फ्रान्सचा गर्भपात हक्क कायदा आणि बरेच काही...

    09-Mar-2024   
Total Views |
France's abortion rights law

महिलांना गर्भपाताचा अधिकार संविधानिकरित्या द्यावा का? या विषयावर फ्रान्समध्ये बरेच वर्षं वाद-चर्चा रंगल्या. नुकतेच फ्रान्सच्या संसदेत ७८० लोकप्रतिनिधींनी महिलांना गर्भपाताचा अधिकार मूलभूत अधिकार द्यावा म्हणून समर्थन केले, तर विरोधात केवळ ७२ खासदार होते. ८ मार्च रोजी जागतिक महिला दिनाच्या औचित्यावर फ्रान्स सरकारने सर्वानुमते महिलांना गर्भपाताचा हक्क संविधानात समाविष्टदेखील केला. त्या अनुषंगाने महिलांचा गर्भपाताचा हक्क आणि वास्तविकता याचा मागोवा घेणारा हा लेख...

फ्रान्सच्या त्या जगप्रसिद्ध आयफेल टॉवरवर रोषणाईच्या आतषबाजीमध्ये शब्द झळकले - ’माय बॉडी, माय चॉईस.’ फ्रान्सवासीयांमध्ये एक अभूतपूर्व उत्साह ओसंडून वाहत होता. कारण, तेथील महिलांना गर्भपाताचा संविधानिकरित्या अधिकार फ्रान्सने बहाल केला आहे.फ्रान्सचे पंतप्रधान ग्रैब्रिएल अत्तल याबाबत म्हणाले की, ”आम्ही यानिमित्ताने देशभरातील महिलांना संदेश देत आहोत की, तुमचे शरीर हे तुमचेच शरीर आहे. शरीरासंदर्भातले निर्णय घेणे, हा तुमचा हक्क आहे. तो निर्णय दुसरा कोणी घेऊ शकत नाही.” दुसरीकडे फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन म्हणाले की, ”आम्ही देशातील महिलांना वचन दिले होते की, आम्ही तुम्हाला गर्भपाताचा संविधानिक अधिकार देऊ. ते वचन आम्ही पूर्ण केले.” तसे पाहायला गेले, तर फ्रान्समध्ये १९७५ सालापासून हा अधिकार महिलांना होता. त्यानुसार १४ आठवड्यांपर्यंत असलेल्या गर्भाचा गर्भपात करण्याचा अधिकार महिलांना संविधानाने दिला होता. इतकेच काय १९८८ साली फ्रान्स हा पहिला देश होता, जिथे गर्भपातासाठी ‘मिफीप्रिस्टोन’ टॅबलेटचा वापर कायदेशीररित्या केला गेला. आता फ्रान्सने महिलांना संविधानिकरित्याच गर्भपाताचा अधिकार जाहीर केला आहे. फ्रान्सचे ८० टक्के नागरिक या अधिकाराच्या समर्थनार्थ होते आणि आहेत. पण, अनेकांना प्रश्न पडू शकतो की, गर्भपाताचा हक्क महिलांना मिळावा, हे काय इतके महत्त्वाचे आहे का?

गर्भपाताबाबत...

’युनायटेड प्रेगनन्सी अ‍ॅण्ड अबॉर्शन वर्ल्डवाईल्ड २०२२’ या अहवालानुसार, ज्या देशात काही अटींवर गर्भपाताला मंजुरी आहे, त्या देशातील गर्भपाताच्या दराइतकाच ज्या देशात गर्भपाताला बंदी आहे, त्याही देशातील गर्भपाताचा दर आहे. या अहवालानुसार, ज्या देशात गर्भपाताला बंदी आहे, तिथे प्रति एक हजार गर्भवती महिलांपैकी ३९ महिला गर्भपात करतात. मात्र, जिथे कायद्याच्या चौकटीत राहून, महिला गर्भपात करू शकतात, त्या देशांमध्ये प्रति एक हजार गर्भवती महिलांपैकी गर्भपात करणार्‍या ३६ महिला असल्याचे हा अहवाल सांगतो. तसेच जिथे गर्भपाताबाबत जाचक अटी नसून शिथिलता आहे, तिथे एक हजार महिलांपैकी ४१ महिला गर्भपात करतात, असे निष्पन्न झाले. याचाच अर्थ, जगभरात गर्भपात हे कायदेशीररित्या असो वा बेकायदेशीररित्या सुरूच आहेत. असे असताना फ्रान्स सरकारच्या या निर्णयाचे इतके पडसाद का उमटावेत? तर याचे संदर्भ फ्रान्सच्या नव्हे, तर ख्रिस्ती धर्मांसंबंधित धार्मिकतेशी आहेत.

