चित्रपटांच्या चंदेरी दुनियेकडे कलाकारांना आकर्षित करते ते ‘फेम’ आणि ‘ग्लॅमर’. अशा या कलाकार मंडळींना कायमच प्रेक्षकांचा प्रतिसाद आणि त्यांची पाठीवरील शाब्बासकी आजही तितकीच महत्त्वाची असते आणि त्याकरिता प्रत्येक कलाकार आपली प्रत्येक भूमिका ही उत्तमपणे कशी साकारता येईल, यासाठी झटत असतो. आता हिंदी चित्रपटसृष्टीबद्दल सांगायचे झाल्यास, ८०-९०च्या दशकात जे कलाकार प्रेक्षकांचे मनोरंजन करत होते, त्यांच्यापुढे कालानुरुप मनोरंजनाची बरीच दालनं खुली झाली. त्यापैकीच एक महत्त्वाचे माध्यम किंवा व्यासपीठ म्हणजे ‘ओटीटी’ वाहिन्या. तेव्हा, कोणे एकेकाळी मोठ्या पडद्यावर झळकणार्या कलाकारांनी आता ‘ओटीटी’ची वाट चोखाळली आहे. त्याविषयी...
दर महिन्याला किमान पाच ते सात हिंदी चित्रपट प्रदर्शित होतात आणि त्याच्यासोबत मराठीसह इतर भाषांमधील चित्रपटही प्रदर्शनाच्या रांगेत असतात. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर नेमका कोणता चित्रपट चालेल किंवा कोणता चित्रपट प्रेक्षक डोक्यावर घेतील, याचा तसा अचूक अंदाज बांधणे तसे अवघडच. पण, ‘ओटीटी’ वाहिन्यांवर अगदी घरबसल्या जगातील विविध भाषिक प्रेक्षक एकाचवेळी विविध आशयांच्या कलाकृतींचे रसग्रहण करत असतात. प्रारंभी ‘ओटीटी’ वाहिन्यांकडे काहीसे दुय्यम माध्यम म्हणून मोठ्या कलाकारांनी नाकंही मुरडली. पण, आता ‘ओटीटी’ माध्यमांच्या व्यापकतेमुळे, त्यालाही प्राप्त झालेल्या प्रतिष्ठेच्या वलयामुळे विविध कलाकार ‘ओटीटी’कडे वळलेले दिसतात. हिंदी चित्रपटसृष्टी आपल्या अभिनय, नृत्य कौशल्याने गाजवणारे कित्येक कलाकार आता ‘ओटीटी’वर झळकू लागले आहेत.
अभिनेत्री करिना कपूर, अनिल कपूर, सुश्मिता सेन, अनुष्का शर्मा अशा या कलाकारांची खरं तर मोठी यादी. कारण, चित्रपटगृहात प्रदर्शित झालेलाकोणताही चित्रपट काही दिवसांनी किंवा लागलीच एका आठवड्यात चित्रपटगृहातून बाद होतो आणि त्यानंतर चित्रपट निर्मात्यांनी करार केला असल्यास, नियमांनुसार विशेष ‘ओटीटी’ वाहिनीवर तो चित्रपट प्रदर्शितही होतो. त्यामुळे कलाकार आणि निर्मात्यांना त्याचा आर्थिक फायदा अधिक होतो. परंतु, अलीकडे चित्रपटगृहाऐवजी थेट ‘ओटीटी’वाहिनींवर चित्रपट प्रदर्शनाचा पर्यायदेखील उपलब्ध झाल्यामुळे बॉक्स ऑफिसची टांगती तलवार निर्माते किंवा कलाकारांवर नसते. त्यामुळे बदलत्या चित्रपटसृष्टीचा कायमस्वरुपी भाग राहण्यासाठी हे कलाकार ‘ओटीटी’ वाहिनीवरही प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसतात.
