज्जनांच्या रक्षणासाठी भगवंत अवतार घेतो. पूर्वावतारातील कश्यप आणि अदिती म्हणजे दशरथ व कौसल्या झाली, तर जलंधर रावण झाला, असाही कथाभाग ‘मानसा’त आहे.’संसार दुःखमय आहे, हे असत्य तोपर्यंत बाधा आणतं, जोपर्यंत सत्याचं ज्ञान होत नाही,’ हा अद्वैत विचार आहे. हे जग प्रकाश्य आहे, प्रकाशक श्री रामचंद्र आहेत, अशा अर्थाचं सुंदर वचन येतं (जगत प्रकास्य प्रकासक रामू, मायाधीस ग्यान गुन धामू).
 
‘मानसा’तील आणखी एक अपरिचित कथा अशी. एकदा मदन नारदांना वश करण्यासाठी गेला असता, तो पराजित झाला. नारद शिवाकडे स्वतःची वल्गना करायला गेले. ’विष्णूपुढे तरी असे बोलू नको,’ असा सल्ला शिवाने दिला. पण, मुनीवर स्वतःच्या कर्तृत्वाला आवर घालू शकले नाहीत. विष्णूला नारदाच्या ठायी अहंकाराचा दर्प आला. विष्णूने स्वतःच्या मायेने नारदाच्या मार्गात एक सुंदर नगरी बनवली. मग तिथला राजा शीलनिधी याने त्याच्या विश्वमोहिनी या रुपवती कन्येचं स्वयंवर करण्याचे ठरवले. आलेल्या नारदाला राजाने तिच्या बाबतीत गुण-दोष विचारले, पण विष्णूच्या प्रभावाखाली नारद संमोहित झाले होते, त्यामुळे त्यांनाच तिचा वर होण्याची इच्छा झाली. परत आल्यावर त्यांनी तशी इच्छा विष्णूजवळ प्रकट केली आणि विष्णूचे सुंदर रूपही मागितले. विष्णू ’हो’ म्हणाले अन् स्वयंवराच्या दिवशी आपण अतिरुपवान दिसतो आहोत, या भ्रमात नारद असताना, तिथे वेष बदलून आलेल्या विष्णूलाच कन्येने वरले. नारदाने पाण्यात प्रतिबिंब पाहिलं, तेव्हा विष्णूने आपल्याला विद्रुप बनवल्याचे त्यांना लक्षात आले.
 
ही सर्व माया विष्णूने ब्रह्मचारी नारदांच्या भल्यासाठी, भक्त रक्षणासाठी उभी केली होती. पण, “तुम्ही मला वानरासारखं बनवलं होतं, कधी वानरच तुमचे साहाय्यक होतील आणि तुम्हालाही स्त्रीच्या वियोगात दुःखी व्हावं लागेल, असं नारद बोलून गेले,” आणि हे पुढे सर्व खरे ठरले.कैकय देशात सत्यकेतू राजा होता. त्याला दोन परमप्रतापी मुलगे होते, प्रतापभानू व अरिमर्दन. प्रतापभानू एक सुशील व पराक्रमी राजा झाला. पुढे एकदा मृगयेसाठी गेला असता, तो जंगली डुकरांचा पाठलाग करताना, निबिड अरण्यात गेला. धर्मरुची हा त्याचा हुशार मंत्री होता, प्रजा सुखी होती. ज्या संन्यासी महात्म्याकडे राजाने रात्र घालवली, तो या राजाकडून पराजित झालेला एक कपटी शत्रू राजा होता, तो सूडाग्नीने होरपळत होता. त्याने प्रतापभानुला ओळखले; पण ओठात गोडवा ठेवला, पोटात कारस्थान रचले.
 
