कोणताही व्यवसाय नव्याने सुरू करण्यासाठी किंवा सुरु असलेला व्यवसाय वाढीसाठी किंवा एखादे सामाजिक कार्य करण्यासाठी भांडवलाची म्हणजे पैशाची गरज असते. भांडवल उभे करण्याचे मार्ग - लागणारे भांडवल कंपनीचे प्रवर्तक स्वत: उभे करू शकतात. मात्र, जितके हवे तितके भांडवल प्रवर्तक किंवा सामाजिक कार्यकर्ते उभारू शकत नाहीत. अशावेळी गरज भागविण्यासाठी बँकेकडून कर्ज घेणे, शेअर बाजारातून भांडवल उभे करणे किंवा सामाजिक कार्यासाठी देणग्या गोळा करणे, असे काही पर्याय उपलब्ध असतात. या पारंपरिक पर्यायांहून एक नवीन ‘क्राऊड फंडिंग’चा वेगळा पर्याय नवीन तंत्रज्ञानामुळे उपलब्ध झाला आहे. त्याविषयी आजच्या भागातून सविस्तर माहिती जाणून घेऊया.
भांडवल उभारणीच्या पारंपरिक पर्यायापेक्षा तंत्रज्ञानावर आधारित नवीन पर्याय असलेल्या ‘क्राऊड फंडिंग’चे कामकाज पारदर्शी पद्धतीने चालते. नव्याने व्यवसाय सुरू करणार्यास आवश्यक ते भांडवल कमीत कमी वेळेत मिळविणे यातून शक्य होते, तर सामान्य गुंतवणूकदारांत त्याच्या जोखीम घेण्याच्या क्षमतेनुसार गुंतवणूक करण्याचा पर्याय उपलब्ध होतो. अशा गुंतवणुकीतून पारंपरिक गुंतवणुकीपेक्षा जास्त परतावा मिळण्याची शक्यता असते. जेव्हा एखादी व्यक्ती/संस्था/कंपनी किंवा राजकीय पक्ष आपल्या व्यवसायासाठी, सामाजिक कार्यासाठी किंवा राजकीय कामासाठी सर्वसामान्य लोकांकडून आपल्याला आवश्यक असलेले भांडवल जमा करतात, त्याला ‘क्राऊड फंडिंग’ असे म्हणतात. यासाठी ‘क्राऊड फंडिंग’ अॅप किंवा ‘नेटवर्किंग प्लॅटफॉर्म’चा वापर केला जातो.
या प्रक्रियेत संबंधित व्यक्ती/संस्था/ कंपनी किंवा राजकीय संघटना जेव्हा सर्वसामान्य लोकांकडून पैसे जमा करण्याचे ठरवितात, तेव्हा आपल्याला किती रक्कम हवी आहे, कशासाठी हवी आहे व कशाप्रकारे हवी आहे, याबाबत विविध माध्यमांतून माहिती देताना व ज्यांना हा प्रस्ताव योग्य वाटतो, असे लोक ‘क्राऊड फंडिंग’ अॅप किंवा ‘नेटवर्किंग प्लॅटफॉर्म’च्या माध्यमातून आपल्याला शक्य असणारी व योग्य वाटणारी रक्कम प्रकल्पात गुंतवितात. यांचे प्रकार- (अ) देणगी स्वरुपात रक्कम गोळा करणारे ‘क्राऊड फंडिंग’ अॅप किंवा ‘नेटवर्किंग प्लॅटफॉर्म’ - यात सामाजिक कार्याकरिता किंवा आपत्कालीन मदतीकरिता किंवा राजकीय पक्ष देणगी स्वरुपात रक्कम गोळा करतात. यात देणगीदाराला कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा नसते. (ब) ‘रिवॉर्ड बेस्ट क्राऊंड फंडिंग’ अॅप किंवा ‘नेटवर्किंग प्लॅटफॉर्म’-या अॅप किंवा प्लॅटफॉर्मच्या मार्गे नावीन्यपूर्ण प्रकल्प, कल्पक प्रकल्प यासाठी पैसे गोळा केले जातात. गुंतवणूकदाराला प्रकल्पपूर्तीनंतर बरीच सवलत तसेच इन्सेन्टिव्ह दिला जातो. (क) ‘डेटा बेस्ट क्राऊड फंडिंग” अॅप किंवा ‘नेटवर्किंग प्लॅटफॉर्म’ यात कर्ज स्वरुपात व्यवसायासाठी पैसे गोळा केले जातात. यासाठी किती रक्कम जमवायची आहे? किमान किती रक्कम स्वीकारली जाईल?
