छ. संभाजीनगरच्या मजुराची लेक आज मुंबईच्या शिक्षण क्षेत्रात कर्तृत्व गाजवत आहे. सासर-माहेर आणि समाजाचे नाव उज्ज्वल करणार्या, डॉ. प्रा. सुनीता मगरे यांच्या जीवनकार्याचा मागोवा घेणारा हा लेख...
अहो मॅडम, तुम्ही मुंबईत येऊन दोनच वर्षं झाली. तुम्ही कुठे मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक लढवता? येथेदेखील जातीचं राजकारण चालतं. आपल्या मागासवर्गीय लोकांना इतर समाजाचे लोक मत देत नाहीत.” मागासवर्गीय समाजाचा तो सहकारी डॉ. प्रा. सुनीता मगरेंना सांगत होता. सुनीता म्हणाल्या की, “प्रयत्न करूया. तथागतांनी सांगितलेला मध्यम मार्ग आणि मंगलमैत्री हेच माझ्या कार्याचे सूत्र आहे. निवडणूक जिंकणार नसले, तर अनुभव तरी मिळेल.” 2010 साल होते. सुनीता या मुंबई विद्यापीठाच्या निवडणुकीला अपक्ष म्हणून उभ्या राहिल्या. विशेष म्हणजे, त्या निवडणुकीमध्ये त्यांना केवळ मागासवर्गीय समाजातील व्यक्तींची सोबतच नव्हे, तर सर्व समाजातील व्यक्तींचीही मत मिळाली आणि त्या जिंकल्या!आज डॉ. सुनीता मगरे या मुंबई विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र विभागाच्या विभागप्रमुख आहेत. शिक्षणशास्त्र अभ्यास मंडळाच्या त्या अध्यक्षही होत्या. मुंबईतील एकूण 78 शिक्षणशास्त्र महाविद्यालयांशी त्यांचा संपर्क-संबंध आहे. त्यांचे ’डॉ. सुनीता मगरे लेक्चरर्स सीरिज’ असे युट्यूब चॅनेलही असून, या माध्यमातून त्या शिक्षण क्षेत्रात मार्गदर्शन करतात. शैक्षणिक क्षेत्रातील देदीप्यमान कामगिरीबाबत त्यांना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सन्मान प्राप्त झाले आहेत.
डॉ. प्रा. सुनीता यांच्या या यशस्वी जीवनाचा मागोवा घेताना जाणवते की, यशाचा मार्ग साधा, सरळ कधीच नसतो. ध्येय आणि त्या ध्येयासाठी प्रचंड मेहनत इच्छाशक्ती आणि त्याग महत्त्वाचा. सुनीता यांचे पिता विठ्ठलराव मगरे आणि आई रुक्मिणीबाई हे मूळच्या छत्रपती संभाजी नगरचे. विठ्ठलराव अल्पशिक्षित आणि मातीकाम मजूर, तर रुक्मिणीबाई गृहिणी. दोघांना सात अपत्ये. त्यापैकी एक सुनीता. घरी आर्थिक चणचणच. त्यामुळे कित्येक रात्री उपाशीपोटी पाणी पिऊन झोपी जावे लागायचे. सुनीता जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकल्या. वह्या, पुस्तक, दप्तर वगैरे हे लाड नव्हतेच. नववीपर्यंत त्यांना चप्पल काय असते, हेच माहिती नव्हते. मात्र, शाळेत वाचनालय होते. तिथेच सुनीता यांचे पुस्तकांशी मैत्र झाले. तथागत गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर ते इतर अनेक थोर पुरुषांचे जीवनकर्तृत्व वाचायला मिळाले. वाचनातून त्यांना कळाले होते की, ज्यांना आयुष्यात सकारात्मक यश मिळवायचे असते, त्यांनी आलेल्या परिस्थितीवर मात करायलाच हवी. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला मार्ग दाखवला. आपणदेखील शिकलेच पाहिजे, हा ध्यास सुनीता यांना लागला. हुशार असल्यामुळे मिळालेल्या शिष्यवृत्तीवर त्यांचे शिक्षण सुरू होेते. त्यांना डॉक्टर व्हायचे होते. मात्र, ’एमबीबीएस’ला त्यांचा नंबर लागला नाही. त्यांनी अभियांत्रिकी शाखेत प्रवेश घ्यायचे ठरवले. नातेवाईक विठ्ठलरावांना म्हणाले की, ”मुली का कधी इंजिनिअर होतात? काही तरी आपले!”