इथे तुलसीदासजी, ’मोर दिसतो किती सुंदर, छान केकारव करतो; पण त्याचा आहार साप असतो,’ असा दृष्टांत देतात. त्या पराजित राजाने स्वतःचे नाव ‘एकतनू’ सांगितले. त्याच्यावर विश्वासून राजाने विचारले की, ”साधू महाराज, मला नूतन सौख्य लाभेल असा वर द्या.” तो म्हणाला की ”तुझं राज्य अकंटक होईल; पण विप्र प्रजेला तू वश करून घेतलं पाहिजे, त्यांचा शाप घेऊ नकोस. मी तुला मदत करीन. तुझ्या पुरोहिताचं रूप घेऊन, मी वर्षभर तुझ्यासोबत राजवाड्यात राहीन अन् विप्रांना लक्षभोज घालीन, ते प्रसन्न होतील.“ कालकेतू हा राक्षस त्या कपटी राजाचा मित्र होता, त्याने प्रतापभानूला तो झोपला असता, जंगलातून त्याच्या राजप्रासादात पोहोचवले आणि पुरोहिताला जंगलात आणले. कपटी राजाला पुरोहिताच्या रुपात राजप्रासादात पोहोचवले. एकतनू नवा पुरोहित झाला. राजाने लक्षभोज आयोजित केला अन् एकतनुने विप्राचेच मांस शिजवून जेवण बनवलं. सगळंच मायाजाल होतं; पण ऐनवेळी आकाशवाणी झाली, पंक्तीतले विप्र सावध झाले अन् रागाच्या भरात त्यांनी ’तुझा कुलक्षय होईल,’ असा शाप प्रतापभानूस दिला. त्याप्रमाणेच शत्रू राजाच्या सैन्याशी लढताना झालेही खरे. 
 
पुढे हाच राजा प्रतापभानू रावण झाला. अरिमर्दन कुंभकर्ण आणि धर्मरुची विभीषण. पुलस्त्य ऋषींच्या पवित्र कुळात जन्म घेऊनदेखील पूर्वजन्मीच्या दुष्कृत्यामुळे ते पापरूप झाले. ‘वानर व मनुष्य या दोन जातींशिवाय कोणी मला मारू शकणार नाही, असा वर द्या,’ असे रावणाने ब्रह्माला वरदान मागितले. पुढे मय दानवाच्या मंदोदरी या कन्येसोबत रावणाचा विवाह झाला. लंका त्याची राजधानी झाली, त्याने कुबेराची ही नगरी जिंकली. देवदेवतांचा छळ करण्याचा आदेश आपल्या सेवकांना दिला. त्याचा पुत्र मेघनाद महापराक्रमी होता. रावणाने धर्माचा जणू नाश करायचा विडाच उचलला होता. पृथ्वीवर तो भारभूत झाला होता. गायीचं रूप घेऊन, पृथ्वीने आपले दुःख ऋषी-मुनींना सांगितले.जसा भाव तसा देव, ’जाके हृदयँ भगति जसि प्रीति, प्रभु तहँ प्रगट सदा तेहिं रीती’, देव प्रेमातून प्रकट होतो, हे ’प्रेम तें प्रकट होहिं मैं जाना’ यातून व्यक्त होते. ब्रह्माच्या प्रार्थनेवरून विष्णूने मनुष्यावतार धारण करण्यास संमती दिली. स्वायंभुव मनू व त्यांची पत्नी शतरुपा यांच्या नव्या जन्मात त्यांच्या पोटी श्रीविष्णू रामरुपाने जन्मले म्हणून मनूचा वंशज राम. मग विदित असलेले रामायण तुलसीदासजींनी सांगितले आहे. ’चले सकल सुर साजि बिमाना’ रामाचा जन्म झाला, तेव्हा देव आपापल्या विमानांतून अयोध्येत पोहोचले. श्रीकृष्णाने यशोदा मातेला आपल्या मुखात विश्वदर्शन घडवले, तसेच श्रीरामानेही कौसल्या मातेला ब्रह्मांड दाखविल्याचा उल्लेख यात आहे. 
 
तुलसीदासजींनी रामजन्म-बालपण-संस्कार-विश्वामित्र आगमन-तडका वध, मारीच सुबाहू वध-धनुष यज्ञ हे प्रसंग अगदी त्रोटकपणे घेतले आहेत. अहल्या उद्धार, जनकपुरीच्या वर्णनाचा उलट अधिक विस्तार केला आहे. स्वयंवराआधी राम आणि सीता यांची दृष्टिभेट झाल्याचे सुरेख वर्णन तुलसीदासजी करतात. त्यांनी स्वयंवराचे वर्णन केले आहे. रामचंद्राच्या रुपाचंही वर्णन केलं आहे; पण सीताजींच्या रुपाचं वर्णन तुलसीदासजी शालीनतेने करतात. ’जग असि जुबति कहाँ कमनीया’ इथेच त्यांची प्रतिभा कुंठित होते, त्याला कारण या महाकवीचा विवेक आहे. सीताजींच्या वर्णनासाठी कोणत्याही उपमा दिल्या, तरी तो कुकवीच ठरेल म्हणून ते या अनुपम जगज्जननीचं वर्णन न करताच, थांबले आहेत.
 
