‘बेस्ट ऑफ आशा भोसले’ बायोग्राफी पुस्तकाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते प्रकाशन
मुंबई : ज्येष्ठ गायिका पद्मविभूषण आशा भोसले (Asha Bhosle) यांच्या ‘बेस्ट ऑफ आशा भोसले’ (Best Of Asha Bhosle) या फोटो बायोग्राफी पुस्तकाचे प्रकाशन ६ मार्च २०२४ रोजी करण्यात आले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (
Amit Shah) यांच्या शुभहस्ते या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी आशा भोसले यांची नातवंडे जनाई भोसले आणि आनंद भोसले, तसेच अमेय हाटे, प्रसाद महाडकर, नूतन आजगावकर आदी मान्यवर उपस्थित होते.
आशा भोसले यांनी मराठीसह हिंदी, गुजराती आणि अन्य भाषांमध्ये आजवर अनेक गाणी गायिली आहेत. १९५७ ते १९५८ हे वर्ष आशा भोसले यांचेच होते. सचिन देव बर्मन यांच्याकडे गाण्याची संधी मिळाल्यानंतर आशा भोसले यांनी त्या संधीचे सोने केले. ‘कालाबाजार’, ‘लाजवंती’, ‘नौ दो ग्यारह’, ‘चलती का नाम गाडी’, ‘सुजाता’, अशा असंख्य चित्रपटांतील गाण्यांना आवाज देत त्यांनी गाणी अजरामर केली.
संगीत क्षेत्रातील अद्वितीय कामगिरी आणि योगदानाबद्दल आजपर्यंत अनेक पुरस्कार आशा भोसले यांच्या नावे करण्यात आले आहेत. राष्ट्रीय पुरस्कार, फिल्मफेअर पुरस्कार, मध्य प्रदेश सरकारचा लता मंगेशकर पुरस्कार, महाराष्ट्र सरकारचे १५ पेक्षा जास्त पुरस्कार आणि नुकताच इ.स. २००८ मध्ये मिळालेला पद्मविभूषण पुरस्कार असे अनेक पुरस्कार आशा भोसलेंना बहाल करण्यात आले आहेत. तसेच, भारत-पाकिस्तान असोसिएशनचा ‘नाईटिंगेल ऑफ एशिया’ हा पुरस्कार त्यांना प्राप्त झाला आहे. तसेच ब्रिटनचे तत्कालीन पंतप्रधान टोनी ब्लेअर यांच्या हस्ते, बी.बी.सी.आकाशवाणीच्या वतीने जीवनगौरव पुरस्कारही त्यांना देण्यात आला असून महाराष्ट्र सरकारकडून देण्यात येणारा महाराष्ट्र भूषण पुरस्कार २०२१ मध्ये आशा भोसले यांना प्रदान करण्यात आला होता.