"सुनावणी वेळी आम्हाला सुरक्षा द्या"; गँगस्टर 'अतिक अहमद'च्या पोरांना हत्येची भीती
04-Mar-2024
Total Views |
लखनौ : उमेश पाल हत्येप्रकरणी अतिक अहमदची तुरुंगात टाकलेली मुले उमर आणि अली यांच्यावरही कारवाईची तयारी सुरू झाली आहे. आतापर्यंतच्या तपासात पोलिसांना उमर आणि अली यांच्या विरोधात पुरेसे पुरावे सापडले असून यावरून या दोघांचाही या हत्येच्या कटात सहभाग असल्याचे दिसून येते.
उदाहरणार्थ, मुख्य शूटर असद हत्याकांडाच्या आधी त्याचा मोठा भाऊ उमर अनेकवेळा लखनौ तुरुंगात गेला होता आणि अलीला नैनी तुरुंगात भेटला होता. नैनी तुरुंगात या घटनेचे इतर शूटर गुड्डू मुस्लिम, गुलाम आणि अरमान यांनीही जाऊन अलीची भेट घेतली. तुरुंगात पाठवण्यात आलेल्या शौलत हनिफनेही पोलिसांसमोर दिलेल्या साक्षीमध्ये अली आणि उमर यांना या संपूर्ण कटाची माहिती असल्याचे म्हटले आहे.
अली आणि उमर असदला तुरुंगात भेटल्यावर त्याला प्लॅनिंग समजावून सांगायचे. या पुराव्याच्या आधारे पोलिसांनी दोघांवर बी वॉरंट जारी केले आहे. लवकरच त्यांना न्यायालयात बोलावून रिमांड अर्ज दाखल केला जाणार असल्याचे पोलीस सूत्रांचे म्हणणे आहे. या दरम्यान, अतिकच्या दोन्ही मुलांनी न्यायालयात सुनावणीला नेतेवेळी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्याची विनंती न्यायालयात केली आहे.
अतिक अहमदचा हत्या सुद्धा पोलिस सुरक्षेत हॉस्पिटलमध्ये जात असताना झाली होती. अतिक सारखाच हल्ला आपल्यावर होऊ शकतो, अशी भिती अतिकच्या दोन्ही मुलांना आहे. लखनऊचे प्रॉपर्टी डीलर मोहित जैस्वालच्या अपहरण प्रकरणात उमर लखनऊ तुरुंगात बंद आहे. तर अली हत्येचा प्रयत्न, खंडणी व इतर गुन्ह्यांमध्ये नैनी तुरुंगात आहे. उमेश पाल हत्येप्रकरणी आतापर्यंत १० आरोपींना तुरुंगात पाठवण्यात आले आहे, तर सहा शूटर्ससह सात जणांचा मृत्यू झाला आहे.