रणदीप हुड्डा दिग्दर्शित आणि अभिनित ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटाने ब़ॉक्स ऑफिसवर आत्तापर्यंत २१.६० कोटी कमावले आहेत.
मुंबई : ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ (Swatantryveer Savarkar) हा बायोपिक सध्या चर्चेत आहे. रणदीप हुड्डा यांनी अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणून या चित्रपटाला योग्य न्याय दिल्याच्या सकारात्मक प्रतिक्रिया सर्वच स्तरांतून येत आहेत. ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ (Swatantryveer Savarkar) या चित्रपटात सावरकरांच्या भूमिकेत रणदीप दिसत असून यासाठी त्याने शारिरिक ट्रान्सफॉर्मेशन केले होते. प्रचंड मेहनत घेत त्याने वजन कमी केले होते. या सगळ्या प्रवासाबद्दल एका मुलाखतीत त्याने भाष्य केले आहे.
रणदीप हुड्डाने 'मिड- डे' ला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, “ ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटासाठी मी दीड वर्ष वजन कमी करत होतो. जवळपास ३२ किलो वजन मी कमी केलं. या काळात काटेकोरपणे डाएट फॉलो केल्यामुळे मला खुप अशक्तपणा जाणवत होता. मला चालणंही कठीण झालं होतं", असे रणदीप म्हणाला.
पुढे तो म्हणाला की, "मला एका आठवड्याला जवळपास ५ ते ७ किलो वजन कमी करायचं होतं. त्यामुळे मी इंटरमिडिएट फास्टिंग करायला सुरुवात केली. या डाएटमध्ये १६ तासांच्या अंतरावर जेवण करायचं असतं. हा नियम मी प्रामाणिकपणे फॉलो करत होतो. आणि हे फार चॅलेंजिंग होतं. मला खूप अशक्तपणा आला होता. मी अनेकदा बेशुद्धही पडायचो. पण काहीही करुन सावरकर उत्तम साकारायचे होते त्यामुळेच माझी मेहनत सुरु होती. पण कदाचित माझी मेहनत इतकी जास्त झाली की माझ्या जीवावर ते बेतलं असतं. एवढी माझी अवस्था वाईट झाली होती", असा अनुभव रणदीप याने सांगितला.
दरम्यान, २२ मार्च रोजी ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ हा चित्रपट हिंदी भाषेत आणि २९ मार्च रोजी मराठी भाषेत प्रदर्शित झाला होता. मराठी भाषेतील चित्रपटात अभिनेता सुबोध भावे याने सावरकरांच्या व्यक्तिरेखेला आवाज दिला होता.