“वीर सावरकरांचा बायोपिकसाठी विचार आजवर का केला नाही?”, रणदीपचा उलट प्रश्न...

    04-Mar-2024
Total Views |
स्वातंत्र्यवीर सावरकर हा चरित्रपट २२ मार्च रोजी हिंदी आणि मराठी भाषेत प्रदर्शित होणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लॉंच सोहळा अभिनेता, दिग्दर्शक रणदीप हुड्डा याच्या उपस्थितीत संपन्न झाला
 
veer savarkar 
 
मुंबई : भारताला इंग्रजांच्या गुलामीतून मुक्त करण्यासाठी अनेक स्वातंत्र्यसेनानींनी प्राणांची आहुती दिली. त्यापैकी एक अग्रेसर नाव म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर. वीर सावरकरांच्या (Swatantryaveer Ssavarkar) जीवनावर आधारित आणि आजवर जे सावरकर आपण वाचले आहेत, त्या पलिकडे स्वातंत्र्यवीर सावरकर काय होते? हे मोठ्या पडद्यावर 'स्वातंत्र्यवीर सावरकर' (Swatantryaveer Ssavarkar)  या चरित्रपटातून पाहता येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. यावेळी संपुर्ण चित्रपटाची टीम उपस्थित होती. यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना रणदीप हुड्डा (Randeep Hooda) म्हणाला की, “आजवर महात्मा गांधी, सरदार पटेल यांच्यावर चरित्रपट तयार करण्यात आले आहेत, मग वीर सावरकरांवर का बनू शकत नाही?”, असा उलट प्रश्नच त्याने उपस्थितांना केला.
 
 
बायोपिकसाठी स्वातंत्र्यवीक सावरकर यांचीच निवड का? असा प्रश्न विचारला असता रणदीप म्हणाला की, “आतापर्यंत मी सरबजीत, राजा रवी वर्मा हे बायोपिक केले होते. त्यामुळे माझ्या मनात प्रश्न आला की, वीर सावरकर का नाही? कारण चित्रपट हे अधिकाधिक लोकांपर्यंत आणि जगभरात फार कमी काळात पोहोचण्यासारखे फार प्रभावी माध्यम आहे. त्यामुळे सावरकरांचा इतिहास आणि त्यांच्याबद्दल असणारे बरेचसे गैरसमज दुर व्हावे आणि आजच्या पिढीला सावरकर, त्यांचे विचार, त्यांचे अखंड भारतचे स्वप्न काय होते हे समजावे यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचीच निवड बायोपिकसाठी केली”.
 
दरम्यान, स्वातंत्र्यवीर सावरकर या चरित्रपटात स्वत: रणदीप हुड्डा यानेच सावरकरांची व्यक्तीरेखा साकारली आहे. यासाठी रणदीपने ३३ किलो वजन देखील कमी केले होते. ज्यावेळी सावरकरांना दोनदा जन्मठेप झाली होती, त्याकाळाचे चित्रिकरण करत असताना मला आलेल्या यातना या सावरकरांच्या त्यागापुढे काहीच नव्हत्या अशी कबूली देखील रणदीपने दिली. चित्रपटाबद्दल अधिक बोलायचे झाल्यास, या चित्रपटाचे दिग्दर्शन, लेखन, निर्मिती आणि अभिनय अशा चारही महत्वपुर्ण भूमिका रणदीप हुड्डा याने निभावल्या आहेत. २२ मार्च रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर हा चित्रपट हिंदीसह मराठी भाषेत देखील प्रदर्शित होणार आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.