झोपडपट्टी पुनर्विकासासाठी MMRDA आणि SRA संयुक्त भागीदारी करार
१५ हजार झोपड्यांचा पुनर्विकास
05-Mar-2024
Total Views |
मुंबई : मुंबई महानगरातील रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पाला चालना देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार माता रमाबाई आंबेडकर नगर आणि कामराज नगर येथील सुमारे १५ हजार घरांचा पुनर्विकास करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण यांच्यात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत संयुक्त करार करण्यात आला. मंत्रालयात झालेल्या एमएमआरडीएच्या बैठकीत हा करार झाला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई महानगर विकास प्राधिकरणाची बैठक मंत्रालयात झाली. यावेळी मंत्री शंभूराज देसाई, मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी, इंडिपेंडंट स्टडी ग्रुपचे अध्यक्ष जॉनी जोसेफ, गृहनिर्माण विभागाच्या अपर मुख्य सचिव वल्सा नायर सिंह, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता आदी, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल आदी उपस्थित होते.
झोपडपट्ट्यांचा पुर्नविकास
मुंबईतील रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांच्या कामांना चालना मिळावी यासाठी बृहन्मुंबई, ठाणे महानगरपालिका, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, सिडको व म्हाडा यांच्यामार्फत संयुक्त भागीदारी तत्वावर पुनर्विकास करण्यात येणार आहे. आज एसआरए आणि एमएमआरडीए यांच्यात याअन्वये माता रमाबाई आंबेडकर नगर, कामराज नगर येथील सुनारे १५ हजार घरांचा पुनर्विकास एमएमआरडीएच्या माध्मयातून करण्यात आहे. याप्रकल्पात पुर्व मुक्त मार्ग आणि पश्चिम द्रुतगतीमार्ग या दरम्यान असलेल्या सुमारे २००० झोपड्यांचा देखील पुनर्विकास होणार असून त्यामुळे हा रस्ता मोकळा होण्यास मदत होणार आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत हा संयुक्त करार करणार आला.
झोपडपट्टी मुक्त ठाणे
ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील ठाणे परिवहन सेवा यांच्या मालकीच्या बस डेपोसाठीच्या जागांवर अत्याधुनिक बस डेपोचा विकास व सभोवतालच्या शासकीय जमिनीवरील झोपडपट्टयांचे पुनर्वसन करुन उपलब्ध होणाऱ्या मोकळया शासकीय जमिनीचा विकास प्राधिकरणामार्फत करण्यास आजच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. यामुळे झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन होणार असून ठाणे शहर झोपडपट्टी मुक्त करण्याच्या प्रयत्नांना चालना मिळणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.