स्वयंवरात बाणासुर आणि रावण धनुष्य उचलू शकले नाहीत, असा उल्लेख येतो. भृगुकुलरूपी परशुरामाचं वर्णन सुरेख आहे. रामाने परशुरामांची प्रशंसा करताना, त्यांच्या नऊ गुणांचा उल्लेख केला आहे-‘शम’, ‘दम’, ‘तप’, ‘शौच’, ‘क्षमा’, ‘सरलता’, ‘ज्ञान’, ‘विज्ञान’ आणि ‘आस्तिकता.’दशरथ राजाचे चार पुत्र म्हणजे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष यांनी शरीररूप धारण केले आहे, अशी सुंदर उपमा महाकवींनी दिली आहे. याच चार पुत्रांना पुढे ‘सालोक्य’, ‘सामीप्य’, ‘सारुप्य’ आणि ‘सायुज्य’ अशी उपमा तुलसीदासजी देतात.मांडवी-भरत, उर्मिला-लक्ष्मण, श्रुतकीर्ती-शत्रुघ्न यांचा विवाह झाला असे वर्णन येते. महाकवीच्या प्रतिभेला बहर येतो, जेव्हा ते जीव व ब्रह्माच्या अवस्था यांचा संदर्भ या युगुलांमध्ये पाहतात. जसे की ‘जागृती’, ‘स्वप्न’, ‘सुषुप्ती’ आणि ‘तुरीय’ या ‘विश्व’, ‘तैजस’, ‘प्राज्ञ’ आणि ‘ब्रह्म’सहित विराजमान आहेत वगैरे.
 
दशरथांच्या राण्या विवाह सोहळ्यास उपस्थित नव्हत्या. त्यांनी चार पुत्र आणि पुत्रवधूंचा अयोध्येत प्रवेश झाल्यावर त्यांना पाहिले. आपल्या कुलवधूंना राण्यांनी प्रेमाने वागवले, स्वागत केले, असे काही पंक्तींवरून लक्षात येते. या मुली लहान आहेत, आताच आपल्या घरी आल्यात, त्यांना पापणी डोळ्याला जशी जपते, तसे ठेवा, असे दशरथ महाराजांनी सांगितल्याचा उल्लेख आहे.
श्रेष्ठ मुनीला आपलं सर्वस्व पुनःपुन्हा अर्पण करू इच्छिणारा राजा दशरथ विश्वामित्रांना म्हणतो की, ”नाथ सकल संपदा तुम्हारी, मैं सेवकु समेत सुत नारी.”
 
स्वयंवरानंतर सीता-राम अयोध्येत परतले, गुरुविश्वामित्र निजस्थानी परतले, अयोध्येत सुखी प्रजा-राजा यांच्या आनंदाची अधिकता अधिकाधिक वाढत राहिली. वेळेचे चक्र फिरले की, मित्रदेखील शत्रू होतो. ’समउ फिरें रिपु होहिं पिरीते.’ कैकेयीने दोन वर दशरथांकडून मागून घेतले. रामाला १४ वर्षे वनवास आणि भरताला राजसिंहासन. ’नारिचरित जलनिधि अवगाहू’, ‘स्त्रीच्या हृदयाचा अंत लागत नाही,’ असं महाकवी या प्रसंगी म्हणतात. ’रघुकुल रीति सदा चली आई, प्रान जाहुँ बरु बचनु न जाई.’ दशरथ सीतेला, स्वेच्छेने कधी सासरी तर कधी माहेरी राहायला सांगतात; पण वनात जाऊ नको, असा उपदेश करतात.
(क्रमश:)
जीवन तळेगावकर
jeevan.talegaonkar@gmail.com