मंत्री लोढांच्या भेटीनंतर मुंबईतील परंपरागत रामनवमी उत्सवाचा मार्ग मोकळा!

    12-Apr-2024
Total Views |
 
Mangalprabhat Lodha
 
मुंबई : कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी रामनवमी उत्सवाच्या परवानगी संदर्भात शुक्रवारी राम नवमी उत्सव आयोजक मंडळांसह पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर आणि विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती यांची भेट घेतली. मुंबईत विविध मंडळाद्वारे राम नवमीच्या आधी येणाऱ्या शनिवार किंवा रविवारी ठिकठिकाणी उत्सवाचे आयोजन करण्यात येते. परंतु यावर्षी रविवारी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे आणि इतर काही तांत्रिक कारणांमुळे राम नवमी उत्सव साजरा करण्यास पोलिसांनी मुंबईतील काही भागात परवानगी नाकारली होती.
 
दरम्यान, मंत्री लोढा यांनी रामनवमीच्या आधी सदर उत्सवांचे आयोजन करण्याची परवानगी मिळावी अशी विनंती सदर बैठकीत केली. तसेच त्यानुषंगाने पोलिसांनी सहकार्य करत आवश्यक परवानगी दिली आहे. ५०० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर रामलला अयोध्येतील भव्य मंदिरात विराजमान झाले आहेत त्यामुळे यावर्षी रामनवमीला विशेष महत्व आहे. रामनवमीच्या आधी हा उत्सव साजरा करण्यासाठी परवानगी मिळावी अशी विनंती मंत्री मंगल प्रभात लोढा यांना विविध मंडळांद्वारे करण्यात आली होती, त्यानुसार मंत्री लोढा यांनी पुढाकार घेतला आणि पोलिसांशी चर्चा केली.
 
हे वाचलंत का? -  पीयूष गोयल यांनी घेतले श्री सद्गुरू अनिरुद्ध बापूंचे आशीर्वाद!
 
यावेळी बोलताना मंत्री लोढा म्हणाले की, "१५ ते २० वर्षांपासून विविध मंडळाद्वारे मुंबईमध्ये रामनवमी उत्सव, रामनवमीच्या आधीसुद्धा साजरा करण्याची प्रथा आहे. त्यासाठी आवश्यक परवानगीदेखील त्यांच्याकडे आहे, परंतु, यावर्षी काही तांत्रिक करणाने त्यांना सदर परवानगी नाकारण्यात आली होती. त्यामुळे या १० ते १२ मंडळांना घेऊन आम्ही पोलीस आयुक्त आणि विशेष पोलीस आयुक्तांची भेट घेतली. आमच्या विनंतीला मान देऊन, आमच्या समस्या ऐकून पोलिसांनी पूर्वीपासून परवानगी असलेल्या मंडळांसाठी बंधने शिथिल केली आहेत. पोलिसांनी केलेल्या सहकार्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत," असे ते म्हणाले.