मागील वर्षीच्या सत्तांतरानंतरही आफ्रिकी देश नायजरची स्थिती पूर्वपदावर आलेली नाही. यातच आता नायजरने अमेरिकेसोबतचा सैन्य करार तत्काळ प्रभावाने रद्द केला आहे. अमेरिकेच्या वरिष्ठ अधिकार्यांनी केलेल्या नायजरच्या दौर्यानंतर हा निर्णय घेतला गेला. अमेरिकेकडून आमच्यावर अनेक विषयांवर दबाव टाकला जात होता म्हणून आम्ही हे पाऊल उचलल्याचे नाजयरच्या सैन्य प्रमुखांनी सांगितले आहे. अशा परिस्थितीत नायजरने अमेरिकेन सैन्य करार रद्द का केला, हा करार नेमका काय आहे आणि अमेरिकेसाठी नायजर इतका महत्त्वाचा का आहे, हे जाणून घेणे क्रमप्राप्त ठरते.
पश्चिमी आफ्रिकी देश असलेला नायजर हा सहारा वाळवंटाच्या किनार्याजवळ असून, लोकसंख्या जवळपास दोन कोटी आहे. माली, अल्जेरिया, लिबिया, चाड, बुर्किना फासो, बेनिन व नायजेरिया हे नायजरचे शेजारी देश आहे. आफ्रिकेतील तिसरी सर्वात लांब नदी असलेल्या, नायजरवरून या देशाला नायजर नाव पडले. या देशाचा दोन तृतीयांश प्रदेश वाळवंटीय आहे. नायजर जगातील सर्वात मोठ्या युरेनियम भांडारापैकी एक आहे. असे असूनही नायजरची गणना जगभरातील सर्वात गरीब देशांमध्ये होते. परिणामी, देश कर्जाच्या बोझ्याखाली दबला आहे. ’युएनएचसीआर’ म्हणजेच संयुक्त राष्ट्र शरणार्थी एजन्सीच्या मते, २०२१ मध्ये येथे जवळपास एक कोटींहून अधिक लोक प्रचंड गरिबीत जगत होते. हा आकडा नायजरच्या एकूण लोकसंख्येपैकी ४१.८ टक्के आहे. नायजरची अर्थव्यवस्था कच्च्या मालाची निर्यात, कृषी, पशुधन यांवर अवलंबून आहे. यातही कृषी क्षेत्राचे योगदान ४० टक्के आहे.
नायजेरिया, बुर्किना फासो आणि मालीमध्ये सुरू असलेल्या संघर्षाला कंटाळून अनेक लोकं नाजयरमध्ये आसरा घेत आहे. याच शरणार्थींमुळे आता नायजरमध्येही संघर्षाला सुरुवात झाली आहे. ’युएनएचसीआर’ने येथे ऑगस्ट २०२२ पर्यंत २ लाख, ९४ हजार, ४६७ शरणार्थी आणि जवळपास ३ लाख, ५० हजार विस्थापितांची ओळख केली होती. सामाजिक, राजनैतिक आणि आर्थिक संघर्षाने ग्रस्त नायजरच्या मदतीला अनेक देश धावून आले; मात्र त्यामागे प्रत्येकाचा फायदा लपलेला होता. याचाच फायदा घेत, अमेरिकेनेही नाजयरमध्ये आपले पाय रोवले आणि २०१२ साली दोन्ही देशांमध्ये सैन्य करार करण्यात आला. याअंतर्गत जवळपास एक हजार अमेरिकन सैनिक आणि नागरिक संरक्षण कर्मचार्यांना नायजरमधून काम करण्याची अनुमती देण्यात आली. साहेल क्षेत्रात अमेरिका सैन्याच्या संचालनात मुख्य भूमिका निभावतो.
अमेरिकन सैन्य नायजरची राजधानी नियामेमध्ये एअरबेस १०१चे संचालन करते. या व्यतिरिक्त नियामेपासून १२० किलोमीटर दूर असलेल्या अगाडेझ येथील एअरबेस १०२चे संचालनही केले जाते. याचा उपयोग साहेल क्षेत्रात मानवी युद्ध आणि मानवरहित उड्डाणांवर नजर ठेवण्यासाठी केला जातो. २०१८ पासून याचा वापर साहेल क्षेत्रात दहशतवादी संघटनांविरोधात ड्रोन ऑपरेशन राबविण्यासाठी केला जात आहे. नायजर पश्चिम आणि उत्तर आफ्रिकेत साहेल क्षेत्रात हवाईतळ असल्याने, विद्रोही सशस्त्र संघटनांवर कारवाई करणे सोपे जाते. मात्र, जागतिक राजकारण पाहता रशिया आणि चीनला डिवचण्यासाठी या तळाचा वापर केला जातो. नायजरमधील अंतर्गत संघर्षाला रशिया आणि इराण कारणीभूत असल्याचेही बोलले जात आहे; कारण सत्तांतरानंतर फ्रान्स, अमेरिकेने नाजयरमध्ये आपल्या सेवा थांबवल्या.
इराण आणि रशियाने याचे स्वागत केले. जुलै २०२३ पासून नायजरमध्ये सैन्य सरकार आहे. डिसेंबर २०२३ मध्ये रशियन प्रतिनिधीमंडळाने नायजरचा दौरा केला होता. त्यानंतर नाजयरचे पंतप्रधान अली महामान लामीन जिन यांनी सैन्य आणि आर्थिक विषयांवर चर्चा करण्यासाठी मॉस्कोचा आणि जानेवारी २०२४ मध्ये इराणचा दौरा केला. नायजर इराण आणि रशियाशी आपली जवळीक वाढवतोय.
दरम्यान, सैन्य करार रद्द झाल्याने, सर्व ड्रोन यंत्रणेवर अमेरिकेला पाणी सोडावे लागेल. आण्विक शस्त्र निर्मितीसाठी आवश्यक युरेनियम नायजरमध्ये मोठ्या प्रमाणावर आहे, त्यालाही मुकावे लागेल. एकूणच या कराराचा नायजरला फायदा कमी आणि तोटाच जास्त होता. कारण, अमेरिका आपल्या ऑपेरशन्ससाठी नायजर आणि तेथील तळांचा वापर करत होता. आता एवढ्याशा नायजरने अमेरिकेला परत जा, असे सांगणे हे अमेरिकेच्या फसलेल्या परराष्ट्र नीतीचेच उदाहरण म्हणावे लागेल.
७०५८५८९७६७