"ज्यांनी भगवा सोडून दुसरा रंग निवडला त्यांनाही होळीच्या शुभेच्छा!"
श्रीकांत शिंदेंचा टोला
25-Mar-2024
Total Views |
मुंबई : ज्यांनी भगवा सोडून दुसरा रंग निवडला त्यांनाही होळीच्या शुभेच्छा, असे म्हणत शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरेंचे नाव न घेता टोला लगावला आहे. तसेच आम्ही भगवा सोडला नाही, तर तो पुढे नेत आहोत, असेही ते म्हणाले आहेत. त्यांनी सोमवारी माध्यमांशी संवाद साधला.
श्रीकांत शिंदे म्हणाले की, "आज सगळे लोक वेगवेगळ्या रंगांमध्ये रंगलेले आहेत. पण संपूर्ण भारत एकाच रंगात रंगलेला आहे तो रंग म्हणजे भगवा रंग. या भगव्या रंगात सगळे लोकं रंगून गेलेले आहेत. होळीच्या दिवशी सगळ्यांच्या मनात एकमेकांबद्दल असलेले रुसवे फुगवे बाजूला ठेवून सगळ्यांनी एकमेकांबरोबर रंगपंचमी साजरी केली पाहिजे. या दिवशी सगळे विरोधक आणि सत्ताधारी एकत्र येऊन वर्षभराची कटुता रंगपंचमीच्या निमित्ताने दूर होत असते."
ते पुढे म्हणाले की, "काही लोकांनी भगवा रंग सोडलेला आहे. ज्यांनी ज्यांनी भगवा रंग सोडून दुसरा रंग धारण केला आहे त्यांना तो लखलाभ होवो. आम्ही बाळासाहेबांचा, हिंदूत्वाचा आणि प्रभू श्रीरामांचा भगवा रंग सोडलेला नसून तो पुढे घेऊन जाण्याचं काम करत आहोत," असा टोला त्यांनी उद्धव ठाकरेंचे नाव न घेता लगावला आहे.
"आम्ही मतदारसंघात लोकांबरोबर रंगपंचमी साजरी करणार आहोत. टेंभी नाक्याला धर्मवीर आनंद दिघेंनी वेगवेगळे महोत्सव सुरु केले. त्यातीलच एक रंगपंचमीचा महोत्सवदेखील दरवर्षी साजरा केला जातो. यावर्षीदेखील मोठ्या उत्साहात टेंभी नाक्याला रंगपंचमीचा उत्सव साजरा केला जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेदेखील या उत्सवात सहभागी होणार आहेत," अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.