फलक रेखाटनाचा दैवी हिरा...

    12-Apr-2024   
Total Views |
scsc
 
१९९५ सालापासून शाळेत दिनविशेषांवर आधारित तीन हजारांहून अधिक फलक रेखाटन करणार्‍या भाटगाव शाळेतील कलाशिक्षक देविदास हिरे यांच्याविषयी...
 
मालेगाव तालुक्यातील निमगाव येथे १९७५ साली कलाशिक्षक देविदास शिवराम हिरे यांचा जन्म झाला. त्यांचे वडील नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागात नोकरीला, तर आई गृहिणी. सोबत शेतीही होतीच. मालेगावातील ‘काकुबाईचा बाग’ या शाळेत प्राथमिक, तर माध्यमिक शिक्षण ‘झुंबरलाल पन्नालाल काकाणी विद्यालया’तून पूर्ण झाले. तेव्हा मोबाईल, टीव्ही काहीही नव्हते. त्यामुळे सूरपारंब्या, विटीदांडू, गजखुपशी... असे काही खेळ मनोरंजनासाठी खेळले जायचे. हायस्कूलमध्ये रावळ सरांच्या मार्गदर्शनामुळे देविदास यांना चित्रकलेची आवड निर्माण झाली. सुरुवातीला पाना-फुलांची चित्रे, नंतर स्थानिक वृत्तपत्रांमध्ये चित्रपटांचे कृष्णधवल पोस्टर छापून येत, ते पाहून हुबेहूब चित्रे रेखाटत. दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर, दोन वर्षांचा ’आयटीआय’ केला.
 
दरम्यान, म्युनिसिपल हायस्कूलमधील पठाण सर बाजूला असलेल्या पाणीपुरवठा केंद्रात पाणी भरण्यासाठी येत असत. त्यावेळी देविदास यांच्या वडिलांची पठाण सरांशी ओळख झाली. त्यांनी पठाण सरांना मुलाने रेखाटलेली चित्रे दाखविली. पुढे पठाण सरांच्या पुढाकाराने ’एलिमेंट्री’, ’इंटरमिजिएट’ परीक्षा देविदास उत्तीर्ण झाले. शनिवारी-रविवारी असलेल्या शिकवणी वर्गातही ते शिकवू लागले. पठाण सरांनी चित्रकलेचे साहित्य पुरवले. धुळ्यातील ‘एसएसव्हीपीएस स्कूल ऑफ आर्ट्स’मध्ये देविदास यांनी प्रवेश घेतला. वडील शिस्तप्रिय असल्याने, घरून पैसा येत नव्हते. त्यामुळे छोटी-मोठी चित्रे काढणे, पोस्टर, बॅनर बनवणे, पेंटरच्या हाताखाली काम करणे, भिंती रंगवणे अशी कामे करून त्यांनी खर्च भागवला. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर, नोकरीचा शोध सुरू झाला. राजू अहिरे या मित्राने वृत्तपत्रात कलाशिक्षकाची जाहिरात आल्याचे सांगितल्यानंतर त्यांनी अर्ज केला.
 
मुलाखतीदरम्यान तर त्यांची चित्रे अक्षरशः नखं लावून पाहिली गेली की, खरोखरंच चित्रे आहेत की छायाचित्र. काही दिवसांत निवड झाल्याचे पत्रही पोस्टाने घरी आले. अखेर १९९५ साली देविदास ’शिक्षण मंडळ भगूर’ संचालित, नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव, ता. चांदवड, जि. नाशिक या ठिकाणी कलाशिक्षक म्हणून रुजू झाले. विद्यार्थ्यांना महापुरुषांविषयी माहिती नव्हती. त्यामुळे महापुरुषांची छायाचित्रे ते फलकावर रेखाटू लागले. सुरुवातीला कृष्णधवल फलकलेखनाला सुरुवात केली. रंगीत चित्रे मुलांना आकर्षित करतात, हे लक्षात आल्यानंतर, त्यांनी रंगीत खडूंच्या साहाय्याने फलक रेखाटन सुरू केले. मात्र, हे रेखाटन लोकांपर्यंत पोहोचणार कसे, असा प्रश्न त्यांना पडला. तेव्हा त्यांनी स्वतःची बँकेतील मुदत ठेवी (एफडी) मोडून १३ हजार रुपयांचा मोबाईल विकत घेतला. त्यानंतर फलक रेखाटनाचे फोटो फेसबुक, व्हॉट्सअप या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचू लागले.
 
