समाजात भक्ती आणि समर्पणाची भावना जागवणे हेच संघाचे कार्य
सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे प्रतिपादन
12-Apr-2024
Total Views |
मुंबई (प्रतिनिधी) : "स्वार्थ आणि भेद जीवनातून हटवून सद्गुणसंपन्न व्यक्तीनिर्माणासाठी तसेच भेद आणि स्वार्थाला नष्ट करून एकरस, एक समाज बनवण्यासाठी संघाची स्थापना झाली. समाजात भक्ती आणि समर्पणाची भावना जागवणे हेच संघाचे कार्य आहे.", असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत (Mohanji Bhagwat) यांनी केले.
'समर्पण' या स्व.दत्ताजी भाले स्मृति समिती कार्यालयाचा वास्तू प्रवेश लोकार्पण सोहळा गुरुवार, दि. ११ एप्रिल रोजी छत्रपती संभाजी नगर येथे संपन्न झाला. यावेळी मंचावर स्व.दत्ताजी भाले स्मृती समिती न्यासचे अध्यक्ष देवानंद कोटगिरे व प्रांत संघचालक अनिलजी भालेराव उपस्थित होते.
आपलेपणाचा (आपुलकी) विस्तार का महत्त्वाचा आहे हे सांगताना सरसंघचालक म्हणाले, "समाजात कर्तृत्ववान आणि बुद्धीवान लोकांची संख्या अधिक आहे. असे असतानाही आज आपण स्वतःला विसरत चाललो आहोत. सोबतच समाजात आपले कोण आहेत त्यांनाही विसरत आहोत. अशामुळे भेदभाव आणि स्वार्थ या गोष्टी अनेकांमध्ये तयार झालेल्या दिसत आहेत. याकरीता आपलेपणाचा विस्तार हेच जीवनाचे श्रेय मानले आहे. ज्याच्या आपलेपणाचा विस्तार जास्त तितका तो व्यक्ती वंदनीय."
ज्ञान, कर्म आणि भक्ती या तीन गोष्टी संयोग जीवनासाठी महत्त्वाचे आहे, याबाबत सांगताना सरसंघचालक म्हणाले, "एखादे कार्य संपन्न करण्यासाठी परिश्रम करावे लागतात. त्यासाठी शरीर, मन आणि बुद्धीने झिजावे लागते. कार्य विचारपूर्वक करावे लागते. ज्ञान आणि कर्म हे दोन असे पंख आहे, ज्यापासून परमप्राप्त होते. परंतु सर्वज्ञानी असल्यास अहंकारही निर्माण होऊ शकतो. ज्ञान रामाकडेही होतं आणि रावणाकडेही. परंतु रावणामध्ये अहंकार होता, रामामध्ये तो नव्हता. दोघेही शिवभक्त होत. सर्व गोष्टी समान असतानाही परिणाम वेगळे निघाले. कारण ज्ञानाला अहंकार बाधू शकतो, हे यातून दिसून आले. ज्ञान आणि कर्म हे दोन पंख असतील तर त्यास धारण करणारा पक्षी हा 'भक्ती' आहे. भक्तीशिवाय कर्म 'विक्षिप्त कर्म' होते. ज्ञान अहंकारी होते. ज्ञान, कर्म आणि भक्ती या तीन गोष्टींच्या संयोगाने सुखद परिणाम तयार होतात."
पुढे ते म्हणाले, "देशात चांगल्या परिवर्तनाचा काळ आला आहे. जगात भारताची प्रतिष्ठा वाढली आहे. विश्वाचे लक्ष्य भारतीय संस्कृती आणि तत्वज्ञानाकडे गेले आहे. साऱ्या जगाला वाटते आहे की, भारताकडूनच आपल्याला दिलासा मिळेल. भारताचा राष्ट्रीय पुरुषार्थही आता वाढला आहे. त्याचे स्वाभाविक परिणाम आपल्याला व्यक्तिगत जीवनात नक्कीच दिसून येतात."
समर्पण वास्तू आणि दत्ताजींविषयी बोलताना सरसंघचालक म्हणाले, "दत्ताजी भाले आणि समर्पण हे दोन समानार्थी शब्द आहेत. वास्तूला त्यांचे नाव देण्यामागे एक उद्देश आहे. प्रत्येकाच्या समर्पणामुळे ही वास्तू उभी राहिली असली तरी त्यात वातावरण निर्मिती प्रत्येकाला तयार करायची आहे. त्यासाठी आपल्याला परिश्रम घ्यावे लागतील."