"अमेरिकेमधून धर्म आणि विश्वास संपत चालला आहे. आपण पुन्हा प्रार्थनेकडे वळायला हवे.” असे नुकतेच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीतील मुख्य दावेदार डोनाल्ड ट्रम्प म्हणाले. पवित्र गुड फ्रायडे आणि इस्टर संडेनिमित्त त्यांनी ‘गॉड ब्लेस द युएसए बायबल’ विकत घेण्याचेही अमेरिकन नागरिकांना आवाहन केले. या ‘गॉड ब्लेस युएसए बायबल’मध्ये अमेरिकेचे संविधान, स्वातंत्र्याचा जाहीरनामा वगैरेही आहे. हे बायबल एका संकेतस्थळावरून विकत घेता येईल, ज्याची किंमत आहे ६० डॉलर. ट्रम्प यांनी बायबल विकत घ्या, असे आवाहन केल्यामुळे अमेरिकेतच नव्हे, तर जगभरात विविध चर्चांना चर्चांना उधाण आले. ट्रम्पच्या विरोधकांचे म्हणणे आहे की, सध्या ट्रम्प यांच्यावर न्यायालयीन खटले सुरू आहेत. त्यामध्ये त्यांना भरपाई करायची आहे. सदरचा खर्च ते हे बायबल विक्री करून करत असावेत.
अर्थात, ट्रम्प यांनी ‘गॉड ब्लेस द युएसए’ हे बायबल खरेदी करा, असे आवाहन करण्यामागे अनेक कारणे आहेत. सगळ्यात मोठे कारण आहे, ते राजकीयच. अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचा प्रचार शिगेला आहे. ढोबळमानाने आपल्या भारतीयांसाठी ख्रिस्ती म्हटले की, सगळे ख्रिस्ती एक आणि मुस्लीम म्हटले की सगळे मुस्लीम एक असा गैरसमज. तो गैरसमज जर मुळासकट संपवायचा असेल, तर ’डोनाल्ड ट्रम्प विरुद्ध बायडन’ हा सामना समजून घेणे आवश्यक. त्यातूनच लक्षात येते की, ट्रम्प यांनी बायबल विकत घ्या, असे आवाहन का केले असावे?ट्रम्प हे ख्रिस्ती आहेत; पण कॅथलिक नाहीत, तर बायडन हे कॅथलिक आणि ख्रिस्तीही आहेत. बायडन त्यांच्या कॅथलिक धर्ममान्यतेनुसार, बायबलसोबतच चर्च आणि चर्चच्या परंपरा, रितीरिवाज मानतात. ट्रम्प हे त्यांच्या सुधारणावादी ख्रिस्ती मतप्रणालीनुसार, केवळ बायबल हाच मुख्य विश्वास मानतात. त्यांच्या मते, बायबल हेच सगळ्या संकटातून वाचवते आणि स्वर्गप्राप्ती देते. अमेरिकेत या मतप्रणालीचे ४८ टक्के ख्रिस्ती नागरिक आहेत, तर बायबलसोबत चर्चला मानणारे कॅथलिक २२ टक्के राहतात.
कॅथलिक केवळ २२ टक्के असतानाही, जो बायडन मागे राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकले. कारण, बायडन यांना कॅथलिक अमेरिकन लोकांचे एकगठ्ठा मिळालेले समर्थन. दुसरीकडे, ट्रम्प यांना बहुसंख्य सुधारणावादी ख्रिस्ती समूहाने पूर्णतः समर्थन दिले नव्हते. कारण, ट्रम्प राष्ट्राध्यक्ष असताना गर्भपातविरोधी कायदा करावा की नाही, यावर अमेरिकेत वादविवाद सुरू होत्या. त्यावेळी कॅथलिक असलेले बायडन हे कॅथलिक चर्चच्या गर्भपातासंदर्भातील भूमिकेविरोधात मतप्रदर्शन करीत होते. ते गर्भपातविरोधी कायद्याच्या समर्थनार्थ बोलत नव्हते, तर ट्रम्प हे सुधारणावादी ख्रिस्ती असूनही, गर्भपातविरोधी कायद्याबाबत स्पष्ट नकार देत नव्हते. यामुळे गर्भपातविरोधी कायद्याला विरोध असणार्या सुधारणावादी ख्रिस्त्यांनी ट्रम्प यांना समर्थन न देता, बायडन यांची पाठराखण केली. बायडन जिंकले. याचाच अर्थ कॅथलिक नव्हे, तर केवळ बायबल हाच विश्वास मानणारे, ख्रिस्ती हेच अमेरिकेच्या सत्तास्थानी कोण असेल, हे ठरवतात, हे सत्य आहे. येथे तर ट्रम्प स्वतःच कॅथलिक नसलेले ख्रिस्ती आहेत.
त्यामुळे त्यांनी मागे राष्ट्राध्यक्ष झाल्यावर, दोन बायबलवर हात ठेवून, शपथ घेतली होती. तसेच अमेरिकेत ’ब्लॅक लाईव्हज मॅटर’ म्हणत दंगली झाल्या, तेव्हा चर्चा करण्यासाठी ट्रम्प हातात बायबल घेऊन, अमेरिकेतल्या चर्चमध्ये गेले होते. आता तर काय अमेरिकेत निवडणुका आहेत.असो. या पार्श्वभूमीवर जानेवारी २०२४ साली अमेरिकेमध्ये ’गैलप’, ’प्यू’ आणि ’पीआरआरआय’ या संस्थांनी जाहीर केलेल्या अहवालाचा संदर्भ द्यावासा वाटतो. या संस्थांनी अमेरिकेतील लोकांच्या धार्मिकतेसंदर्भात सर्वेक्षण केले. त्यामध्ये २८ टक्के ख्रिश्चन (त्यात कॅथलिक) लोकांनी म्हटले की, ’ते कोणत्याही धर्माला मानत नाहीत.’ याचाच अर्थ ख्रिश्चन असलेल्या अमेरिकेमध्ये आता ख्रिश्चन धर्माला मानणारे कमी झाले आहेत. या अहवालाने संविधानरुपी निधर्मी असलेली; पण ख्रिस्ती धर्ममान्यता जोपासणारी अमेरिका चिंतेत आहे. अशावेळी ट्रम्प पुन्हा प्रार्थना करू, ख्रिश्चॅनिटीकडे वळूया असे म्हणतात, तेव्हा ते अमेरिकेतील बहुसंख्य ख्रिस्ती जनतेच्या मनाचा ठाव घेण्याचा प्रयत्न करतात. थोडक्यात, अमेरिकेमध्ये ’ट्रम्प विरुद्ध बायडन’ म्हणण्यापेक्षा ’ख्रिश्चन विरुद्ध कॅथलिक ख्रिश्चन’ असा हा सामना!