"वडेट्टीवार चव्हाणांचे राईटहँड! लवकरच भाजपमध्ये जाणार!"
11-Apr-2024
Total Views | 204
मुंबई : विजय वडेट्टीवार हे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांचे राईट हँड असून ते लवकरच भाजपमध्ये जाणार आहेत, असा गौप्यस्फोट मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी केला आहे. तसेच यासंदर्भातील चर्चेत आपण उपस्थित असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. टीव्ही ९ मराठी या वृत्तवाहिनीशी चर्चा करताना त्यांनी हा खुलासा केला.
मंत्री धर्मरावबाबा आत्राम म्हणाले की, "विजय वडेट्टीवार हे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण राईट हँड आहेत. वडेट्टीवार सध्या विरोधी पक्षनेते आहेत. प्रकाश देवतळे, डॉ. नामदेव उसंडी, डॉ. कोडवाते हे भाजपमध्ये आले. ही एकप्रकारे दिशा आहे की, आज किंवा उद्या विजय वडेट्टीवार भाजपमध्ये जाणार आहेत. ही गोष्ट १०० टक्के खरी असून यासंदर्भात झालेल्या चर्चेत मी होतो. त्यामुळे ते आज नाहीतर उद्या भाजपमध्ये जातील हे १०० टक्के पक्कं आहे."
"माझ्यासमोर याबाबत चर्चा झाली आहे. अशोक चव्हाण भाजपमध्ये गेल्यानंतर वडेट्टीवार इथे राहून काय करणार. त्यामुळे तेसुद्धा जातील. त्यांना पक्षात घेणं न घेणं हा भाजपचा निर्णय आहे. परंतू, ते भाजपमध्ये जाणार हे निश्चित आहे," असेही ते म्हणाले आहेत. लवकरच राज्यात लोकसभा निवडणूका होणार असून मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेशही सुरु आहेत. दरम्यान, आता धर्मरावबाबा आत्राम यांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.