भारतात प्रथमच दिसली 'ही' समुद्री गोगलगाय; वसईत पेडणेकर कुटुंबीयांनी केली नोंद

    06-Mar-2024   
Total Views |

Costasiella pallida sea slug



मुंबई (अक्षय मांडवकर) -
भारतामधून प्रथमच 'कोस्टासिएला पॅलिडा' या समुद्री गोगलगायीच्या प्रजातीची नोंद करण्यात आली आहे ( Costasiella pallida sea slug ). वसई तालुक्यातील दलदलीच्या किनाऱ्यावर ही प्रजात आढळली आहे ( Costasiella pallida sea slug ). वसईत सागरी जीवांचे निरीक्षण करणाऱ्या पेडणेकर कुटुंबीयांनी या प्रजातीची नोंद केली आहे. 'सिटिझन सायन्स' या संकल्पेनेअंतर्गत पेडणेकर कुटुंबीय वसईतील सागरी जैवविविधतेची नोंद करत आहेत. ( Costasiella pallida sea slug )

नोव्हेंबर ते मार्च हा कालावधी समुद्री शैवाळ, स्पॉज, कोरल आणि हायडॉइड यांचा बहरण्याचा कालावधी असल्याने त्यावर समुद्री गोगलगाय उपजीविकेसाठी येतात. त्यामुळे हा काळ त्यांच्या निरीक्षणासाठी उत्तम असतो. समुद्र गोगलगायींच्या प्रजातींचा आकार सुमारे ४ मि.मी. ते काही इंचापर्यंत असू शकतो. मुदू शरीर, विविध आकर्षक रंग आणि शोभिवंत दिसण्यामुळे त्यांना ओळखता येते. खडकाळ किनाऱ्यांवर उथळ पाण्यात या प्रजाती आढळून येतात. यामधीलच 'कोस्टासिएला पॅलिडा' ही प्रजात भारतामधून प्रथमच नोंदविण्यात आली आहे. जगात ही प्रजात केवळ हाॅंग काॅंग याठिकाणी सापडते. २०१९ साली सर्वप्रथम पेडणेकर कुटुंबीयांना ही प्रजात वसईतील किनाऱ्यावर आढळून आली होती. त्यावेळी त्यांना या प्रजातीचे महत्त्व लक्षात आले नाही. वसई गावातील दत्ता व प्रतिभा पेडणेकर हे दाम्पत्य आणि त्यांच्या मुली पूजा व प्राची पेडणेकर या सागरी जैवविविधतेच्या नोंदी घेण्याचे काम करतात. वसईतील किनाऱ्यांवर फिरुन तेथील सूक्ष्म सागरी जीवांचे निरीक्षण आणि त्यांच्या नोंदी घेण्याचे काम हे कुटुंब करते.
 
 
गेल्या आठवड्यात हे कुटुंब रानगाव ते बर्मा पाडादरम्यान असलेल्या दलदलीच्या किनाऱ्यावर सूक्ष्म सागरी जीवांच्या शोधात भटकत होते. त्यावेळी त्यांना 'कोस्टासिएला पॅलिडा' ही समुद्री गोगलगाय दिसली. याठिकाणी सर्वसामान्यपणे दिसणाऱ्या समुद्री गोगलगायींपेक्षा ही गोगलगाय वेगळी दिसल्याने आम्ही या प्रजातीचे छायाचित्र काढून समुद्री गोगलगायींचे तज्ज्ञ विशाल भावे यांना पाठवल्याचे दत्ता पेडणेकर यांनी दै.' मुंबई तरुण भारत'शी बोलताना सांगितले. भावे यांनी ही प्रजात 'कोस्टासिएला पॅलिडा' असल्याचे सांगून प्रथमच ती भारतात दिसल्याचे आम्हाला सांगितल्याचे पेडणेकर म्हणाले.


गोगलगायीची वैशिष्ट्ये
'कोस्टासिएला पॅलिडा' ही समुद्री गोगलगाय लांबीला सात ते दहा मिमी एवढीच वाढते. क्वचितच १० मिमी पेक्षा जास्त वाढते. हलक्या तपकिरी रंगद्रव्यांसह तिचे शरीर पारदर्शक असते. शरीरावर असंख्य लाल ठिपके पसरलेले असतात. शरीरावरील टोकदार अवयवांना 'सिराटा' म्हणतात. हे 'सिराटा' पारदर्शक असतात, परंतु त्यांच्यामध्ये पचन ग्रंथीच्या बारीक हिरव्या नलिका दिसतात.

जगातील दुसरी नोंद
पेडणेकर कुटुंबियांनी नोंद केलेली समुद्री गोगलगायीची प्रजात ही कोस्टासिएला पॅलिडा आहे. भारतामधील या प्रजातीची पहिली आणि जगातील दुसरीच नोंद आहे. 'सिटीझन' सायन्स या संकल्पेनेअंतर्गत सामान्य नागरिक कशा पद्धतीने शास्त्रीय नोंदी करण्यास हातभार लावू शकतात, याचे हे उत्तम उदाहरण आहे. - विशाल भावे, उपसंचालक, सागरी विभाग, सृष्टी काॅन्झर्वेशन फाऊंडेशन


 

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

अक्षय मांडवकर

'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'विशेष प्रतिनिधी' (पर्यावरण/ वन्यजीव) म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. पर्यावरण आणि वन्यजीव क्षेत्राची आवड असल्याने त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. महाराष्ट्रातील महत्वाच्या वन्यजीव संवर्धन आणि संशोधन कार्यात सहभाग. भारतीय शास्त्रीय नृत्यशैलीतील 'कथ्थक' नृत्यात विशेष प्राविण्य. देशातील महत्वाच्या शास्त्रीय नृत्य महोत्सव आणि नृत्यविषयक टेलिव्हिजन मालिकांमध्ये सादरीकरण.