‘प्रसन्न’ घरांचा वास्तुकार...

    06-Mar-2024   
Total Views |
Prasanna Kulkarni

पेशाने सिव्हिल इंजिनिअर असणारे; पण इकोफ्रेंडली म्हणजेच पर्यावरणपूरक घरे बांधणार्‍या, सांगलीतील प्रसन्न कुलकर्णी यांचा हा प्रवास...

गेल्या अनेक वर्षांपासून सांगलीमध्ये इकोफ्रेंडली गृहनिर्मिती करणारे पर्यावरणप्रेमी, निसर्ग संवर्धक आणि एक सुजाण नागरिक अशा अनेकविध भूमिका बजावणारे प्रसन्न कुलकर्णी. त्यांचा जन्म दि. 26 जून 1971 साली सांगलीत झाला. अगदी बालपणापासून ते आतापर्यंतचे सर्व आयुष्य सांगलीतच व्यतीत केलेल्या या वास्तुकाराला सांगलीविषयी विशेष प्रेम आणि आपुलकी. कृष्णेच्या खोर्‍यात मनसोक्त पोहत बालपण खर्‍या अर्थाने जगलेले प्रसन्न त्यांच्या बालपणीचे अनेक आठवणी आणि रंगतदार किस्से सांगतात.सांगलीला मुळातच असलेल्या संस्थानांच्या वारशामुळे तेथील ऐतिहासिक, कलात्मक स्थानिक बाबी प्रसन्न यांच्या मनात घर करून राहिल्या. त्यांचे वडील चित्रकार होते; तसेच ते शाळेत विद्यार्थ्यांना चित्रकलेचे धडे देत असत. वडिलांमुळे मिळालेला कलेचा उपजत वारसा आणि प्रसन्न यांच्या आवडीनिवडी लक्षात घेता, त्यांनी कला क्षेत्रात करिअर करावे, असे ठरवले खरे; मात्र झाले वेगळेच.

प्रसन्न यांचे प्राथमिक शिक्षण सांगलीच्या डॉ. बापट बाल शिक्षण मंदिरामध्ये झाले. पुढे माध्यमिक शिक्षण सर्वोदय विद्यालयातून पूर्ण करत, त्यांनी पुढील शिक्षणासाठी विलिंग्डन महाविद्यालयात प्रवेश घेतला. शाळा-महाविद्यालयीन जीवनात अनेक कलाकुसरीच्या स्पर्धांमध्ये भाग घेत, त्यांना अभिनयाची देखील गोडी लागली. मग काय, अभिनय क्षेत्रातील कामाची संधी स्वीकारत त्यांनी आपली कला आणि छंद जोपासला. याच क्षेत्रात पुढे करिअर करावे, असे वाटत असले, तरी उत्तम चित्रकलेमुळे त्यांना आर्किटेक्चरदेखील करण्याची इच्छा होती. ही संधी समोर असताना, सांगलीपासून लांब जावे लागेल, म्हणून घरातून त्यांना विरोध झाला. पुढे सांगलीच्या पद्मभूषण वसंत दादा पाटील महाविद्यालयामध्ये त्यांना सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी प्रवेश मिळाला.इंजिनिअरिंग पूर्ण केलेल्या प्रसन्न यांनी पुढे करिअरदृष्ट्या चांगली कामगिरी केली. पदवीनंतर इतर मुलांना अनुभवींच्या मार्गदर्शनाखाली काम करावे लागे; पण प्रसन्न यांच्या प्रत्यक्ष कामाच्या अनुभवामुळे त्यांना हे न करता, थेट आपल्या स्वतःच्या कामाला सुरुवात करता आली.

अनेकदा शहरात जाऊन शिकण्याची, नोकरीची संधी मिळाली, तरीही इतर अनेक गोष्टींचा विचार करत, त्यांनी ती संधी नाकारली. महाविद्यालयात असताना स्पंदन वॉल मॅगझिन, नाटके, लेखन, चित्रकला अशा कलाप्रकारांत त्यांनी मुशाफिरी केली. त्यांनी स्वतः नेपथ्य आणि प्रकाशयोजनेची जबाबदारी पार पाडलेल्या नाटकाला राज्यनाट्य स्पर्धेत पारितोषिकदेखील मिळाले, अशी आठवण ते सांगतात. उपजतच कला अंगी असलेल्या प्रसन्न यांना वाचन-लेखनाचीही प्रचंड आवड. त्यांनी आजवर अनेक दैनिकांसाठी तसेच मासिकांसाठी लेखन केले. इकोफ्रेंडली घरे, निसर्गपूरक आयुष्य कसे जगावे, अशा अनेक विषयांवर ते लेखन करतात. महाविद्यालयात शिकत असताना, त्यांना छायाचित्रणाचाही छंद लागला. ‘फ्रेम्स’ कळणार्‍या आणि छायाचित्रणाचे गमक कळलेल्या प्रसन्न यांची काही अप्रतिम छायाचित्र त्यांच्या वडिलांनी पाहिल्यानंतर, त्यांनी एक कॅमेरा घेऊन दिला. पुण्यातील ’एफटीआयआय’मध्ये ऑडिशनच्या वेळी त्यांच्या छायाचित्रांचे कौतुक करण्यात आले.

एवढेच नाही तर प्रसन्न यांनी सांगलीतील ’सिव्हेज वॉटर ट्रीटमेंट’ म्हणजेच नाले सफाई आणि जलशुद्धीकरणासाठीही प्रकल्प तयार केला होता. स्थानिक तसेच तज्ज्ञांना बरोबर घेऊन केलेल्या, या प्रकल्पाला यश मिळाले. सिमेंटऐवजी माती, विटांऐवजी दगड असे पर्याय उपलब्ध करत, प्रसन्न यांनी आजवर अनेक इकोफ्रेंडली घरे बांधत, निसर्ग संवर्धनामध्ये देखील खारीचा वाटा उचलला आहे. ”एखादा सिव्हिल इंजिनिअर खूप पैसे कमवू शकतो; पण पैशांपेक्षा मला हे महत्त्वाचे वाटले,” असे ते सांगतात.”निसर्ग संवर्धनाच्या दृष्टीने तर सोडा; पण प्रदूषण कमी करण्यासाठी, करता येण्यासारख्या गोष्टीही अनेक जण करत नाहीत. हा दृष्टिकोन बदलणे गरजेचे आहे. तसेच आजच्या तरूण पिढीची विचार करण्याची पद्धत बदलणे, तिला विकसित करणे गरजेचे आहे,” असा मोलाचा संदेश प्रसन्न देतात. इकोफ्रेंडली प्रसन्न घरांचा वास्तुकार, छायाचित्रकार आणि लेखक प्रसन्न कुलकर्णी यांना त्यांच्या या कामासाठी दै. ’मुंबई तरुण भारत’च्या शुभेच्छा!
 


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

समृद्धी ढमाले

लेखिका रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेच्या पदवीधर आहेत. सध्या दै. 'मुंबई तरुण भारत'मध्ये पर्यावरण प्रतिनिधी म्हणून कार्यरत. यापूर्वी विविध 'ह्यूमन इंटरेस्ट स्टोरीज', मुलाखती आणि इतर वार्तांकनासाठी काम. आवाज आणि सूत्रसंचालन या क्षेत्रांमध्ये काम आणि विशेष आवड.