"सेल्फी काढत फिरल्याने आणि संसदरत्न होऊन लोकांची कामं होत नाहीत!"
विजय शिवतारेंचा सुप्रियाताईंना टोला
25-Mar-2024
Total Views |
पुणे : निव्वळ सेल्फी काढत फिरल्याने आणि संसदरत्न होऊन लोकांची कामं होत नाहीत, असा खोचक टोला शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांनी शरदचंद्र पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळेंना लगावला आहे. त्यांनी सोमवारी पुण्यात माध्यमांशी संवाद साधला.
विजय शिवतारे म्हणाले की, "सुप्रियाताईंनी पंधरा वर्षात एक रुपयांचं काम तरी केलं का हे सांगा. निव्वळ सेल्फी काढत फिरल्याने आणि संसदरत्न होऊन कामं होत नाहीत. तुम्हाला तळागाळात जाऊन लोकांचे प्रश्न सोडवावे लागतात. फंड नको पण सुप्रियाताईंनी या मतदारसंघातले कामं तरी केलेत का? महाविकास आघाडीची सत्ता असताना पुरंदरच्या गुंजवणीच्या प्रकल्पासाठी त्यांनी किती प्रयत्न केला? एका ठिकाणी असलेलं आमचं विमानतळ का शिफ्ट करण्यात आलं?" असा सवाल त्यांनी केला.
महादेव जानकर यांनी महायूतीमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यानंतर ते बारामतीतून निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तूळात रंगल्या आहेत. यावर बोलताना विजय शिवतारे म्हणाले की, "लोकशाहीमध्ये प्रत्येकालाच निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे. एकीकडे सुनेत्राताईंचा प्रचार सुरु असताना महादेव जानकरांचं नाव कसं काय पुढे येत आहे, याचं आश्चर्य वाटत आहे. पण कुणीही आलं तरी मी निवडणूक लढणार आहे," असे ते म्हणाले. विजय शिवतारे यांनी बारामतीमध्ये शरद पवार आणि अजित पवार यांच्याविरोधात निवडणूक लढवण्याचा निश्चय केला आहे. दरम्यान, महायूतीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अडचण होऊ नये यासाठी त्यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.