तसेच, रक्कम किती कालावधीसाठी हवी आहे? व घेतलेल्या रकमेवर किती दराने व्याज मिळणार आहे? याची माहिती अॅप किंवा ‘नेटवर्किंग प्लॅटफॉर्म’वर द्यावी लागते. काही गुंतवणूकदारांना शेअरमध्ये गुंतवणुकीपेक्षा हा पर्याय सोयीचा वाटतो. (ड) इक्विटी आधारित ‘क्राऊड फंडिंग’ अॅप किंवा ‘नेटवर्किंग प्लॅटफॉर्म’ - याद्वारे व्यावसायिक शेअरच्या स्वरूपात भांडवल गोळा करतात. ‘स्टार्टअप’ उद्योजकांसाठी हा पर्याय सोयीचा असतो. कंपनीच्या प्रगतीनुसार, गुंतवणूकदारास फायदा मिळतो. ‘क्राऊड फंडिंग’मध्ये अॅप किंवा ‘नेटवर्किंग प्लॅटफॉर्म’, व्यावसायिक व गुंतवणूकदार यांना एकत्र जोडतात. अॅप व नेटवर्किंग प्लॅटफॉर्म केवळ मध्यस्थ म्हणून काम करतात. यासाठी दोन ते पाच टक्के इतके शुल्क आकारले जाते.
‘क्राऊड फंडिंग’ची प्रक्रिया कशी चालते?
ज्याला भांडवल गोळा करावयाचे आहे, असा व्यावसायिक अॅप किंवा नेटवर्किंग प्लॅटफॉर्मवर आपल्या प्रकल्पाची माहिती, आवश्यक असलेल्या भांडवलाची गरज, प्रकल्पाचे भविष्यचित्र, शैक्षणिक पात्रता, अनुभव, पार्श्वभूमी, प्रकल्पपूर्तीचा कालावधी, गुंतवणूकदारास मिळू शकणारा परतावा या माहितीचा व्हिडिओ तयार करतात. परिणामी, गुंतवणूकदारांस प्राथमिक माहिती मिळून गुंतवणुकीबाबत निर्णय घेणे शक्य होऊ शकते. त्यानंतर विविध माध्यमांतून प्रकल्पाचे मार्केटिंग केले जाते. या कॅम्पेनचा कालावधी साधारणपणे एक ते दोन महिने इतका असतो. या कालावधीत अपेक्षित रक्कम जमा झाल्यास प्रवर्तकाच्या खात्यावर ही रक्कम हस्तांतरित केली जाते. जर अपेक्षित रक्कम जमा झाली नाही, तर प्रकल्प अयशस्वी ठरला, असे समजून जी रक्कम गुंतवणूकदारांना परत केली जाते. प्रकल्प सुरू झाल्यावर तो वेळेत पूर्ण करणे व गुंतवणूकादारांची अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी प्रवर्तकांची असते.
प्रमुख ‘क्राऊड फंडिंग प्लॅटफॉर्म’
(1) फंडेबल - या प्लॅटफॉर्मचा मूळ उद्देश छोट्या उद्योगांना (एमएसएमई) भांडवल उभे करून देण्यास साहाय्य करणे तसेच व्यावसायिक मार्गदर्शन करणे, असा आहे.
(2) किकस्टर्टर आणि विशबेरी - या दोन प्लॅटफॉर्मचा मूळ उद्देश नवीन चित्रपट, गाण्यांचे अल्बम्स, क्रिएटिव्ह आर्ट यांसारख्या प्रकल्पांना भांडवल उभे करून देणे हा आहे.
