माओवाद्यांनी बंद केलेल्या राम मंदिराचे दार दोन दशकांनंतर उघडले
"CRPF"च्या जवानांचे गावकऱ्यांनी मानले आभार
10-Apr-2024
Total Views |
मुंबई (प्रतिनिधी) : दोन दशकांहून अधिक काळ माओवाद्यांनी बंद केलेल्या राम मंदिराचे (Chhattisgarh Ram Mandir) दरवाजे सीआरपीएफच्या जवानांनी अखेर उघडले आहेत. छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त असलेल्या सुकमा जिल्ह्यातील केरळपेंडा गावाने २१ वर्षे प्रभू राम मंदिराचे दरवाजे उघडण्यासाठी वाट पाहिली होती. मात्र गावाजवळ सीआरपीएफची छावणी उभारल्यानंतर मंदिराचे दरवाजे खुले करण्यात यश आले आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, हे मंदिर १९७० मध्ये बिहारी महाराजांनी बांधले होते. बांधकामासाठी लागणारे साहित्य आणण्यासाठी ग्रामस्थांनी सुमारे ८० किलोमीटर पायी प्रवास केला होता. त्यावेळी या प्रदेशात रस्ते जोडणी आणि वाहतुकीसाठी पुरेशा सुविधांचा अभाव असतानाही ग्रामस्थांनी पायी अंतर कापून बांधकाम साहित्य आणले. मंदिराच्या स्थापनेनंतर, गावकऱ्यांपैकी अनेकांनी मांस आणि मद्य पिणे सोडले होते. मात्र लखापाल आणि केरलापेंडा गावांजवळील माओवाद्यांनी दिलेल्या धमकीनंतर २००३ मध्ये राम मंदिराचे दरवाजे बंद करण्यात आले.
गावात एक भव्य जत्रा भरवली जायची. त्यात लगतच्या गावातील भाविक यायचे. गावातील लोक त्यांच्या धार्मिक श्रद्धा आणि सवयींमुळे हिंसेपासून स्वतःला दूर ठेवत आहेत, असा समज झाल्याने माओवाद्यांनी मंदिरात पूजा करण्यास मनाई केली. कालांतराने माओवाद्यांचा धोका वाढल्याने मंदिरातील पूजा थांबली आणि जत्रा थांबली. अखेर माओवाद्यांनी मंदिराचे दरवाजे बंद केले.
मार्च २००३ मध्ये गावाजवळ सीआरपएफच्या ७४ व्या बटालियन कॅम्पची स्थापना झाल्यानंतर जवानांनी गावकऱ्यांचा विश्वास जिंकण्यासाठी आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मंदिराचे दार उघडले. ग्रामस्थांसह अधिकारी व जवानांनी मंदिराभोवती स्वच्छता मोहीम राबवली. हिंदु परंपरा आणि विधिवत पद्धतीने मंदिरातील देवतांची पूजा करण्यात आली. गावकऱ्यांनी मंदिराचे दार उघडल्याबद्दल सीआरपीएफ अधिकारी व जवानांचे आभार मानले. मंदिराच्या नूतनीकरणासाठी सुरक्षा कर्मचाऱ्यांना गावकऱ्यांनी विनंती केल्याचे सध्या दिसते आहे.
मंदिरात ग्रामस्थांकडून नित्य पूजा आणि विधी सुरू झाले आहे. अलीकडेच, महिला आणि मुलांच्या गटाने संध्याकाळच्या वेळी मंदिरात पूजाअर्चा केली. मंदिर उघडल्यानंतर गावात सकारात्मकता पसरवण्याचा आणि त्यांना विकासाशी जोडण्याचा प्रयत्न असल्याचे सीआरपीएफच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.