पंजाबमध्ये आगामी लोकसभा स्वबळावर! अकाली दलासोबत युती नाही

    26-Mar-2024
Total Views |
Punjab Loksabha Election BJP

 

नवी दिल्ली :    पंजाबमध्ये भाजप आणि शिरोमणी अकाली दल यांच्या युतीबाबत सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. भाजपने लोकसभा निवडणूक एकट्याने लढवणार असल्याचे जाहीर केले आहे. पंजाब भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड यांनी त्यांच्या 'एक्स' खात्यावर व्हिडिओ संदेशाद्वारे घोषणा केली आहे.

ते म्हणाले, जनतेचा कौल, कार्यकर्त्यांचा कौल आणि नेत्यांचा कौल विचारात घेऊन पक्षाने हा निर्णय घेतला आहे. पंजाबमधील सर्व शेतकरी, व्यापारी आणि सर्वसामान्य जनतेच्या उज्ज्व्ल भविष्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे, असे जाखड यांनी म्हटले आहे.


हे वाचलंत का? - भाजपची लोकसभेची सहावी यादी जाहीर! वाचा सविस्तर


गेल्या दहा वर्षात शेतकऱ्यांच्या पिकांचा प्रत्येक दाणा केंद्र सरकारने खरेदी करून एमएसपीच रक्कम आठवड्याभरात त्यांच्या खात्यात जमा केल्याचे जाखड यांनी यावेळी सांगितले. ते पुढे म्हणाले, शतकानुशतके करतारपूर साहिबमध्ये दर्शन घेण्याची लोकांची मागणी होती, तीदेखील पंतप्रधान मोदींनी पूर्ण केली आहे.

पंजाबच्या सुरक्षेसाठी आणि पंजाबच्या सीमेवर शांतता अबाधित राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या १ जून रोजी पंजाबमधील मतदार भाजपलामतदान करून देशाच्या प्रगतीला हातभार लावतील, असाही विश्वास जाखड यांनी व्यक्त केला आहे. लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने सहावी यादी जाहीर केली आहे. यामध्ये तीन उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. राजस्थानसाठी दोन आणि मणिपूरसाठी एका उमेदवाराची नावे यादीत जाहीर करण्यात आली आहेत.

भाजपने इंदू देवी जाटव यांना राजस्थानच्या करौली-धोलपूर लोकसभा मतदारसंघातून आणि कन्हैया लाल मीना यांना दौसामधून उमेदवारी देण्यात आली आहे. याशिवाय इनर मणिपूर विधानसभेच्या जागेवरून थौनाओजम बसंत कुमार सिंह यांच्यावर दावेदारी करण्यात आली आहे.