फ्रान्स असू दे की ब्रिटन, रोम की अगदी अमेरिका, अतिआधुनिकतेच्या आवेशातही हे सगळे देश त्यांचे कट्टर ख्रिस्तित्व जपून आहेत. येशू, बायबल आणि अगदी क्रूसेडच्या संकल्पनेशीही हे देश बांधीलच आहेत. त्यामुळे गर्भपाताबद्दल बायबलमध्ये काय लिहिले आहे, त्यानुसारच कायदे बनवायचे, त्यानुसारच ख्रिस्ती कुटुंबाने जगले पाहिजे, असे ख्रिस्ती धर्माच्या ठेकेदारांचे म्हणणे. त्यामुळे बायबलमध्ये गर्भपाताला समर्थन नाही, असे दाखले ही मंडळी वारंवार देतात.ते सांगतात की, बायबल अनेक वचनांतून स्पष्ट निर्देश देते की, गर्भातील भ्रूणाच्या मृत्यूस कारण ठरणार्‍या व्यक्तीसाठी तोच दंड आहे, जो एका खून करणार्‍यासाठी आहे. त्यामुळे हे स्पष्टच आहे की, देव गर्भाशयातील शिशूला पूर्ण वयात आलेल्या प्रौढासारखे माणूस समजतो. तसेच गर्भपात करण्याचा निर्णय स्त्री घेऊ शकत नाही. कारण, एखाद्याच्या जन्म आणि मृत्यूची बाब ही देवाच्या हातात आहे. बायबलमध्ये गर्भपात करण्यावर बंदी आहे, यावर कट्टर ख्रिस्ती लोक आजही ठाम आहेत. त्यामुळेच अमेरिकेसारख्या देशात जिथे गर्भपात केले जातात, अशा रुग्णालयांवर बॉम्ब फेकणे, हल्ला करणे, गर्भपात करू इच्छिणार्‍यांना धमकावणे वगैरे वगैरे घटना आजही सुरू असतात.

काही वर्षांपूर्वी कॅनडामध्ये अशीच एक घटना घडली होती. नुकतेच अकराव्या वर्षात पदार्पण करणारी एक बालिका होती. तिचे आईवडील वारले होते. त्यामुळे ती आजीसोबतच राहत होती. आईवडिलांविना पोर म्हणून आजी डोळ्यात तेल घालून तिला जपे. कारण, इथे व्यक्तिस्वातंत्र्य, अतिभौतिकता यामुळे बालमातांचे प्रमाण जास्त. आजीला वाटे माझी लेक सुरक्षित आहे. मात्र, एक दिवशी आजीला जाणवले की, तिची नात गरोदर आहे. ११ वर्षांची नात. तिला कुणीच पुरूष मित्र नाही. ती कुठेही जात नाही. घरी कोणी येतही नाही. मग ती गरोदर कशी? तर कळाले की, ५० वर्षांचा तिचा काका घरी येत असे. त्यानेच हे दुष्कृत्य केले. आजीने पोलिसात तक्रार केली. तो गजाआड झाला. नातीचा गर्भपात करायचा, आजीने ठरवले. ती दवाखान्यात गेली. मात्र, डॉक्टरांचे म्हणणे गर्भ सुरक्षित आहे. नातदेखील सशक्त आहे. ती बाळाला जन्म देऊ शकते. अशा परिस्थितीमध्ये त्यांनी तिचा गर्भपात केला, तर आजूबाजूचे लोक त्यांच्यावर बहिष्कार टाकतील. कारण, गर्भातला जीव जगण्यास सक्षम आहे. त्याला जगवण्यासाठीच देवाने हिच्या गर्भात टाकले, तरीही आजीने गयावया केली. ती रडली-भेकली. तेव्हा कुठे डॉक्टर तिचा गर्भपात करण्यास तयार झाले. मात्र, ही खबर बाहेर कळलीच. त्याचवेळी शेकडो लोकांनी दवाखान्याला घेराव घातला.

