बालविवाह प्रकरणात 'अमीर अली' आणि 'फिरदौस आलम'ला जन्मठेप!
08-Mar-2024
Total Views |
दिसपूर : आसाममधील मोरीगाव जिल्हा न्यायालयाने बालविवाह प्रकरणी एका व्यक्तीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. त्याचवेळी आणखी एका आरोपीला २० वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश यांनी या प्रकरणातील आरोपी अमीर अली याला जन्मठेपेची तर आरोपी फिरदौस आलम याला २० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे.
न्यायालयाच्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना मोरीगाव जिल्ह्याचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक समीरन बैश्य म्हणाले, “येथे नमूद केले पाहिजे की खटल्याच्या प्रक्रियेच्या निरीक्षणादरम्यान, हे समोर आले की, मेराजुल इस्लाम नावाच्या व्यक्तीने आरोपीच्या बाजूने साक्ष देण्यासाठी पीडितेला आणि इतर साक्षीदारांना धमकावले होते. यासोबतच त्याला लाचेचीही ऑफर देण्यात आली होती. त्याला न्यायालयाच्या आवारातून अटक करण्यात आली असून न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.”
यापूर्वी, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने बालविवाहाविरोधात मोठ्या प्रमाणावर कारवाई सुरू केली होती. या प्रकरणी पोलिसांनी राज्यभरात ४००० हून अधिक जणांना अटक केली होती. अलीकडेच आसाम सरकारने आसाम मुस्लिम विवाह आणि घटस्फोट नोंदणी कायदा, १९३५ रद्द केला आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री सरमा यांनी आश्वासन दिले आहे की जोपर्यंत ते जिवंत आहेत, तोपर्यंत आसाममध्ये बालविवाह होऊ देणार नाही. ते म्हणाले होते की, “माझं म्हणणं लक्षपूर्वक ऐका, जोपर्यंत मी जिवंत आहे, तोपर्यंत मी आसाममध्ये बालविवाह होऊ देणार नाही. हिमंता बिस्वा सरमा जिवंत असेपर्यंत हे होऊ देणार नाही. मी तुम्हाला राजकीय आव्हान देऊ इच्छितो की मी हे दुकान २०२६ पूर्वी बंद करेन.