सुनीता यांनी मग विज्ञान शाखेतील पदवी शिक्षण पूर्ण केले. 1992-93 साल होते. मुलीने पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केले की, आता लग्न करायचेच, हा दंडकच. त्यामुळे सुनीता यांचा विवाह विजयकुमार बदनापूरकर यांच्याशी झाला. विजयकुमार यांचा सुनीता यांच्या यशस्वी कारकिर्दीमध्ये मोठी भूमिका, सहकार्य आहे. त्यामुळे विवाहानंतर काही महिन्यांतच सुनीता यांनी पदव्युत्तर शिक्षण घेण्यास सुरुवात केली. त्यावेळी बदनापूरकर यांचे रेशनचे दुकान होते. येथेही घरची तशी गरिबीच. सुनीता महाविद्यालयात जात, तिथून दुपारी रेशनच्या दुकान सांभाळत, घराचे आवरून अभ्यास करत. दि. 10 मे 1994 रोजी त्यांनी ’एमएससी’चा शेवटचा पेपर दिला आणि दोनच दिवसांनी त्यांनी एका बाळाला जन्म दिला. पोटात बाळ आहे, प्रसूतीची वेळ जवळ आली आहे, आता कशी परीक्षा देणार बहाणे विचार न करता, सुनीता या घर, रेशन दुकान सांभाळून, अभ्यास करत राहिल्या. निकाल लागला आणि मराठावाडा विद्यापीठात ’कीटकशास्त्र’ विषयात त्या पहिल्या आल्या. पुढे अर्थार्जन करण्यासाठी, त्यांनी महाविद्यालयात नोकरी करायला सुरुवात केली. त्यावर्षी मराठवाडा विद्यापीठामध्ये शिक्षणशास्त्र ’सेट’ परीक्षेमध्ये सुनीता या एकमेव विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या. काही वर्षं छ. संंभाजीनगर येथील महाविद्यालयात नोकरी केली.
पुढे 2008 साली मुंबई विद्यापीठात ‘रिडर’ पदाच्या मुलाखतीसाठी बोलावणे आले. मुंबईला येण्यासाठी बस-रेल्वे कुठेही आरक्षित तिकीट मिळाले नाही. त्यामुळे रात्रभर रेल्वेच्या अनारक्षित डब्यात उभे राहून, प्रवास करत त्या मुंबईत आल्या. मुलाखतीला आलेले सगळेच टापटीप, चकचकीत पोषाखातले. सुनीता या तेव्हा विद्यापीठाच्या बाहेरील एका टपरीवर तोंड धुऊन, मुलाखतीला आलेल्या. या सगळ्यामध्ये आपला निभाव कसा लागेल? असे त्यांना वाटले. मात्र, लगेचच त्यांना ’कोणत्याही परिस्थितीत शांत राहा आणि निर्णय घ्या’ हा तथागत बुद्धांचा संदेश आठवला. तसेच त्यांच्या मनात विचार आला की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संघर्षापुढे ही परिस्थिती काहीच नाही. हा विचार करून, त्यांनी मुलाखत दिली. त्यांची निवड झाली, तर अशा या डॉ. प्रा. सुनीता म्हणतात की, ”समाजातील उच्चशिक्षणाचा टक्का वाढवा, मानवी शाश्वत मूल्ये, नीतिमत्ता यांचा वारसा सांगत, युवा पिढी उच्चशिक्षित व्हावी यासाठी काम करायचे आहे. मी ते करू शकेन; कारण डॉ. बाबासाहेबांनी ती ताकद भारतीय म्हणून मला दिली आहे.” या अनुषंगाने वाटते की, डॉ. प्रा. सुनीता त्यांचे समाजहिताचे ध्येय नक्कीच पूर्ण करतील.