आजीला चक्क शैतान ठरवले. डॉक्टरला शैतानाचा हस्तक ठरवले. ‘नातीला घरी पाठवा, बायबलविरोधी काम करू नका,’ असे म्हणत, हे सगळे धर्माचे ठेकेदार रुग्णालय जाळायला निघाले. ही सगळी घटना तिथल्या काही सुधारणावादी लोकांना कळाली. त्यांनी त्या बालिकेच्या हक्कासाठी आवाज उठवला. मग काही महिला त्या बालिकेला समर्थन देण्यास तयार झाल्या. समाजमाध्यमांतून अनेकांनी या बालिकेला समर्थन दिले. शेवटी कुठे ते कट्टरपंथी तिथून पसार झाले. त्या बालिकेचा गर्भपात करण्यात आला. काय म्हणावे? याबाबत इतर युरोपीय देशांमध्येही परिस्थिती काही वेगळी नाही. इस्लामिक देशांची तर याबाबत बातच न्यारी. आशियाई देशांमध्ये अगदी आपल्या भारततातही गर्भपात कोणत्या परिस्थितीत होऊ शकतो, याबाबत कायद्याचे नियम आहेत. त्यामुळे जगभरात फ्रान्स हा असा पहिला देश, जिथे गर्भपाताचा महिलांना मूलभूत अधिकार कायद्याने बहाल करण्यात आला.असो. एखादी स्त्री जेव्हा गर्भपात करते, त्यावेळी त्यामागे अनेक कारणे असतात. केवळ मूलबाळ नको. एकटा जीव सदाशिव राहून मौजमजा करू, असे काही सगळ्या महिलांचे मत नसते. कधीकधी महिलांवर ते गर्भारपण लादलेले असते. ती आजारी असते, ती सक्षम नसते. आर्थिक, कौटुंबिक आणि इतरही अनेक समस्या असतात. कधी-कधी तिच्यावर अत्याचार झालेला असतो. होणार्‍या बाळाला ती कोणताही सामाजिक दर्जा देऊ शकत नाही, तर कधी गर्भच विकलांग असू शकतो. या सगळ्या परिस्थितीमध्ये महिलेलाच काय, तिच्या कुटुंबीयांनाही गर्भपात करणे, हा एक उपाय वाटतो. यामध्ये मग ‘माझे शरीर, माझा हक्क’ हा भाग गौणच असतो.

फ्रान्सचे सोडा, आपल्या येथे वस्तीपातळीवर मी कितीतरी महिला पाहिल्या आहेत. एक काखेत, एक हाताला, एक पोटात वाढतेय आणि महिला पाय ओढत चालली आहे. जोपर्यंत मुलगा होत नाही, तोपर्यंत तिला मूल जन्माला घालण्याची सक्ती केलेली असते. आजही अनेक खालाजान लेकी-सुनांसोबत बाळंत वॉर्डमध्ये अ‍ॅडमिट असतात. त्यांच्या लेकी-सुना मुलांना एकीकडे जन्म देतात, त्याचवेळी या खालाजानसुद्धा मुलाला जन्म देत असते. मातृत्व लाभणे, हे परमभाग्यच. पण, या वस्तीपातळीवरील आयाबायांचे मातृत्व असे हीनदीन आणि स्वतःच्या नजरतेतच तिरस्कृत असलेलेही पाहिले आहे. या पार्श्वभूमीवर गर्भपात करणे, हा कायदेशीर हक्क आपल्या देशातच काय, जागतिक परिप्रेक्ष्यात किती उपयोगी ठरेल, हा एक प्रश्न आहेच. दुसरीकडे, गर्भपाताचा परिणाम त्या स्त्रीच्या शरीरावर, मनावरही होतच असतो. ’कायदा तिथे पळवाटा’ तसेच कायद्याचा गैरफायदा घेणारेही आहेतच. त्यामुळे महिलांचे सातत्याने शारीरिक शोषण करत, त्यांचा दर सहा-सात महिन्यांनी सक्तीने गर्भपात करवून घेणारे महाभागही कमी नाहीत. (अशा काही दुर्दैवी महिला मी पहिल्या आहेत) त्यामुळेच ‘गर्भपाताची गॅरेंटी’ जरी फ्रान्सने काय, जगभरातल्या कोणत्याही देशाने महिलांना दिली, तरीसुद्धा महिलांच्या समृद्ध, सशक्त आणि सुरक्षित जीवनाची गॅरेंटी त्याहूनही जास्त महत्त्वाची. ही ‘गॅरेंटी’ कायद्याने थोडीबहुत आली, तरीसुद्धा स्वामी विवेकानंदांनी म्हटल्याप्रमाणे, ”स्त्रीचा उद्धार दुसरे कुणी नाही, तर स्त्रीच स्वतःचा उद्धार स्वतः करू शकते.” त्यामुळे कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये, हक्काच्या लढाईमध्ये आणि न्यायाच्या निर्णायकतेमध्ये, स्त्रीही स्वतःच स्वतःची भाग्यविधाता आहे. बाकी कायदे तर केवळ पूरकतेसाठी असतात.

 
योगिता साळवी


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.