"हात जोडले तरी तुमचं नाणं कुणी घेणार नाही!"

भाजप आमदार नितेश राणेंचा राऊतांना टोला

    13-Apr-2024
Total Views |
 
Thackeray & Raut
 
मुंबई : कुणी हात जोडले तरीही तुमच्या मालकाचं नाणं घेणार नाही कारण त्यांची किंमत राहिलेली नाही, अशी टीका भाजप आमदार नितेश राणे यांनी उबाठा गटाचे नेते संजय राऊतांवर केली आहे. राऊतांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंवर केलेल्या टीकेला राणेंनी प्रत्युत्तर दिले.
 
नितेश राणे म्हणाले की, "स्वत:च्या मालकाचं महत्त्व आज बाजारातून संपलेलं आहे. कुणी हात जोडले तरीही तुमच्या मालकाचं नाणं घेणार नाही कारण त्यांची किंमत राहिलेली नाही. तेच संजय राऊत आज बावनकुळे साहेबांवर टीका करण्याची हिंमत करतात. आधी स्वत:ची आणि मालकाची बाजारात असलेली किंमत समजून घ्या आणि मग टीका करण्याची हिंमत करा."'
 
हे वाचलंत का? -  "सोनिया गांधींची गुलामी स्वीकारून...;" बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंना टोला
 
"भाजपच्या यशस्वी प्रदेशाध्यक्षांच्या नेतृत्वाखाली आम्ही लोकसभा निवडणूकांमध्ये ४ जूनला ऐतिहासिक निकाल आणणार आहोत. तुमच्या जीभेला आज हाड राहिलेलं नाही. त्यामुळे ती जीभ जेवढी कमी वळवळेल तेवढा तुम्हाला आणि तुमच्या मालकाला कमी त्रास होईल," असे ते म्हणाले.
 
तसेच यावेळी त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या टीकेलाही प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, "प्रकाश आंबेडकरांनी मोदीजींचं नाव घेतलं नाही तर त्यांच्या सभेत कुणीही त्यांना ऐकण्यासाठी येत नाही. विरोधीपक्षांना त्यांची सभा गाजवायची असल्यास त्यांना मोदी साहेबांचं नाव घ्यावंच लागतं. कारण विरोधी पक्षाच्या कुठल्याही नेत्याला काहीही किंमत राहिलेली नाही. जे आहे ते मोदीजींचंच आहे. त्यामुळे त्यांना मोदी साहेबांचं नाव घ्यावं लागतं," असेही ते म्हणाले.