अभिनेत्री अश्विनी भावे बऱ्याच काळानंतर गुलाबी या मराठी चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पुनरागमन करत आहेत.
मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत ८०-९० च्या दशकातील काळ आपल्या अभिनय आणि सौंदर्याने गाजवणारी अभिनेत्री अश्विनी भावे (Ashwini Bhave) बऱ्याच वर्षांनंतर पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. उद्या ८ मार्च जागतिक महिला दिन. याच दिवसाचे औचित्य साधत ‘गुलाबी’ या चित्रपटाची (Ashwini Bhave) घोषणा करण्यात आली आहे.
‘गुलाबी’ या चित्रपटाच्या पोस्टरवरुन तीन मैत्रिणींची कथा चित्रपटात सांगितली जाणार असल्याचा अंदाज बांधला जात आहे. यात अश्विनी भावे, मृणाल कुलकर्णी आणि श्रुती मराठे प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने व्हॉयलेट फ्लेम मोशन पिक्चर्स निर्मित 'गुलाबी' या चित्रपटाचे अभ्यंग कुवळेकर यांनी दिग्दर्शन केले आहे. तर स्वप्नील भामरे, अभ्यंग कुवळेकर, शीतल शानभाग आणि सोनाली शिवणीकर निर्माते आहेत. आणि सुहास जोशी, शैलेश दातार, अभ्यंग कुवळेकर आणि निखिल आर्या यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
चित्रपटाबद्दल दिग्दर्शक अभ्यंग कुवळेकर म्हणतात, '' आज आमच्या चित्रपटाची घोषणा होतेय. चित्रपट स्त्रीप्रधान असला तरी यात मनोरंजनही आहे. हळूहळू चित्रपटातील अनेक गोष्टी समोर येतीलच. सध्या तरी एकच सांगेन अतिशय प्रतिभाशाली अभिनेत्री यात अभिनय करत आहेत.''