२००० साली प्रदर्शित झालेल्या ‘रेफ्युजी’ या चित्रपटातून अभिनेत्री करिना कपूर हिने चित्रपटसृष्टी पदार्पण करीत आपल्या अभिनयाचा प्रवास सुरू केला. हिंदी चित्रपटसृष्टीत कपूर कुटुंबीयांचे वजन सर्वांना ठाऊक आहेच आणि आपल्या आजोबा, वडील यांच्या पावलांवर पाऊल ठेवून करिनानेही अल्पावधीत आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर एक चाहतावर्ग निर्माण केला. ‘चमेली’, ‘हंगामा’, ‘खुशी’, ‘अंग्रेजी मिडियम’, ‘ओमकारा’, ‘फिदा’, ‘अजनबी’, ‘मै प्रेम की दिवानी हुं’, ‘कभी खुशी कभी गम’ यांसारख्या काही सुपरहिट चित्रपटांमधील करिनाच्या भूमिका विशेष उल्लेखनीय ठरल्या. परंतु, कालांतराने मोठ्या पडद्यावरील चित्रपट हिट होत नसल्यामुळे आता करिनानेही ‘ओटीटी’ची वाट धरल्याची चर्चा रंगली आहे. ‘जाने जा’ या चित्रपटाद्वारे करिनाने नवी सुरुवात केलेली दिसते.
१९९४ साली ‘मिस युनिव्हर्स’ हा किताब जिंकणारी अभिनेत्री म्हणजे सुश्मिता सेन. चित्रपटविश्वात कोणाचाही आधार नसताना किंवा पाठीशी कोणीही ‘गॉड फादर’ नसताना सुश्मिता सेन हिने १९९६ साली ‘दस्तक’ या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण केले. यानंतर ‘समय’, ‘बेवफा’, ‘वास्तुशास्त्र’, ‘राम गोपाल वर्मा की आग’, ‘आंखे’, ‘मै हुं ना’, ‘मैने प्यार किया’, असे एकाहून एक हिट चित्रपट दिले. २०१५ नंतर ती चित्रपटांपासून काहीशी लांब गेली आणि तिने ‘ओटीटी’वर स्वत:ला सिद्ध करण्यास सुरुवात केली. यात ‘आर्या’, ‘ताली’ या तिच्या सुश्मिताच्या गाजलेल्या वेबसीरिज. तसेच अभिनेत्री करिष्मा कपूरनेही ‘नेटफ्लिक्स’वरील ‘मर्डर मुबारक’ या चित्रपटाच्या निमित्ताने ‘ओटीटी’वर नुकतेच पदार्पण केले असून, तिच्या आगामी कलाकृतींची वाट तिचे चाहते पाहत आहेत. याशिवाय शिल्पा शेट्टी, वाणी कपूर, मनीषा कोयराला, सोनाक्षी सिन्हा या अभिनेत्रीदेखील ‘ओटीटी’वर वेबसीरिज किंवा चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत.
‘ओटीटी’मुळे जसे प्रेक्षकांना त्यांच्या आवडीची आशयनिर्मिती करणारे माध्यम निवडण्याची स्वतंत्रता मिळाली, त्याचप्रमाणे कलाकारांनादेखील नव्या पिढीच्या प्रेक्षकांना आपलेसे करण्याची संधी ‘ओटीटी’द्वारे मिळाली आहे. मुळात माध्यम कोणतेही असो, रसिकप्रेक्षकांचे मनोरंजन करणे हाच ध्यास प्रत्येक कलाकाराचा असेल,तर प्रेक्षकही त्यांच्या प्रत्येक भूमिकेला आणि कलाकृतीला नक्कीच दाद देतील.
‘ओटीटी’वर पदार्पण करणारे कलाकार
अनुष्का शर्मा
अभिनेत्री अनुष्का शर्मा ‘चकदा एक्सप्रेस’ या चित्रपटाद्वारे ‘ओटीटी’वर झळकणार असून ‘झिरो’नंतर चित्रपटांपासून दूर गेलेली अनुष्का आता वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामींच्या भूमिकेत ‘चकदा एक्सप्रेस’मध्ये दिसणार आहे.
क्रिती सेनॉन
‘क्रू’सारखा सुपरहिट चित्रपट दिल्यानंतर क्रिती ‘ओटीटी’कडे वळणार असून ‘दो पत्ती’ या चित्रपटाच्या निमित्ताने ती ‘ओटीटी’ वाहिनीवर अभिनेत्री आणि निर्माती म्हणून पदार्पण करणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेत्री काजोलदेखील झळकणार आहे.
उर्मिला मातोंडकर
९०च्या दशकातील देखणी मराठमोळी अभिनेत्री उर्मिला मातोंडकर गेली अनेक वर्षं चित्रपटांपासून लांब होती. मात्र, पुन्हा एकदा ती अभिनय क्षेत्रात सक्रिय होणार असून, सौरभ वर्मा यांच्या ‘तिवारी’ या वेबसीरिजमधून ती ‘ओटीटी’वर दिसणार आहे.