अबुधाबी BAPS हिंदू मंदिर 'Pre-Registration Process' सुरु करणार!

    10-Apr-2024
Total Views |

BAPS Hindu Mandir
मुंबई (प्रतिनिधी) : युएईची राजधानी असलेल्या अबुधाबीमध्ये बॅप्सच्या स्वामी नारायण मंदिराचे (BAPS Hindu Mandir) लोकार्पण झाल्यापासून येथे येणाऱ्या भाविकांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. ईद आणि आगामी हिंदू सणांच्या सुट्ट्यांमुळे याठिकाणी आणखी गर्दी वाढेल, असा अंदाज अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी मंदिर समितीने पूर्व-नोंदणी प्रक्रिया सुरू करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
गुढीपाडव्याच्या निमित्ताने हजारो भाविकांनी मंदिराला भेट दिली. बैसाखी, विशू, तामिळ नववर्ष, बिहू, रामनवमी आणि हनुमान जयंती यांसारख्या महत्त्वाच्या सणांच्या दिवशीसुद्धा मोठ्या संख्येने भाविक येण्याची चिन्हं आहेत. त्यामुळे त्यांच्या सोयीसाठी मंदिर समितीकडून पूर्व-नोंदणी प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे.

हे वाचलंत का? : माओवाद्यांनी बंद केलेल्या राम मंदिराचे दार दोन दशकांनंतर उघडले

पूर्व-नोंदणी प्रक्रियेनुसार येणाऱ्या भाविकांना त्यांच्या पसंतीची तारीख आणि वेळ निवडण्याची मुभा आहे. त्यामुळे गर्दीवर नियंत्रण आणि भाविकांच्या सुरक्षेच्या बाबतीत योग्य व्यवस्थापन करणे सोपे होणार आहे. तरी येणाऱ्या भाविकांना पूर्व-नोंदणी प्रणाली वापरून त्यांच्या भेटीची योजना आखण्यासाठी आणि त्यांच्या वेळेचा पुरेपूर वापर करण्यास बॅप्सने प्रोत्साहित केले आहे. https://www.mandir.ae/visit या संकेतस्थळास भेट दिल्यास अधिक माहिती उपलब्ध होईल.