अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर यांनी इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत 'स्वातंत्र्यवीर सावरकर' चित्रपटाबद्दल प्रश्न विचारला आहे.
मुंबई : रणदीप हुड्डा दिग्दर्शित 'स्वातंत्र्यवीर सावरकर' (Swatantryaveer Savarkar) २२ मार्च रोजी प्रदर्शित झाला आहे. अवघ्या तीन दिवसांत या चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकली. अनेक कलाकार देखील प्रेक्षकांना हा चित्रपट आवर्जून पाहण्यासाठी आवाहन करत आहेत. अशात अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर यांनी ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ Swatantryaveer Savarkar) या चित्रपटाचे कौतुक करत तुमच्यात चित्रपट पाहण्याची हिंमत आहे का असा प्रश्न देखील त्यांनी विचारला आहे. दरम्यान, या चित्रपटात सावरकरांची व्यक्तिरेखा आणि चित्रपटाचे दिग्दर्शन स्वत: रणदीप हुड्डा याने केले आहे.
सुप्रिया पिळगांवकर यांनी या चित्रपटाचे कौतुक करत बालपणीची एक आठवण पोस्टमध्ये शेअर केली आहे. त्यांनी 'स्वातंत्रवीर सावरकर' हा चित्रपट पहिला आणि त्यानंतर पोस्ट करत म्हणाल्या की, “मी १२ वर्षांची असताना माझ्या वडिलांनी मला माझ्या शाळेच्या सुट्टीत वाचण्यासाठी एक पुस्तकआणून दिलं. ते एक जाडजूड पुस्तक होतं. सुट्टीच्या शेवटी ते वाचून पूर्ण करणं अपेक्षित होतं. मी वाचायला सुरुवात केली आणि मी वाचन पूर्ण होईपर्यंत ते खाली ठेवूच शकले नाही. वाचनात सुरुवातीला खूप वेळा थांबावं लागलं कारण मी रडत होते, नुसती रडत होते, पुस्तकात अर्ध्या वाचनानेच मी सुन्न झाले होते. ते पुस्तक पुन्हा काल जिवंत झालं. त्या पुस्तकाचं नाव होतं माझी जन्मठेप ! आणि चित्रपट वीर सावरकर हा. हा चित्रपट बघण्याची हिम्मत तुम्ही दाखवू शकाल का?', अशी डोळ्यांच्या कडा पाणावणारी पोस्ट सुप्रिया यांनी केली आहे. त्यांच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत पुस्तक आणि चित्रपट दोन्ही अप्रतिम असल्याचे म्हटले आहे.
‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटाचे दिग्दर्शन, लेखन, निर्मिती आणि अभिनय रणदीप हुड्डा याने केले आहे. तसेच, अंकिता लोखंडे हिने यमुनाबाई सावरकर यांची व्यक्तिरेखा साकारली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे जीवन भव्यतेने या चरित्रपटात मांडण्याचा पुरेपुर प्रयत्न संपुर्म टीमने केला आहे.