गणेशोत्सवात गणेशमूर्ती आणि दिवाळीत आकाशकंदील बनविण्याची कार्यशाळाही ते घेत असत. कलाशिक्षक, चित्रकार, फलक रेखाटनकार व रांगोळीकार म्हणून त्यांचे आजही कला क्षेत्रात कार्य सुरू आहे. फलक रेखाटनातून रंगीत खडू माध्यमातील चित्रमय पद्धतीने शालेय दर्शनी फळ्यावर विविध दिनविशेष, भारतीय सण-उत्सव, भारतीय संस्कृती, महापुरूष, लोकसंख्या, प्रदूषण, लेक वाचवा, पाणी वाचवा, जन साक्षरता, मतदान जनजागृती अशा विविध विषयांवर फलक चित्रातून सामाजिक संदेश व समाज प्रबोधन करण्याची चळवळ त्यांनी सुरू केली. विशेष म्हणजे, शालेय वेळेव्यतिरिक्त देविदास त्यांचा फलक लेखनाचा छंद जोपासतात.
 
बर्‍याचदा फलक रेखाटताना रात्रदेखील होते; मात्र फलकलेखन पूर्ण झाल्याशिवाय ते शाळा सोडत नाही. त्यांनी आतापर्यंत तीन हजारांहून अधिक फलक रेखाटन केले असून आजतागायत तालुका, राज्य, राष्ट्रीय पातळीवरील विविध संस्था, संघटनांतर्फे एकूण ३५ पुरस्कार प्राप्त झाले आहेत. फलक रेखाटनात विविध विषयांचे चित्रमय फलक रेखाटन करणारे, भारतातील पहिले कलाशिक्षक म्हणून त्यांची ’भारत बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद झाली. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांची (२.५ सेमी द २.५ सेमी) या आकारात जगातील सर्वात लहान पोर्ट्रेट रांगोळी साकारून, ’वर्ल्ड वाईल्ड बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नोंद झाली. तसेच बाजरीच्या भाकरीवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पोर्ट्रेट रांगोळी काढण्याचा विश्वविक्रम म्हणून ‘ओएमजी बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नोंद झाली.
 
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त विद्यार्थी साखळी पद्धतीने ’राजे’ नाव साकारून, भाटगाव शाळेची नोंद ‘ग्लोबल गोल्ड टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये झाली. राज्यातील पहिली फलक रेखाटन दिनदर्शिका २०२१ साली त्यांनी प्रसिद्ध केली. उच्च शिक्षणाच्या कला अध्यापनाच्या अभ्यासक्रमात हिरे यांनी साकारलेल्या भाटगाव शाळेतील उत्कृष्ट फलक रेखाटनाचा समावेश झाला आहे. फलक रेखाटनाद्वारे कला क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणार्‍या व काळ्या फळ्याला ऊर्जितावस्थेत आणणार्‍या देविदास हिरे यांना त्यांच्या आगामी वाटचालीसाठी दै. ’मुंबई तरूण भारत’च्यावतीने अगदी मनःपूर्वक शुभेच्छा!
७०५८५८९७६७

पवन बोरस्ते

सध्या दै. मुंबई तरुण भारत वृत्तपत्रामध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत. मागील नऊ वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय. स्वा. सावरकरांच्या जन्मभूमीत वास्तव्य. पुणे विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. राजकारण, मराठी साहित्य आणि जनसंपर्क वृद्धीत विशेष रुची.