मुंबई : उद्धव ठाकरे आणि मोदीजी १ हजार टक्के एकत्र येणार आहेत, असं भाकीत शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी केलं आहे. तसेच आपला अंदाज कधीच चुकणार नसल्याचेही ते म्हणाले आहेत. टीव्ही ९ मराठी या वृत्तवाहिनीशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केले.
शहाजीबापू पाटील म्हणाले की, "उद्धव ठाकरे आणि मोदीजी १ हजार टक्के एकत्र येणार आहेत. आपला अंदाज चुकणार नाही. हिंदुत्वाचा विचार बाजूला ठेवून चालणार नाही. त्यामुळे उद्धव साहेबांना मोदीजींकडे जावं लागणार आणि हे दिवस लवकरात लवकर येणार आहेत, यात शंका नाही."
ते पुढे म्हणाले की, "५० टक्के निवडणुक ही पाच वर्षांच्या कामावर आणि कष्टावर चालेलेली असते आणि ५० टक्के शेवटच्या दोन दिवसांवर अवलंबून असते. त्यामुळे शेवटच्या दोन दिवसांत कशी कलाटणी मिळेल सांगता येत नाही. यावेळी सगळे सर्व्हे चुकत असतात. मध्यप्रदेश आणि राजस्थानमधील निवडणूक सर्व्हे चुकला. त्यामुळे सर्व्हेवर नेमका किती विश्वास ठेवावा हे ज्याचं त्याने ठरवावं. मतदान करायला जातानाही मतदाराचं मतपरिवर्तन होऊ शकतं. निवडणुका जवळ आल्या की, राजकारणात कार्यकर्त्यांचे सुगीचे दिवस येतात. सुगीच्या दिवसांत पाखरे या रानातून त्या रानात हिंडत असतात. तसेच कार्यकर्तेसुद्धा संधीचा शोध घेत या पक्षातून त्या पक्षात जात असतात. त्यात काहीच चुकीचे नाही," असेही ते म्हणाले.
"सकाळी उठून एखाद्या मोठ्या नेत्यावर बोललं की, महाराष्ट्रात लोकं आपलं कौतूक करतील अशी संजय राऊतांची मानसिकता आहे. परंतू, राऊतांनी मागे वळून बघितल्यास ते आज महाराष्ट्राचे खलनायक आहे. पण त्यांना हे दिसत नाही," असेही शहाजीबापू पाटील म्हणाले आहेत.