मुंबई : मी लहानपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक होतो. पुढे डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या विचारांनी प्रेरित होऊन राजकारणात आलो. आजन्म मी त्यांच्या विचारांवर माझी वाटचाल सुरू ठेवली, असे प्रतिपादन माजी राज्यपाल, माजी केंद्रीय मंत्री तथा भाजपाचे ज्येष्ठ नेते राम नाईक यांनी केले.राम नाईक यांना पद्मभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल शनिवार, दि. ९ मार्च रोजी बोरीवली पूर्व येथील गोपाळजी हायस्कूलमध्ये त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी, शिवसेना नेते खासदार गजानन कीर्तिकर, आमदार योगेश सागर, मनिषा चौधरी, सुनिल राणे, प्रकाश सुर्वे, विद्या ठाकूर, अमित साटम, जनसेवा बँकेचे अध्यक्ष जे. पी. मिश्रा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुंबई नगर सह संघचालक विष्णू वझे, भाजपाचे ज्येष्ठ नेते आर. यू. सिंग, भाजपाचे महाराष्ट्र उपाध्यक्ष जयप्रकाश ठाकूर, उत्तर पश्चिम अध्यक्ष संतोष मेढेकर उपस्थित होते.
यावेळी राम नाईक म्हणाले, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी काश्मीर विषयावर पंडित नेहरू यांच्याशी वाद झाल्यानंतर राजीनामा दिला. त्यानंतर भारतीय जनसंघाची स्थापना केली. त्यावेळी मी पुण्यात शिक्षण घेत होतो. त्यांच्या विचारांनी प्रेरीत होऊन मी राजकारणात काम करायचा निर्णय घेतला. चांगली नोकरी सोडून संघटनेसाठी काम सुरू केले. मी मुंबईचा संघटन मंत्री झालो. तेव्हा आमच्या उमेदवाराचे डिपॉझिट वाचले तरी जिंकल्यासारखा आनंद व्हायचा. तेथून आजवरचा पक्षाचा प्रवास थक्क करणारा आहे.
पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे अंत्योदयासंदर्भातील विचार मला भावले. सगळ्यात शेवटच्या माणसासाठी काम करा, हा त्यांचा सल्ला मी कायम लक्षात ठेवला. कुष्ठरोग्यासाठी मी उभारलेल्या देशव्यापी लढ्यामागील प्रेरणा तीच होती, असेही राम नाईक म्हणाले. कारगिल युद्धात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांना पेट्रोल पंप आणि गॅस एजन्सी देऊन त्यांना जगण्याचे बळ आमच्या सरकारने दिले. पेट्रोलियम मंत्री या नात्याने ही संकल्पना मी तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्याकडे मांडली होती. माझ्या जीवनात सगळ्यात मोठे काम कुठले केले असेल, तर ते म्हणजे लोकसभेत राष्ट्रगीत आणि वंदे मातरम सुरू करायला लावणे.मी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे, पण भाजपचे काम थांबवलेले नाही. पक्ष देईल ती जबाबदारी मी आजही पार पाडत आहे, असेही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले.
राम नाईक हे 'आदर्श पुस्तक'
आमचे मार्गदर्शक राम नाईक यांचे जीवन हे प्रत्येक कार्यकर्त्यासाठी 'आदर्श पुस्तक' आहे. सामान्य स्वयंसेवक ते आमदार, खासदार, मंत्री आणि राज्यपाल पद त्यांनी भूषवले. पण त्यांच्या वागण्या बोलण्यात कधीच बदल झाला नाही. संघटनेचा आणि त्यांचा आत्मा कधी वेगळा झाला नाही. त्यांना पद्मभूषण देणे, हा एका सच्च्या मुंबईकराचा हा सन्मान आहे, असे प्रतिपादन भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी केले.
'पद्मभूषण'पेक्षाही राम नाईक यांचे काम मोठे - कीर्तिकर
राम नाईक यांच्यासोबत प्रत्यक्ष काम करण्याचा मला दीर्घ अनुभव आहे. युती म्हणजे केवळ सत्ता वाटप नव्हे, तर एकमेकांना सांभाळून घेत, सोबत पुढे जाणे, हा मंत्र त्यांनी आम्हाला शिकवलं. त्यांचे आशीर्वाद आणि मार्गदर्शन आमच्या पाठी कायम राहिले. भाजपची विचारधारा तळागाळात रुजवण्याचे काम त्यांनी केले. पद्मभूषण पुरस्कारापेक्षाही त्यांचे काम मोठे आहे. त्यांना हा पुरस्कार दिल्यामुळे 'पद्मभूषण'ची गरिमा वाढली, असे उद्गार शिवसेना नेते गजानन कीर्तिकर यांनी यावेळी काढले.