(3) केटो व मिलाप - या दोन प्लॅटफॉर्मचा मूळ उद्देश गंभीर आजारावरील उपचारांसाठी देणगी स्वरूपात पैसे गोळा करणे हा असून, देणगीदारास यातून प्राप्तिकरात कशी व किती सवलत मिळेल, याचीही माहिती या प्लॅटफॉर्मवर मिळू शकते. हा प्लॅटफॉर्म समाजसेवा या उद्देशाने कार्यरत आहे.
(4) दी हॉटस्टार्ट - याचा मूळ उद्देश खाद्यपदार्थ व शीतपेये, वैद्यकीय सुविधा, शिक्षण किंवा यासारखे अन्य काही प्रकल्पांना भांडवल उभे करू देणे हा आहे.
‘क्राऊड फंडिंग’चे फायदे
व्यवसाय सुरू करणार्या कमीत कमी वेळेत भांडवल उभे करणे शक्य होते. सामान्य गुंतवणूकदाराला त्याच्या जोखीम घेण्याच्या क्षमतेनुसार गुंतवणूक करता येते. यात जास्त परतावा मिळू शकतो. प्रवर्तक व गुंतवणूकदार एकमेकांच्या थेट संपर्कात येत असल्याने दोघांच्यात थेट संवाद होतो. त्यामुळे एकमेकांच्या सूचनांनुसार प्रकल्पात आवश्यक त्या सुधारणा वेळीच केल्या जातात, तसेच यातून निर्माण होणार्या उत्पादनांसाठी ग्राहक सहज मिळतो. त्यामुळे मार्केटिंगवरील खर्च वाचतो. या गुंतवणुकीत जोखीम कमी आहे. यातून नवनवीन प्रकल्पांना चालना मिळून बेरोजगारी कमी होऊ शकते.
‘क्राऊड फंडिंग’चे तोटे
अपेक्षित निधी जमा झाला नाही, तर प्रकल्प अयशस्वी समजून, गुंतवूणकदारांचे पैसे परत केले जातात. प्रवर्तकाची मेहनत वाया जाते. प्रकल्पाची सर्व माहिती प्लॅटफॉर्मवर असल्याने यात गोपनियता राहत नाही व सर्व स्पर्धकांना ही माहिती मिळू शकते. भारतात ‘क्राऊड फंडिंग’ हे ‘सेबी’च्या नियंत्रणाखाली आहे. गुंतवूणकदारांच्या हिताचे रक्षण करणे, हा प्रमुख उद्देश यामागे आहे. देणगी आधारित ‘क्राऊड फंडिंग’ ही गुंतवणूक नसून, केवळ देणगी असल्याने यात काही जोखीम नसते. ‘डेट’ आधारित “क्राऊड फंडिंग’मध्ये ‘पी2पी लेन्डिंग’चा समावेश असून, यासाठी 2017 साली ‘रिझर्व्ह बँके’ने मार्गदर्शक सूचना असणारे परिपत्रक काढले आहे. ‘इक्विटी’ आधारित ‘क्राऊड फंडिंग’बाबत अनेक बंधने असल्याने सध्यातरी हे कायदेशीर नाही. ‘पी2पी’सारख्या ‘क्राऊड फंडिंग’मुळे एक ते दहा लाख रुपयांपर्यंतची छोटी कर्जे त्वरित व सहजगत्या मिळतात, तसेच निर्मात्यांनासुद्धा बँका किंवा अन्य पर्यायांपेक्षा जलद व काहीशी स्वस्त कर्ज मिळतात. त्यामुळे ‘इक्विटी’ आधारित ‘क्राऊड फंडिंग’ जरी होत ऩसेल तरी ‘डेट’ व ‘जेनेशन’ आधारित ‘क्राऊड फंडिंग’ला दिवसेंदिवस वाढता प्रतिसाद मिळत आहे.
-शशांक गुळगुळे