फन केलेले मृतदेह जमिनीतून बाहेर दिसू लागले; मात्र त्या मृतदेहातील हाडं गायब होती. सर्वत्र हेच दृश्य... आप्तजनांनी मृत नातेवाईकाला दफन केले की, अमली पदार्थांच्या आहारी गेलेले व्यसनी लोक तो मृतदेह कबरीतून काढतात. त्या मृतदेहाची हाडं चोरून, त्यापासून ‘कुश’ नावाचा अमली पदार्थ बनवतात. हे कुठे घडतयं, तर सिएरा लियोन या क्षेत्रफळ आणि लोकसंख्येच्याबाबत अत्यंत छोट्या असलेल्या देशात. मृतदेह असे कबरीबाहेर काढले जातात, त्यामुळे लोकांमध्ये असंतोष पसरला. त्यामुळे सिएरा लियोनचे राष्ट्रपती जूलियस माडा बायो यांनी कब्रस्तानाच्या भोवती कडक बंदोबस्ताचे आदेश दिले. तसेच देशात संचारबंदीही लागू केली. अशा विचित्र कारणासाठी देशात संचारबंदी करणारा कदाचित सिएरा लियोन हा पहिलाच देश असावा.
मृतदेहाच्या हाडांपासून तयार होणारा ‘कुश’ हा अमली पदार्थ अत्यंत घातक असून, या अमली पदार्थामुळे देशाची तरुणाई बरबाद झाली आहे. व्यसनामुळे हात-पाय वाकडे झालेले, पाठीला बाक आलेले आणि तोंड हात-पाय सुजलेले लोक शक्तिविहीन अवस्थेत सर्वत्र फिरताना दिसतात. ते शारीरिक आणि मानसिकरित्याही विकलांग झालेले असतात. समाजातील सर्वच स्तरावरील वाढत्या व्यसनाधीनतेला आळा बसावा म्हणून येथील प्रशासनाने एक विशेष टास्क फोर्स गठीत करण्याचा निर्णय घेतला. तसेच प्रत्येक जिल्ह्यात व्यसनमुक्तीसाठी एक केंद्र निर्माण करण्याचाही निर्धार केला आहे. अर्थात, इतक्या सगळ्या उपाययोजना केल्या, तरी संबंधितांनी त्याचा उपयोग तर केला पाहिजे.
सिएरा लियोन गेल्या काही महिन्यांपासून आपल्या देशातही चर्चेत आहे. कारण, गेल्याच आठवड्यात सांताक्रुझ विमानतळावर कोट्यवधी रुपयांचे अमली पदार्थ घेऊन जाणारा गुन्हेगार पकडला गेला. ११ कोटी रुपयांच्या अमली पदार्थांच्या ७१ कॅप्सुल्स घेऊन, हा गुन्हेगार मुंबईमध्ये उतरला होता. या गुन्हेगाराला जेव्हा जाणवले की, तो पकडला जाणार आहे, तेव्हा त्याने या ७१ कॅप्सुल गिळून टाकल्या. हा गुन्हेगार सिएरा लियोन देशाचा नागरिक आहे. त्याच्या आधी गेल्या महिन्यात एका महिलेच्या चपलेच्या सोलमध्ये, शॅम्पूच्या बॉटल्सच्या तळामध्येही कोट्यवधी रुपयांचे अमली पदार्थ सापडले, तीसुद्धा सिएरा लियोनची आणि सध्या भारतीय तुरुंगात आहे. याचाच अर्थ सिएरा लियोन हे नशेचा बाजार व गुन्हेगार भारताच्या अमली पदार्थाच्या बेकायदेशीर बाजाराचे केंद्र म्हणावे लागेल.
असो. सिएरा लियोनमध्ये ७८ टक्के मुस्लीम धर्मीय, तर २२ टक्के ख्रिश्चन धर्मीय लोक राहतात. नशेच्या बाजारात गुंतलेल्या या देशाचे नाव आणखी एका बाबतीत कुप्रसिद्ध आहे-ते म्हणजे महिलांचा खतना करण्यासाठी. मुस्लीम समाजात पुरुषांचा खतना केला जातो. मात्र, या देशात मुलींचाही खतना केला जातो. मुलींच्या लैंगिक इच्छा कमी व्हाव्यात म्हणून म्हणे, मुलींचा खतना केला जातो. अॅनेस्थिया न देता, वापरलेल्या ब्लेडने खतना केल्यामुळे, मुलींची अवस्था दयनीय असते. सगळ्याच सुविधांचा वानवा असलेल्या या गरीब देशात किती तरी मुली खतना केल्यानंतरच्या जखमेमुळेच मृत्युमुखी पडल्या. गेल्याच महिन्याची घटना- एडमसे सेसे (१२ वर्ष), सलामतू जोल्लाह (१३ वर्ष) आणि कदियातू बंगारू (१७ वर्षे) या तीन मुलींचा खतना केल्यामुळे मृत्यू झाला. खतना करणार्या नातेवाईकांवर कारवाई झाली.
मात्र, येथील समाजाचे मत असे की, खतना सामाजिक विधी आहे, त्यात कारवाई करणे चुकीचे! रुढी परंपरेबद्दल बोलणारे सिएरा लियोनचे लोक मुस्लीम आणि ख्रिश्चन म्हणून त्या-त्या धर्माच्या मान्यता पाळणारे लोक. मात्र, याच देशात चारपैकी दोन मुली वेश्या व्यवसायात अडकलेल्या आहेत. जागतिक अभ्यासकांच्या मते, या देशात इतकी गरिबी आहे की, कुटुंबाला एक वेळचे जेवण मिळावे म्हणून घरातल्या मुलींना आणि बालकांनाही देहविक्रीच्या धंद्यात ढकलले जाते. एक डॉलर ते सॅनिटरी नॅपकिनसाठी वयाच्या ११व्या वर्षी देहविक्री करायला लागलेल्या बालिका येथे आहेत. बालकांच्या देहव्रिकीसाठी कुप्रसिद्ध असलेला हा देश आता नशेच्या घृणित व्यापारासाठीही बदनाम आहे. याबद्दल वाटते की, ’मुस्लीम बद्ररहुड’ म्हणत, अतिरेकी होण्यासाठी ’इसिस’मध्ये भरती होणारे, ’सीएए’विरोधात शाहीनबाग आंदोलन करणारे या सिएरा लियोनच्या खर्या अर्थाने वंचित मुस्लिमांसाठी काही बोलताना दिसत नाहीत. सिएरा लियोनमधील मुस्लीम काय मुस्लीम नाहीत, मग त्यांच्याबद्दलचे ’मुस्लीम बद्ररहुड’ संपले का?